BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

BL Santhosh Goa visit: अवघ्‍या चार महिन्‍यांवर येऊन ठेपलेल्‍या राज्‍य विधानसभा निवडणुकीच्‍या तयारीस गती देताना, भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी रविवारी दोन दिवसांच्‍या गोवा दौऱ्यावर येत रविवारी सायंकाळी मंत्री, आमदारांशी बैठक घेतली आणि त्‍यांचे प्रश्‍‍न जाणून घेतले.
BL Santhosh Goa Visit
BL Santhosh Goa VisitDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: अवघ्‍या चार महिन्‍यांवर येऊन ठेपलेल्‍या राज्‍य विधानसभा निवडणुकीच्‍या तयारीस गती देताना, भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी रविवारी दोन दिवसांच्‍या गोवा दौऱ्यावर येत रविवारी सायंकाळी मंत्री, आमदारांशी बैठक घेतली आणि त्‍यांचे प्रश्‍‍न जाणून घेतले.

या बैठकीत मंत्री तथा शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी, ‘‘भाजपसोबत सत्तेत असूनही मगोप फोंडा तालुक्‍यातील भाजपच्‍या ताब्‍यात आलेल्‍या फोंडा, शिरोडा आणि प्रियोळ या मतदारसंघांत लुडबूड करीत आहे. त्‍यावर लवकरच तोडगा काढण्‍याची गरज आहे’’, अशी विनंती संतोष यांना केल्‍याची माहिती सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

BL Santhosh Goa Visit
Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

सलग चौथ्‍यांदा गोव्‍यात भाजपचे सरकार स्‍थापन करण्‍याचा निर्धार केलेल्‍या बी. एल. संतोष यांनी रविवारी भाजपच्‍या अटल भवनात मंत्री आणि भाजप आमदारांची बैठक घेतली. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांच्‍यासह बाबूश मोन्‍सेरात वगळता इतर मंत्री आणि रुडॉल्‍फ फर्नांडिस वगळता इतर सर्व आमदार बैठकीला उपस्‍थित राहिले. संतोष यांनी बैठकीत मंत्री आणि प्रत्‍येक आमदाराशी वैयक्तिक चर्चा करीत त्‍यांचे प्रश्‍‍न,

समस्‍या ऐकून घेतल्‍या. यावेळी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी भाजपसोबत सत्तेत असलेल्‍या मगोपची थेट तक्रार त्‍यांच्‍याकडे केली. ‘‘भाजपसोबत सत्तेत असतानाही विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर मगोप भाजप आमदार असलेल्‍या फोंड्यासह शिरोडा आणि प्रियोळमध्‍येही हस्‍तक्षेप करीत आहे. येत्‍या निवडणुकीत या मतदारसंघांत मगोपचे उमेदवार उतरवण्‍याचे संकेत त्‍यांच्‍याकडून दिले जात आहेत. त्‍यामुळे हा प्रश्‍‍न लवकर मार्गी लागण्‍याची गरज आहे’’, असे त्‍यांनी सांगितले. त्‍यावर संतोष यांनी बैठकीत काहीही भाष्‍य केले नाही. परंतु, शिरोडकरांचा विषय त्‍यांनी गांभीर्याने घेतल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

BL Santhosh Goa Visit
Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

संतोष यांनी रविवारच्‍या बैठकीत मंत्री आणि आमदारांकडून त्‍यांच्‍या मतदारसंघांतील सध्‍याच्‍या प्रश्‍‍नांबाबत वैयक्तिकरित्‍या चर्चा केली. त्‍यांच्‍या मतदारसंघांतील प्रश्‍‍न, समस्‍यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिल्‍या. गोव्‍यात सलग चौथ्‍यांदा भाजपचे सरकार स्‍थापन करण्‍यासाठी मंत्री, आमदारांनी आपापल्‍या मतदारसंघांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचावे, केंद्र आणि राज्‍य सरकारने आतापर्यंत राज्‍याच्‍या विकासासाठी केलेली कामे, राबवलेल्‍या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, ज्‍यांच्‍यापर्यंत योजना पोहोचलेल्‍या नाहीत अशांपर्यंत त्‍या पोहोचवाव्यात, पक्ष संघटनेला अधिकाधिक बळकटी देऊन निवडणुकीला सामोरे जाण्‍याचा संदेशही त्‍यांनी उपस्‍थितांना दिल्‍याचे सूत्रांनी नमूद केले.

BL Santhosh Goa Visit
Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

१० जानेवारीनंतर आचारसंहिता शक्य

बी. एल. संतोष यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांच्‍याकडून राज्‍यात सुरू असलेल्‍या आंदोलनांचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १० जानेवारीनंतर लागू होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍याआधीच निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज रहा, लोकांचे प्रश्‍‍न मिटवून विविध माध्‍यमांद्वारे त्‍यांच्‍या अधिकाधिक जवळ पोहोचण्‍याचा प्रयत्‍न करा, अशा सूचनाही त्‍यांनी सावंत आणि नाईक यांना केल्‍याचेही सूत्रांनीही नमूद केले.

रविवार आणि सोमवार असे दोन दिवस गोव्‍याच्‍या दौऱ्यावर आलेले बी. एल. संतोष यांनी रविवारी मंत्री आणि भाजप आमदारांनंतर पक्षाच्‍या गाभा समितीसोबत बैठक घेतली. सोमवारी ते मंडळ अध्‍यक्ष आणि विविध मोर्चांच्‍या अध्‍यक्षांसोबत बैठका घेऊन त्‍यांच्‍याकडून निवडणूक तयारीचा आढावा घेणार असल्‍याचेही सूत्रांनी सांगितले.

BL Santhosh Goa Visit
Goa AI Residency Programme: गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार 'एआय'ची जोड; मांद्रेत 13 ते 29 ऑक्टोबरदरम्यान विनामूल्य निवासी कार्यक्रम

युती व जागावाटप निर्णय लवकरच

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप व मगोपमधील युतीसंदर्भात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांत चर्चा सुरू आहे. युती आणि जागावाटपाविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे भाजप आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com