Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: अरे बापरे! त्यांनी म्हणे गावच विकला!

Khari Kujbuj Political Satire: आपल्या आजोबांनी व पणजोबांनी काय केले ते सांगण्यापेक्षा आपण काय दिवे लावले हे महत्त्वाचे असते. राज्यातील अनुसूचित जमातीच्या नेतृत्वासाठी मोठी स्पर्धा लागल्याचे आपण पाहात आहोत.

गोमन्तक डिजिटल टीम

अरे बापरे! त्यांनी म्हणे गावच विकला!

अरे सरकारा कुठे नेऊन ठेवलाय गोवा माझा. असे आता जनता डॉ. प्रमोद सावंत सरकारला विचारायला लागली आहे. राज्यात ‘कॅश फॉर जॉब’ व जमीन घोटाळा प्रकरणांनी भाजपा सरकारपुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राज्यातील जमीन घोटाळ्यांची चौकशी एसआयटीमार्फत केली जात असतानाच केपे मतदारसंघातील वंटे हा गावच एका स्थानिकाने परस्पर विकून टाकल्याचे उघड झाले आहे. कोविड काळात काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून गावाची वीस लाख चौ. मी. जागा एका व्यक्तीने खोट्या ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’च्या आधारावर इन्वेंट्री करून परस्पर विकल्याचे उघड झाले आहे. या गावातील बहुतांश लोक गाव सोडून इतरत्र राहत असल्याच्या संधीचा फायदा घेऊन गावच विकण्याचे धाडस एक इसम करू शकतो व आपले सरकार व कायदा यात काहीही करू शकत नाही याला काय म्हणावे? म्हणूनच आता लोक म्हणायला लागले आहेत गो गोवा गॉन... ∙∙∙

बिरसा मुंडाच्या वारसासाठी चढाओढ!

आपल्या आजोबांनी व पणजोबांनी काय केले ते सांगण्यापेक्षा आपण काय दिवे लावले हे महत्त्वाचे असते. राज्यातील अनुसूचित जमातीच्या नेतृत्वासाठी मोठी स्पर्धा लागल्याचे आपण पाहात आहोत. या समाजातील एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये एसटी समाजाचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी चढाओढ लागली आहे ही बाब आता लपून राहिलेली नाही. एसटी समाजाचे भगवान मानले जाणारे बिरसा मुंडा यांचा वारसा हक्क मिळविण्यासाठी मंत्री गोविंद गावडे व सभापती रमेश तवडकर मैदानात उतरले आहेत. परवा गोविंद गावडे यांनी प्रकाश वेळीप यांच्या सहयोगाने उटाच्या द्विदशक सोहळ्यानिमित्त एसटी समाजाला एकत्र करून आपली ताकद दाखवली. आता पंधरा तारखेला रमेश तवडकर यांनी भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. गोविंद गावडेंच्या मेळाव्यात जी गर्दी झाली होती, तो रेकॉर्ड तोडण्याचे आव्हान रमेश सरांना स्वीकारावे लागणार आहे. मात्र, यात भरडला जात आहे तो एसटी समाज. आमचे तर ढोलक बनले आहे. एका बाजूने गोविंद वाजवतात, तर दुसऱ्या बाजूने रमेश बडवतात. असे आम्ही नव्हे एसटी समाजातील युवा वर्ग म्हणत आहे. ∙∙∙

मायकल मांद्र्यात!

मांद्रे मतदारसंघात आमदार मायकल लोबो यांची लोकप्रियता वाढत असून ते सध्या गाठीभेटी घेत कार्यक्रम आयोजित करण्यात सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी हरमल येथे स्वखर्चाने एक कार्यक्रम आयोजित केला. यामुळे २०२७ च्या निवडणुकीत शिवोलीत त्यांचा मुलगा आणि मांद्रेत पत्नी डिलायला ही निवडणूक लढवू शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. लोबो यांच्या या वाढत्या सक्रियतेमुळे सध्याचे आमदार जीत आरोलकर यांना धक्का बसला आहे. आरोलकर यांचे काही कार्यकर्ते आणि पंच सदस्य आता लोबो यांच्या संपर्कात आल्याच्या बातम्या आहेत. यामुळे मांद्रेत आरोलकर यांची हुकूमशाही संपण्याची चर्चा सुरू झाली आहे. लोबो यांच्या वाढत्या प्रभावामुळे मांद्रेची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात मांद्रेतील राजकीय वातावरण अधिकच रंजक होणार आहे.∙∙∙

गोवा डेअरीचा सुस्त कारभार!

गेल्या विधानसभा अधिवेशनावेळी विरोधी पक्षाच्या आमदाराने गोवा डेअरीतील बेजबाबदार कारभाराबाबत आवाज उठवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता, तरीसुद्धा डेअरीचे प्रशासक जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना काहीच फरक पडलेला दिसत नाही. कारण काही महिन्यांपूर्वी गोवा डेअरीतील एक साहेब नियमबाह्य आपल्या कामाव्यतिरिक्त जीवन विमा एजन्सी चालवत असल्याबाबतचा खुलासा प्रशासनापुढे करण्यात आला होता. तशी लेखी तक्रारही प्रशासकांकडे करण्यात आली होती. त्या अतिरिक्त त्याच कर्मचाऱ्यावर गोवा डेअरीच्या कागदपत्रांचा वापर करून खोटे दाखले तयार करण्यासारखी गंभीर स्वरूपाची तक्रार करूनही प्रशासकांना जाग आलेली दिसत नाही. हे सगळे निदर्शनास आणून दिले तरीदेखील त्या कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जर सरकारी अधिकारीच आता अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालायला लागले, तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? नुकताच म्हणे तो कर्मचारी सेवानिवृत्तही झाला, तरी डेअरीच्या सुस्त प्रशासनाला जाग आलेली नाही असेच दिसते आहे. जर अशा प्रशासकाच्या हाती डेअरीचा कारभार जास्त काळ राहिला, तर डेअरी व गोव्याच्या दूध उत्पादकांचे काय? हा प्रश्र्न सामान्य जनतेला पडलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी याविषयी गंभीरपणे दखल घेतली तरच काही खरे म्हणायचे. ∙∙∙

