Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्याच्या प्रेमात पडलेला आमदार

Khari Kujbuj Political Satire: मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे अनेक खात्यांचा भार आहे, त्यातील सर्व अधिकारी कार्यक्षम आहेत का हे पाहायचे सोडून ते परवा मुरगाव नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांवर जाम घसरले.

Sameer Panditrao

मुख्यमंत्र्याच्या प्रेमात पडलेला आमदार

आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी जनमत कौलदिनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्तुती करताना त्यांना गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पंक्तीत नेऊन बसवले. विरोधी आमदारांच्या मतदारसंघातील विकास मुख्यमंत्री कधीच रोखत नाहीत असे व्हेंझींचे म्हणणे आहे. त्यांच्या या वक्तव्याने मात्र बाणावलीतील लोकांची करमणूक होत आहे. यासंदर्भात आपच्या पदाधिकाऱ्याला विचारले असता मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडलेला आमदार अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही केवळ प्रतिक्रिया असली तरी त्यातून तो पदाधिकारी नेमके काय सुचवू पाहात आहे याचा अंदाज घेणे कठीण आहे. शेवटी हे राजकारण आहे. राजकारणात कोणी कधी कुणाचा मित्रही नसतो व वैरीही नसतो हे बाणावलीचे माजी आमदार चर्चिलबाब म्हणतात तेच सत्य आहे नाही का? ∙∙∙

मॉविन को गुस्सा क्यों आया?

मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे अनेक खात्यांचा भार आहे, त्यातील सर्व अधिकारी कार्यक्षम आहेत का हे पाहायचे सोडून ते परवा मुरगाव नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांवर जाम घसरले. एवढेच नव्हे, तर त्यांनी लगेच त्यांची तेथून उचलबांगडीही केली. खरे तर तेथील मुख्याधिकारी हा ‘ए’ ग्रेडचा अधिकारी असतो. अशा अधिकाऱ्याची तडकाफडकी काही तासांतच बदली केली गेली यावरून सरकार किती गंभीर असते याची चुणूक दिसली, पण हे गांभीर्य अन्यबाबतीत का दिसत नाही याचे कोडे मात्र सर्वसामान्यांना नेहमीच पडलेले असते. सदर मुख्याधिकारी अकार्यक्षम असल्याचे मॉविन यांनी जाहीरपणे सांगून टाकले. मात्र, असे अकार्यक्षम अधिकारी मॉविनबाबांच्या विशेषकरून वाहतूक खात्यात जळीस्थळी दिसतात त्याचे काय? त्यांच्यावरही अशी कारवाई का केली जात नाही? असे प्रश्न आता सोशल मीडियावरूनही केले जाऊ लागले आहेत त्याचे काय रे भाऊ? ∙∙∙

‘बायंगिणी’वरून राजकारण

बायंगिणी येथील कचरा विल्हेवाट प्रक्रिया प्रकल्पावरून सत्ताधारी मंत्री व आमदार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बायंगिणी येथे उभ्या राहिलेल्या निवासी संकुलामुळे कुंभारजुवेच्या माजी व आजी आमदार या प्रकल्पाला विरोध करत आले आहेत. मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी बायंगिणी प्रकल्प उभारण्यावर ठाम राहून आमदार फळदेसाई यांना डिवचले. त्यामुळे फळदेसाई यांनीसुद्धा त्याला उत्तर देताना थेट हिंमत असेल तर करूनच दाखवा असे आव्हानच दिले. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार राजेश फळदेसाई हे काँग्रेसमधून निवडून आले. मंत्री बाबुश मोन्सेरात हेसुद्धा तेवढेच खमके आहेत त्यामुळे हा प्रकल्प ठरल्यानुसार बायंगिणी येथे होईल यासाठी सर्व शक्ती पणाला लावल्याशिवाय राहणार नाहीत हेही तितकेच खरे. ∙∙∙

देवाचा धावा दामूला पावला!

