पणजी: झुआरीनगर येथील बिटस पिलानीमध्ये विद्यावाचास्पती पदवीसाठी संशोधन करणाऱ्या श्वेताक्षी मिश्रा यांना पृथ्वीच्या उत्तर धृवावर संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यांनी “आर्क्टिक मायक्रोब्समधून बायोहायड्रोजन निर्मितीचा शोध” यावर संशोधन केले.
त्या बिरला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समध्ये संशोधन करतात. त्यांना उत्तर धृवावरील ग्रीष्मकालीन तुकडीत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांनी २ ते ३० जूनदरम्यान हे संशोधन केले आहे.
या मोहिमेअंतर्गत, नॉर्वेमधील स्वालबार्ड येथील नाय-ओल्सुन्ड या आर्क्टिक क्षेत्रात “आर्क्टिक मायक्रोब्समधून बायोहायड्रोजन निर्मितीचा शोध” या विषयावर क्षेत्रीय प्रयोग करण्यात आले.
हा प्रकल्प बिटसच्या जैवविज्ञान विभागाचे प्रा. श्रीकांत मुतनुरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून राष्ट्रीय ध्रुवीय व समुद्र संशोधन केंद्र आणि नॉर्वेजियन पोलर इन्स्टिट्यूट यांच्या मान्यतेने राबवण्यात येत आहे. या संशोधनाचा उद्देश आर्क्टिक प्रदेशातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या सूक्ष्मजीवांची विविधता समजून घेणे आणि बायोहायड्रोजन निर्मितीसाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचा शोध घेणे हा आहे.
श्वेताक्षी मिश्रा यांनी हिमाद्री स्टेशन येथून जमिनीतील माती, गाळ, बर्फ व पाण्याचे नमुने गोळा केले. प्राथमिक विश्लेषणासाठी पोर्टेबल सेन्सर्सच्या साहाय्याने पीएच, रेडॉक्स पोटेन्शियल, हायड्रोजनची मात्रा व इतर भौतिक-रासायनिक गुणधर्मांची चाचणी करण्यात आली. हे नमुने थंड साखळीत साठवून, पुढील सखोल विश्लेषणासाठी गोव्यात आणले जातील.
संशोधन कार्यासोबतच श्वेताक्षी यांनी अंतरराष्ट्रीय योगदिन, विज्ञानविषयक व्याख्याने, मिड-समर फेस्टिव्हल, स्वच्छता मोहीम, नाय-ओल्सुन्ड शहरभ्रमण, पोस्टकार्ड लेखन, एडब्ल्यूआयपीआयव्ही संस्थेचे हवेतील फुगे सोडण्याचे प्रात्यक्षिक आणि पोलर बिअर एक्सप्लोर ग्रुप यांसारख्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.