Goa Politics: खरी कुजबुज: भाजपला पर्याय हवा; पण काँग्रेस गंभीर आहे का?

Khari Kujbuj Political Satire: सध्या राज्यभरात भंडारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वराची रथयात्रा सुरू आहे.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपला पर्याय हवा; पण काँग्रेस गंभीर आहे का?

राज्यात सध्या एक वेगळीच राजकीय चर्चा रंगत आहे. भाजपने गावागावांत आपली ताकद वाढवत समित्या स्थापन केल्या आहेत. अशा स्थितीत भाजपला पर्याय हवा असल्याचे काही लोक बोलू लागले आहेत. या पर्यायासाठी काही भाजप कार्यकर्त्यांचे देखील काँग्रेसकडे लक्ष आहे, पण खुलेआम बोलले जात नाही. राज्यातील काही भागांमध्ये नागरिकांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपला पर्याय म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर काँग्रेस भाजपला पर्याय ठरू शकते, तर आम्ही सोबत काम करण्यास तयार आहोत, असे काहींनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मात्र, या गाठीभेटी फक्त चर्चेपुरत्या राहतील की काँग्रेस त्यातून काही ठोस भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसला खरोखरच भाजपविरोधात लढायचे आहे का? की फक्त निवडणुकीपुरतीच त्यांची रणनीती असते? असे प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही ही चर्चा जोरात सुरू आहे की, पक्षाने जर तळागाळातील काम वाढवले नाही, तर भाजपला पर्याय म्हणून त्यांची भूमिका कमी पडेल. ∙∙∙

समाजाची अशीही खंत

सध्या राज्यभरात भंडारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वराची रथयात्रा सुरू आहे. अनेक नेते श्री रुद्रेश्वरासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. भंडारी समाज बांधव रथयात्रेचे जोरदार स्वागत करताना दिसून येतात. रथयात्रेला यश मिळत असले तरी भंडारी समाजाला देवस्थान अद्याप सरकारच्या ताब्यात असल्याची खंत भेडसावत आहे. उपजिल्हाधिकारी देवस्थानचे प्रशासक असून सरकारने नेमलेली हंगामी समिती गेली काही वर्षे कार्यरत आहे. देवस्थानच्या महाजनांची यादी तयार झालेली नाही. त्यामुळे देवस्थानची निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट आहे. इतर देवस्थानांवर लोकनियुक्त समित्या येतील पण रुद्रेश्वर देवस्थान सरकारच्या ताब्यात किती काळ राहील, असा प्रश्‍न भंडारी समाजातील अनेकांना आता रथयात्रेच्या निमित्ताने पडू लागला आहे. ∙∙∙

आता कोण आग्रह करणार?

रविवारी मुख्यमंत्र्यांनी सांगे मतदारसंघाचा दौरा केला. अनेक विकासकामांना त्यांनी भेटी दिल्या आणि कामांची पाहणी केली. संपूर्ण दिवस त्यांनी सांगे तालुक्यात घालवला. सांगेचा दौरा केल्याने मंत्री सुभाष फळदेसाई हे भलतेच खूष झाले आहेत. या दौऱ्यात फळदेसाई एकदा पराभूत झाल्याने विकास खुंटला, असे सांगत फळदेसाई यांची दुखरी नस दाबलीच. परंतु आता तो पराभव पचवत त्यांनी तालुक्यात विकासकामांचा धडाका लावला आहे, काही ग्रामपंचायतींच्या इमारतींची कामे, पुलाची कामे करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी रविवारी अशाप्रकारे सांगे मतदारसंघातील विकासकामांची पाहणी केली, तशी आता इतर मतदारसंघातील कामांची पाहणी करावी, असा दौरा करण्याचा मुख्यमंत्र्यांकडे कोणता मंत्री किंवा आमदार आग्रह धरतो, अशी औत्सुक्यपूर्ण चर्चा सुरू झालीय. ∙∙∙

खाजनाची दुर्दशा

गोव्यातील जल, जमीन आणि जंगल वाचवून गोमंतकीय अस्मिता वाचवण्याच्या नावाखाली काही जाणांनी आपली राजकीय पोळी भाजली, परंतु दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा विसर या मंडळीला पडल्याचे दिसते. सध्या तिसवाडीत खाजन शेतीची जणू दुर्दशा झाल्याचे चित्र दिसते. मानस ठेकेदारांकडून छाती ठोकून नदीचे पाणी सोडले जात असल्याने शेती करणे अशक्य झाले आहे. त्यात काही आमदारांचे नातेवाईकच मानस ठेकेदारी करत असल्याने ही मंडळी खाजन वाचवणार ही आशा मावळल्यातच जमा झाली. हा प्रकार दिवसा ढवळ्या होत असल्यामुळे महसूल खात्याच्या खासकरून मामलेदारांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा तिसवाडीत ऐकू येते. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज: देव बोडगेश्‍वर कुणाला पावणार?

हो, लवकरच दर्जा मिळेल!

धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा मिळेल का, हा अनेकवर्षे चर्चिला जाणारा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री असताना बाबू कवळेकर जणू उद्याच हा दर्जा मिळेल, असे वावरत होते. दिल्ली वाऱ्याही त्यांनी केल्या. शेजारील राज्यांत धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा नाही. राज्यातील समाज हा धनगर- गवळी असा आहे. त्यासाठी आदिवासी दर्जा देण्यापूर्वी समाज कल्याण खात्याकडून रजिस्ट्रार ऑफ इंडिया यांनी आवश्यक ती माहिती मागवून घेतली आहे. या विषयाचा पाठपुरावा समाज कल्याण खात्याने करावा की आदिवासी कल्याण याविषयी एकवाक्यता नाही. कवळेकर यांनाही आता याविषयावरील प्रश्नाचे उत्तर काय द्यावे हा प्रश्न पडत असावा. त्यामुळे प्रयत्न सुरू आहेत, ‘हो लवकरच दर्जा मिळेल’, असे सांगून ते स्वतःची सुटका करून घेत असावेत. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: जनतेने मंत्र्यांना भेटावे कुठे? तानावडेंनी करून दिली मुख्यमंत्र्याच्या सूचनेची आठवण

डोंगराला आग आणि लोकांचे प्रश्न

नवीन वर्षाच्या रात्री जुनसवाडा - मांद्रे येथील वीज विभागाच्या उप केंद्राजवळील डोंगराला लागलेल्या आगीमुळे पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या तरुणांचा उपक्रम धोक्यात आला आहे. आगीच्या घटनेनंतर स्थानिक तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र, या आगीत अनेक झाडे आणि नव्याने लावलेल्या रोपट्यांचे नुकसान झाले. या उपक्रमाचे राजकीय नेत्यांकडून कौतुक झाले होते, परंतु आगीच्या घटनेनंतर अद्याप कोणत्याही नेत्याने ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही. मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक आणि आमदार जीत आरोलकर यांनी यापूर्वी या उपक्रमाचे कौतुक केले होते. मात्र, डोंगराला आग लागून १२ दिवस उलटूनही आमदार किंवा माजी सरपंचांनी साधी चौकशीही केली नाही. यामुळे नेत्यांचे कौतुक हे केवळ तोंडी असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांना जनतेची आठवण फक्त निवडणुकीतच होते का? असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक तरुणांनी पर्यावरण व पाणी व्यवस्थापनासाठी उभारलेला हा उपक्रम पाहण्यासाठी नेत्यांकडे वेळ नाही का? की केवळ प्रसिद्धीसाठी नेते या उपक्रमांचे कौतुक करत होते? असा संतप्त सवाल ऐकू येत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com