पणजी: राज्याला (Goa) काल रविवारी पावसाने मेघगर्जनेसह (Rainfall) झोडपले. अचानक पावसाने दमदार हजेरी लावल्याने नरकासुर (Narkasur) बनविणाऱ्या तरुणांच्या उत्साहावर पाणी पडले. शनिवारपासून राज्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बुधवारपर्यंत पाऊस राहील, असे हवामान खात्याच्या वेधशाळेने म्हटले आहे.
सायंकाळी पेडणे परिसरात पावसाने हजेरी लावली. पेडणे, हळदोणे, साखळी, वाळपई, सत्तरी, काणकोणसह लगतच्या परिसरात तब्बल तासभर तुफान पाऊस झाला. त्यानंतर ढग दक्षिणेकडे वळले. पावसाने अवघ्या तासाभरात संपूर्ण राज्याला झोडपून काढले. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांची पुरती तारांबळ उडाली.
सत्तरी, पेडणे या तालुक्यांत सध्या भात कापणीचा हंगाम सुरू आहे. या पावसामुळे ते काम रखडले असून भातपिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
पणजीसह विविध शहरांतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सुट्टीनिमित्त घराबाहेर पडलेल्यांची तसेच किनारी भागात फिरायला आलेल्या पर्यटकांची तारांबळ उडाली. 23 आक्टोबरला मान्सूनने माघार घेतल्यानंतर आठवडाभर पावसाने उसंत घेतली होती. मात्र, समुद्री भागात हालचाली वाढल्यामुळे किमान बुधवारपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम असेल, असे हवामान खात्याच्या वेधशाळेने म्हटले आहे.
नरकासुराला ‘दे धक्का’
दिवाळी अवघ्याच दिवसांवर येऊन ठेपली असल्याने नरकासुर बनविण्यात मग्शुल असलेल्या तरुणांच्या उत्साहावर पावसाने रविवारी विरजण टाकले. अचानक पाऊस येऊन थडकल्यामुळे नरकासुराच्या भल्या मोठ्या प्रतिमांचे पावसापासून रक्षण करताना तरुणांच्या नाकीनऊ आले. तरीही काही ठिकाणच्या प्रतिमांचे नुकसान झाल्यामुळे या मंडळांना आर्थिक फटका बसला आहे. नरकासुर प्रतिमा बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच अस्मानी संकट कोसळल्याने तरुणांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.