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आणि राज्याच्या सुकाणू समितीने सात नावे केंद्रीय समितीकडे पाठविली. त्यामुळे सात नावे पाठविण्याची प्रक्रिया पार पाडली ही पक्षासाठी समाधानाची बाब. दामू नाईक हेच प्रदेशाध्यक्ष होणार, हे सात नावे गेल्यानंतर स्पष्ट झाले. परंतु दुसरीकडे दामू नाईक यांचे नाव सर्वात आघाडीवर होते आणि तेच अखेर प्रदेशाध्यक्ष होणार हे लख्ख प्रकाशाएवढे स्पष्ट झाले. तोपर्यंत दामू नाईक यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर किती देवतांच्या पायी माथा टेकवला हे त्यांनाच माहीत. परवा श्री बोडगेश्वराच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसमवेत दामू नाईक यांनी दर्शन घेतले. त्याचवेळी त्यांना अनेकजणांनी म्हणे बोडगेश्वर पावणार आणि तुम्हीच प्रदेशाध्यक्ष होणार, असेही भेटीत आणि फोनवरून सांगितले. आता प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दामू नाईक कोणकोणत्या देवतांच्या दर्शनाला जातात, हे पाहिल्यानंतर मनोमनी केलेला धावा दामूला पावला असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

‘खरी कुजबुज’ची ताकद

निर्भीड, सत्य आणि ‘खरी कुजबुज’ यात किती ताकद असते याची अनुभूती पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी याच सदरात ‘अरेरे! हा तर मृत्यूचा सापळाच!’ ही ‘खरी कुजबुज’ प्रसिद्ध झाली होती. आमदार युरी आलेमाव यांच्या भव्य बॅनरजवळ असलेला खड्डा गेल्या कित्येक महिने होता. ज्याच्यावर कोणाची नजर गेली नव्हती. दोन दिवसांपूर्वी ‘गोमन्तक’ने यावर ‘खरी कुजबुज’ प्रसिद्ध केली आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली. तो खड्डा बुझविण्याच्या कामाला सुरवात झाली. या अधिकाऱ्यांना कोकणी सक्ती लागत नाही का? ही दुसरी एक कुजबुज आम्ही राज्याबाहेरील व्यक्तीला गोवा प्रदेश सर्व्हिस कमिशन (जीपीएससी) अध्यक्षपदी नेमणूक केल्याबद्दल व याच्या विरोधात कोकणी म्हालगडे व विरोधी पक्ष शांत कसे? यावर छापली होती. कुजबुज छापून आल्यावर लगेच कोकणी म्हालगडे जागे झाले व सरकारला जाब विचारला. आता वाचक म्हणायला लागले आहेत ‘खरी कुजबुज’ खरीच ‘पावरफुल्ल’! ∙∙∙

बाबूश यांची भविष्यवाणी!

बायंगिणी येथे कचरा व्हिलेवाट प्रकल्पावरून सध्या मंत्री बाबूश मोन्सेरात आणि कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यात शा‍ब्दिक वाद सुरू झाला असून राज्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. तीन महिने काय कार्यकाळ संपेपर्यंत हा प्रकल्प येऊ देणार नाही असे थेट आव्हान राजेशरावांनी दिले आहे. बाबूश यांनी आपल्या शैलीत उत्तर देताना प्रकल्पाच्या पायाभरणी सोहळ्याला राजेशराव असणार, परंतु पूर्ण होणार तेव्हा राजेशराव असणार की नाही हे सांगता येणार नसल्याचे विधान केल्याने बाबूशना नेमके काय म्हणायचे आहे याचा अर्थ काढण्यास लोकांना वाव मिळाला आहे. त्यामुळे बाबुशनी पुढील निवडणुकीची थेट भविष्यवाणी केल्याची चर्चा ऐकू येते. ∙∙∙

दामूंचे भाषण

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आज काय बोलतात याकडे कार्यकर्त्यांचे नव्हे पक्षातील नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. १९९४ पासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या दामू यांनी अनेक चढउतार पचवले आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. ते कार्यकर्ता मेळाव्यात किमान अर्धा तास बोलतील. यावेळी ते कार्यकर्त्यांना कोणती दिशा देतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी स्व. मनोहर पर्रीकर, राजेंद्र आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर आदींची आठवण काढत त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे. नव्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष पुढे नेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्याची दिशा ते उद्याच्या भाषणातून मांडतील अशी चर्चा आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT