वास्को: वेल्डिंग करताना कामगाराच्या हातून उडालेल्या ठिणगीमुळे वेर्णा औद्योगिक वसाहतीतील बांधकामाधिन गोदामाला सोमवारी सकाळी आग लागली. गोदामात ठेवलेल्या पेंटच्या डब्यांनी पेट घेतल्याने आग वेगाने पसरली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेर्णा, वास्को, मडगाव आणि फोंडा येथील अग्निशमन दलांना सुमारे दीड तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या घटनेत पेंट आणि काही साहित्य जळाल्याने नुकसान झाले.
वेर्णा औद्योगिक वसाहतीत एका पेंट कंपनीच्या गोदामाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी पेंटचे डबे, लाकडी साहित्य आणि अन्य सामग्री ठेवण्यात आली होती. सोमवारी सकाळी कामगार नेहमीप्रमाणे काम करत असताना अग्निरोधक यंत्रणेचा पाइप वेल्डिंगद्वारे जोडण्याचे काम सुरू होते. त्यावेळी वेल्डिंगची एक ठिणगी खाली ठेवलेल्या पेंटच्या डब्यावर पडली.
दरम्यान, आगीतून निघालेला धूर जवळच असलेल्या मधमाशांच्या पोळ्यापर्यंत पोहोचल्याने मधमाशा चवताळल्या. त्यामुळे आग विझविण्याचे प्रयत्न करण्याऐवजी कामगारांना मधमाशांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.