महागाईचा ‘नरकासुर’ जनतेच्या मानगुटीवर

हाताला काम मिळत नसल्याने गावातील तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून काहीजण गुन्हेगारी क्षेत्रातही पावले टाकत आहेत.
महागाईचा ‘नरकासुर’ जनतेच्या मानगुटीवर
महागाईचा ‘नरकासुर’ जनतेच्या मानगुटीवर Dainik Gomantak

‘अच्छे दिन आयेंगे’ या घोषणेने जनतेला मोहात टाकले. या ‘अच्छे दिनां’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेच्या नशिबी ‘बुरे दिन आयो रे भैय्या’ म्हणण्याची वेळ आली आहे. नोटाबंदीनंतर कोरोना महामारीने संकटात ओढले. अनेकांचे व्यवसाय बुडाले, नोकऱ्या गेल्या. कित्येक जण बेरोजगार होऊन घरी बसले. या सर्व गोष्टींतून सावरण्याचा प्रयत्न करतो न करतो तोच आता महागाईचा ‘नरकासुर’ जनतेच्या मानगुटीवर बसला आहे. दहा वर्षांपूर्वी जी वस्तू 10 रुपयांना मिळायची ती आता शंभरीवर पोहोचली आहे. महागाई वाढते याची कल्पना आहे. परंतु, ती इतक्या झपाट्याने वाढेल, ही कल्पना सर्वसामान्‍यांनी कधीही केली नव्हती. आता पेट्रोलने शंभरी गाठली, गॅसही हजारीच्या उंबरठ्यावर आहे. भाजीपाला व इतर वस्तूंच्या किंमतीचे वाढते दर थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामानाने लोकांच्या कमाईची आवक मात्र तशीच आहे. गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

1 किलो भाजी घेणारी गृहिणी आता अर्धा किलो भाजी घेऊन घरी परतत आहे. खर्चाला लगाम लावावा तरी कसा? या विवंचनेत प्रत्येकजण आहे. काँग्रेसच्या काळात महागाई विरुद्ध अनेक आंदोलने झाली. आताही लोक निषेध नोंदवत आहेत. 1973 मध्ये काँग्रेसच्या विरोधात दिवगंत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी बैलगाडीत बसून संसदेपर्यंतचा प्रवास केला होता. हे आंदोलन चांगलेच गाजले होते. समाज माध्यमावर त्या आंदोलनाची आठवण करून दिली जात आहे. अशी आंदोलने आता नवीन राहिली नाहीत. त्याचा कितपत परिणाम सरकारवर होतोय, याचा इतिहासही आपण पाहिलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती काहीच लागत नाही. एका मध्यमवर्गीय कुटुंबात पूर्ण पगार एका हातात, तर दुसऱ्या हातून तो कसा निघूनही जातो, हे कळतही नाही. भविष्यासाठी त्याच्याकडे कोणतीही बचत उरत नाही.

महागाईचा ‘नरकासुर’ जनतेच्या मानगुटीवर
तेरेखोलवासी सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य सरकारवर अवलंबून

महागाईचा मुद्दा हा केवळ देशापुरताच नाही, तर तो आता वैश्विक पातळीवरचा बनला आहे. पाकिस्तान सारख्या देशात तर भयानक परिस्थिती आहे. यामुळेच लोक गुन्हेगारीकडे वळत आहेत. पाकमध्ये दोनवेळचे जेवण मिळणे मुश्किल बनले आहे. कोरोनानंतर तर महागाईचा वेग अधिकच वाढला आहे. भारत सरकारने गरिबांना मोफत गॅस कनेक्शन दिले. आता त्याच महिलांकडे सिलिंडर भरण्यासाठीही पैसे नाहीत. ते पुन्हा चुलीचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे ‘आम्ही जगावे तरी कसे?’, असा प्रश्न सर्वसामान्य माणूस विचारू लागला आहे.

देशात वाढत असलेल्या या ‘कंबरतोड’ महागाईची कारणे वेगवेगळी आहेत. वाढता भ्रष्टाचार हे त्यातील एक कारण आहे, जे थांबण्याचे नावच घेत नाही. एक व्यापारी कमी किंमतीत वस्तू विकत घेतो आणि त्याची साठवणूक करतो. जेव्हा बाजारात वस्तूंची आवक कमी होते, तेव्हा त्या वस्तूंचे मूल्य इच्छेनुसार वाढवून ती विकतो. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. त्यासाठी सरकारकडून कडक कायद्याची गरज आहे. जो व्यापारी अतिप्रमाणात साठेबाजी करतो त्याविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. सरकारने शेतकऱ्यांना कर्जसुविधा, सिंचन व्यवस्था, शेतीवर आधारीत उद्योगांना वाव मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात योजना आखायला हव्यात. विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणी तितक्याच वेगाने व्हायला हवी. भारतात सध्या हवामान बदलाचा जबर फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कोरडा दुष्काळ आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांचा माल खराब झाल्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढतात. बाहेरून निर्यात केल्या जाणाऱ्या कच्च्‍या मालावर सरकार टॅक्स वाढवितो. त्यामुळे व्यापारीही नफा मिळवण्यासाठी त्या वस्तूंच्या किंमती वाढवतात. परिणामी, महागाई वाढते. बाजारात मागणी आणि पुरवठा यातील अंतरानेही महागाईचा आलेख वाढत असतो.

महागाईचा ‘नरकासुर’ जनतेच्या मानगुटीवर
Goa: ‘दाबोळी’ आंतरराष्ट्रीय विमानांसाठी बंद झाल्यास पर्यटन व्यवसायाला फटका

गोव्यात पर्यटन हा मुख्य व्यवसाय असल्याने या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला. गेल्या दोन वर्षांपासून पर्यटनावर आधारीत व्यावसायिक घरी बसले होते. त्यांनी काही काळ कळ सोसली. परंतु, आता त्यांना ते सहन होण्यापलीकडचे झाले आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, संसाराचा डोलारा चालविण्यासाठी तेही धडपडू लागले आहेत. हाताला काम मिळत नसल्याने गावातील तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून काहीजण गुन्हेगारी क्षेत्रातही पावले टाकत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर फोंड्यात पैशांसाठी दोन बहिणींचा खून केल्याची घटना सांगता येईल. पैशांच्या कारणावरून गळे कापायलाही युवावर्ग मागे पुढे पाहत नाही. हाताला काम मिळाले नाही, तर ते कोणत्याही गुन्ह्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे युवकांना रोजगाराच्या वाटा कशा मोकळ्या होतील, यासाठी सरकारने लवकरात लवकर प्रयत्न करायला हवेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा महागाईचा ‘नरकासुर’ हा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com