Sara Varghese Goa's Walking Nurse: डॉक्टर-नर्सला आपल्याकडे देवासमान मानलं जातं. जितके महत्व एखाद्या अनुभवी डॉक्टरचं असतं तितकंच, किंबहुना त्याहून अधिक महत्वाचं असतं त्या डॉक्टरकडे अनुभवी नर्स असणं. म्हापसामध्ये एक अशी निवृत्त नर्स आहे जिने आयुष्यभर रुग्णांची सेवा केलीच, पण आता स्वत:लाच धड चालता येत नसतानाही ती अजूनही तितक्याच प्रसन्नतेने तिचे कर्तव्य आणि सेवाभाव करणं अजूनही विसरली नाही. ही नर्स म्हणजे म्हापश्यातील 84 वर्षांची सारा वार्गस.
सारा ही गोव्यातील निवृत्त नर्स आहे. मात्र अजूनही ती परिसरातील रुग्णांची सेवा करते, ते ही विनामोबदला. ज्यांना आरोग्य सेवेची गरज आहे, ते तिला कॉल करतात मग सारा आपल्या अशक्त पावलांनी तिचा सेवाधर्मपूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरी चालत जाते. म्हणूनच तिला 'वॉकिंग नर्स' असंही म्हणतात.
इंन्सुलीनचं इंजेक्शन देणं असेल किंवा जखमेवर मलमपट्टी करणं असेल, परिसरातील लोक साराला आठवतात, कारण त्यांना विश्वास आहे की त्यांनी कॉल केल्यानंतर सारा त्यांच्या मदतीला नक्की येणार.
सारा म्हणते लोकांना औषधापेक्षाही प्रेमाची जास्त गरज...
निवृत्त झाल्यावर आता उरलेला वेळ छान स्वत:साठी न घालवता अजूनही ती रुग्णसेवा का करते याबाबत साराला विचारले असता ती चेहऱ्यावर स्मितहास्य आणत सांगते, हे माझं कर्तव्य तर आहेच, शिवाय माझ्यामते लोकांना फक्त औषधाची गरज नाहीय तर त्यांना प्रेमळ शब्दांची, आधाराची जास्त गरज असते, आणि मला जर कुणी कॉल करून मदत मागत असेल तर मी नक्कीच त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सारा म्हणते, सुदैवाने मला पुरेसं पेन्शन आहे, त्यामुळे मला इतर कशाचीही गरज नाही.
सारा गोव्यात येण्यामागं अनोखं कारण..
मूळची केरळची असलेली सारा 1966 पासून गोव्यात राहायला लागली. त्यावेळी ती तिच्या गरोदर बहिणीच्या मदतीसाठी गोव्यात आली होती. गोव्यात कायमचं स्थायिक व्हायचा विचार कधीही तिने केला नव्हता. मात्र काही गोष्टी नियतीनं आधीच ठरवलेल्या असतात. साराने सुरुवातीला इंदोरमधील एका महाविद्यालयात महिला आरोग्य अभ्यागत आणि प्रसूती आरोग्य पर्यवेक्षक होण्यासाठी नर्सिंग कोर्स करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला तिला हिंदी-माध्यमाच्या सूचनांचं पालन करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, मात्र तरीही तिने तिच्या शेवटच्या वर्षात अव्वल स्थान मिळवलं आणि इथून तिच्या सेवाकर्माला सुरुवात झाली. याबाबत ती म्हणते, "मला मध्य प्रदेशात राहताना खूप त्रास झाला, एरव्ही मला फक्त मासे आणि भात खाण्याची सवय होती मात्र तिथं गेल्यावर चपाती-भाजीला आपलंसं करणं मला नक्कीच थोडं जड गेलं.
गोव्यात तिची बहीण आणि तिचा नौदल अधिकारी नवरा यांच्याकडे काही महीने राहिल्यानंतर सारा रेडक्रॉसच्या ओल्ड गोवा सुविधेत परिचारिका म्हणून रुजू झाली. यासाठी तिने वृत्तपत्रातील एक जाहिरात पाहून नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर ती सरकारी विभागात ग्रामीण आरोग्य परिचारिका म्हणून रुजू झाली. प्रदीर्घ अनुभव असलेल्या साराने गोव्यातील अनेक ठिकाणी आपली सेवा बजावलीय. यामध्ये हळदोणा, कुंकळ्ळी, सांगे, डिचोली आणि पेडण्याचा समावेश तर आहेच शिवाय इतर आरोग्य केंद्रांमध्येही तिने काम केलंय.
वॉकिंग नर्स बनली दुर्बलांचा खरा आधार...
साराबद्दल अजून बोलायचं झालं तर, ती फक्त विनामोबदला रुग्णसेवाच करत नाही तर तिच्या घरी तिने अनेक निराधार व्यक्तींना आश्रयही दिलाय. मुळातंच तिच्याकडे रुग्णांची लांबलचक यादी असतानाही, साराने आणखी सहा निराधार लोकांना आपल्या घरात स्थान देऊन त्यांना आधार दिलाय. त्यापैकी काहीजण अंगविकारानं त्रस्त आहेत आणि काहीजण दुर्बल आरोग्य परिस्थितीचे शिकार आहेत.
त्यांच्याबद्दल सांगताना सेवाभाव आणि प्रसन्नता चेहऱ्यावर असलेली सारा सांगते की, त्यांच्याकडे जाण्यासाठी इतर कोणतंही ठिकाण नव्हतं आणि शारीरिक अवस्थेमुळे ते कुठेच कामही करू शकत नव्हते. दुसरीकडे मला योग्य आणि पुरेसे पेन्शन मिळते, त्यामुळे जोपर्यंत मी सक्षम आहे तोपर्यंत मी त्यांची काळजी घेईन, हेच माझ्या जीवनाचं उद्देश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.