पणजी: संभाव्य वीज दरवाढ सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक आहे. ती दरवाढ आठवड्याभरात मागे न घेतल्यास वीज खात्याच्या राज्यभरातील कार्यालयांसमोर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) दिला.
प्रदेशाध्यक्ष पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार कार्लुस फेरेरा व इतर नेत्यांच्या शिष्टमंडळाने सकाळी मुख्य वीज अभियंता स्टिफन फर्नांडिस यांना घेराव घालत वीज दरवाढीविषयी जाब विचारला.
दरम्यान, आम आमदी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांच्या अध्यक्षेतेखालील सरचिटणीस श्रीकृष्ण परब, उपाध्यक्ष सुनील सिम्नापूरकर, राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नाईक आणि नेते सरफराज अंकलगी यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान वीज खात्याचे फर्नांडिस यांची भेटीची वेळ घेऊन त्यांच्यासोर वीज दरवाढीविषयी पक्षाची भूमिका मांडली.
फर्नांडिस यांना भेटून आल्यानंतर पाटकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, वीज खात्यावर ५७० कोटी रुपयांच्या थकीत बिलाचा बोजा आहे, त्यामध्ये सरकारी कार्यालयांचे १०८ कोटी रुपये आहेत.
सरकारचे स्वतःचे बिल भरण्याबाबत अजिबात गंभीर दिसत नाही; पण सामान्यांच्या डोक्यावर दरवाढ लादत आहे. तत्पूर्वी वीज खात्याच्या इमारतीबाहेर अभियंत्यांना भेटून आलेल्या पालेकर यांनी सांगितले की, वीज खाते अगोदर पाचशे कोटींवर असलेली बिलाची थकबाकी वसूल करीत नाही.
त्याशिवाय वीज खात्याकडून लवकरच साडेसात लाख नवे मीटर बसविले जाणार आहेत, ज्या कंपनीचे मीटर येणार आहेत त्या मालकाचे सरकारशी काय संबंध आहेत, हे तपासावे.
दरम्यान, मुख्य वीज अभियंता फर्नाडिस यांनी स्पष्ट केले की, दिवसाच्या वेळेचे दर सध्या फक्त औद्योगिक ग्राहकांना लागू आहेत, घरगुती वापरकर्त्यांना नाही. ऊर्जामंत्री लवकरच याविषयी स्पष्टीकरण देतील.
ढवळीकर प्रसारमाध्यमांवर घसरले !
ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज मुख्य वीज अभियंत्यांना घेराव घालणाऱ्या विरोधकांना 'मूर्ख माणूस' म्हणून हिणवले. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या चुकीच्या बातम्यांमुळे विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
प्रसारमाध्यमांनी या मुद्याचा अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी दिला. वीज दरवाढीचा खात्याने दोन वर्षांत अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.