निरुद्योगींचे कारभार

कारवारच्या दोघांचे कारभार आणि कारनामे अजबच आहेत. कोकणीच्या नावावर उपद्रवी कृत्ये करून आपली पोळी भाजून घेण्याचा हा प्रकार आहे. दोन ओळी कोंकणी लिहिता येत नाही. त्यात पायलीला पंचवीस चुका. पण डिजिटल पोस्टर काढायला हे बेकार पुढे. ऐट पराकोटीची, कारवारी ‘झेताची’, आदोगाशी ‘वांयगणी’, असंसदीय, आक्षेपार्ह, बाष्कळ शब्दकोट्या करून कोकणीची सेवा होत नाही. हे लोक जन्माला येण्यापूर्वी म्हालगडे कोकणी लिहीत होते व आजही सक्रिय आहेत. आज कोकणी हा मंच धिंगाणा घालायला एक चांगलं अंगण मिळालं आहे. नाठाळाच्या माथी हाणू काठी असं संत तुकारामांनी म्हटलं आहे. संत म्हणतात, अंत असतोच, माजोरीचा! इथं तर उंदीर सिंहाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. ∙∙∙

सगळेच संशयाच्या नजरेत?

सध्या गोव्यात ‘कॅश फॉर जॉब’ याचे जाळे सर्वत्र पसरलेले दिसत आहे. रोज नवीन प्रकार समोर येत आहेत, अशातच अलीकडे नोकरभरती झालेले थोडेसे दचकून असतात. काहीजण सांगतात की, आम्ही बाबा मेरिटवर भरती झालो आहोत. त्यामुळे पैसे वगैरे असे प्रकार भरतीवेळी चालत नाही असे संबंधितांचे मत! यात पोलिसात भरती झालेले ही विधाने खासगीत सांगताना दिसताहेत. अलीकडच्या बातम्यांमुळे भरती प्रक्रियेकडे सर्वचजण संशयाच्या नजरेने पाहू लागलेत हेच यातून अधोरेखित होते, एवढे नक्की. ∙∙∙

‘ठकसेन गॅंग्स ऑफ गोवा’!

राज्यात सध्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा गाजत असून दिवसेंदिवस नवीन ठकसेनांची नावे उघड होत आहेत. प्रथम पूजा नाईक, नंतर पूजा यादव, दीपश्री सावंत गावस यांच्यासह संदीप परब, योगेश शेणवी कुंकळ्ळीकर, सुरज नाईक अशी नवीन नावे समोर येण्याचे सत्र थांबेना. सरकारी नोकरी सहसा मिळवणे ही सोपी गोष्ट नसून या माणसांनी आपली ‘गँग’ करून कारभार चालवल्याचे दिसते. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ नावाचा चित्रपट प्रसिद्ध असल्याने जे काही गोव्यात घडत आहे ते जणू चित्रपटाची कथाच असल्यासारखे वाटते. त्यामुळे भविष्यात जर कोणी याचे रूपांतर चित्रपट किंवा वेब सिरीजमध्ये करेल त्याला ‘ठकसेन गँग्स ऑफ गोवा’ हे नाव योग्य ठरेल. ∙∙∙

घोटाळ्याचा शेवट कसा होणार?

सध्या गोव्यात ज्याच्या त्याच्या तोंडात असलेल्या सरकारी नोकरी घोटाळ्याचा शेवट कशात होणार त्याबाबत नानाविध तर्क लढविले जात आहेत. पोलिस यंत्रणाही म्हणे या प्रकरणाचा तपास करताना गोंधळून जात आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित त्यात पूर्णतः अडकले आहेत, पण माफीचे साक्षीदार बनलेले त्यातून सुटण्याची शक्यता कमी आहे. या प्रकरणात कोणी उच्चपदस्थ राजकारणी वा सरकारी अधिकारी यांचा सहभाग असो वा नसो, पण ज्या लोकांनी सरकारी नोकरीसाठी लाखोंची रक्कम या भामट्यांच्या स्वाधीन केली आहे ती कधीकाळी परत मिळणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण अशा अनेक प्रकरणांत यापूर्वी संबंधितांना काहीच मिळालेले नाही. संचयनीसारख्या प्रकरणात सर्वसामान्यांचे पैसे बुडाले. अर्थात ते हजारोंच्या संख्येत होते, तर या घोटाळ्यात ते प्रमाण लाखांत आहे. या प्रकरणातील मध्यस्थ वा दलालांबाबतही लोकांमध्ये संताप असून त्यांना माफीचा साक्षीदार न करता संशयित करावे अशी मागणी होऊ लागली आहे. कारण अशा प्रकरणात फसले गेलेले या मध्यस्थांचे नातेवाईक वा सगे आहेत. त्यांनी आता सज्जनतेचा कितीही आव आणला तरी तेही या प्रकरणात संशयित आरोपीच ठरतात. हे प्रकरण पाहता मध्य प्रदेशमधील सत्यम घोटाळ्याची आठवण म्हणे अनेकांना झाली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT