पणजी : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी कोलवा पोलिस संशयिताविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यास अपयशी ठरल्याने तसेच पीडित मुलीनेही न्यायालयात जबानी देण्यास नकार दिल्याने द्रुतगती न्यायालयाने संशयिताला सबळ पुराव्यांअभावी निर्दोष ठरवले. या घटनेप्रकरणी तपासकाम करण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने पोलिसांचीही कानउघाडणी केली आहे.
दक्षिण गोव्यात एका अल्पवयीन मुलीशी मैत्री करून व्यवसायाने सुतार असलेल्या तरुणाने तिला समुद्रकिनाऱ्यावर नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पाच महिन्यानंतर तिच्या आईला संशय आला असता वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात ती गरोदर असल्याचे समोर आले. तिच्या आईने याप्रकरणी तरुणाविरुद्ध कोलवा पोलिसात तक्रार दाखल केली होती. पीडित मुलीची बिगर सरकारी संस्थेच्या मदतीने जबानी नोंदवण्यात आली व तपासकाम पूर्ण करून आरोपपत्र सादर करण्यात आले.
पोलिस तपासकामावेळी या प्रकरणात मुलीची व संशयिताची डीएनए चाचणी करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. मुलीनेच या प्रकरणाला संमती न दिल्याने तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. याप्रकरणी संशयिताला निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे द्रुतगती न्यायालयाच्या न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांनी निवाडा देताना सांगितले.
पीडित मुलीने जबानीवेळी संशयिताविरुद्ध कोणतीच जबानी दिली नाही. तिची इतर तरुणांशी मैत्री असल्याने तिने हा झालेला प्रकार विसरायचे असून, प्रकरण अधिक पुढे घेऊन जायचे नसल्याचे पोलिसांना स्पष्ट सांगितले होते. पीडितेने ही घटना नाकारली असली तरी तिला विश्वासात घेऊन याप्रकरणी महिला अधिकाऱ्यामार्फत तपास करण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.