Khari Kujbuj Political Satire Dainiak Gomnatak
गोवा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

Khari Kujbuj Political Satire: संयमाचे फळ गोड असते म्हणतात ते खरे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत गेल्या वीस वर्षांपासून साठवून ठेवलेल्या घातक विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा अखेर सरकारला मुहूर्त मिळाला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

औचित्य वाढदिवसाचे!

पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी आपल्या मतदारसंघातील केरी गावात वाढदिवस साजरा करण्यास प्राधान्य दिले. सत्तरीवासीयांची मांदियाळी या वाढदिवसाला जमली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जातीने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोर्ले आणि केरी पंचायतींचे उद्‍घाटन केले व श्री आजोबाच्या तळीवर गंगा पूजा करण्यात आली. अध्यात्म, विकास, वाढदिवसाचा उत्साह आणि राजकारण असा संगम वाढदिनी झाला होता. एकंदरीत तरुणाई आणि ज्येष्ठांची झालेली गर्दी पाहता येत्या विधानसभा निवडणुकीतदेखील सर्वाधिक मते घेत त्या विजयी होणार असल्याचे बोलले जात आहे? ∙∙∙

‘क्राईम ब्रँच’चा तपासाचा हत्ती!

हत्ती दाराबाहेर गेला तरी त्याचे शेपूट अडकते, अशी म्हण आहे. सध्या गौतम खट्टर प्रकरणात तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचचीही स्थिती तशीच झाली असावी. कुठल्याही गुन्ह्याची शिक्षा सात वर्षांपेक्षा कमी असल्यास त्याला त्याच्या अटकेची कल्पना देणारी आगाऊ नोटीस देणे कायद्याने बंधनकारक असून ही देशात सगळीकडे चालू असलेली सर्वमान्य पद्धती; पण द्वेषमूलक भाषण प्रकरणाचा तपास करताना क्राईम ब्रँच पोलिसांनी माधव खट्टर आणि गौतम खट्टर या दोघांनाही अटक करताना ही नोटीस दिलेली नाही, हे आता उघड झाले आहे. म्हणजे तांत्रिक मुद्यावर पोलिसांची बाजू बऱ्याच प्रमाणात लंगडी पडली आहे. पोलिसांकडून ही चूक खरेच अनवधानाने झाली की मुद्दामहून ही त्रुटी ठेवली गेली? कोण बरे याचे उत्तर देईल? ∙∙∙

पोलिस ‘पपेट’ बाहुली?

वास्कोतील ‘त्या’ वादग्रस्त भाषणाच्या प्रकरणात पोलिसांनी आता जी कोलांटउडी मारली आहे, ती पाहून सामान्य जनता थक्क झाली आहे. ज्या माधव खट्टरला पोलिसांनी मोठ्या थाटात अटक केली, आता खुद्द पोलिसच न्यायालयात सांगत आहेत की, त्या भाषणाशी माधवचा थेट संबंध नव्हता आणि ते भाषण गौतमनेच लिहिले होते. मग प्रश्न असा पडतो की, इतके दिवस पोलिसांना हे माहीत नव्हते का? की केवळ कोणा बड्या नेत्याला किंवा विशिष्ट गटाला खुश करण्यासाठी ही अटकेची घाई केली गेली होती? सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे की, हा सर्व ‘तुघलकी कारभार’ कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे? आधी विनाकारण कोणाला तरी अटक करायचे आणि नंतर पुराव्याअभावी कच खाऊन स्वतःचेच शब्द फिरवायचे, यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे! शेवटी, सत्यापेक्षा सोयीच्या राजकारणाला इथे महत्त्व मिळाले की काय, हीच मोठी शंका आहे! ∙∙∙

संघटनेचा अध्यक्ष बनणे फायद्याचा सौदा!

‘जो तळे राखणार, तो पाणी चाखणारच’ अशा आशयाचे एक बोधवाक्य आहे. मडगाव नगरपालिकेच्या मालकीच्या एका बाजार संकुलाचे दुरुस्तीकाम सुरू आहे. यासाठी पालिकेने एका कंत्राटदाराला हे कंत्राट सोपविले आहे. मात्र, संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने या कंत्राटदाराकडून आपल्या दुकानाची दुरुस्ती करून घेतली आहे. बाजाराचा पात्रांव सांगतो म्हटल्यावर तो कंत्राटदार नाही कसा म्हणणार. शिवाय हा बाजारकार पात्रांव मडगावच्या मोठ्या बाबा पात्रांवाचा उजवा हात. कंत्राटदाराने म्हणे झक मारत त्या पात्रांवाच्या दुकानाचे दुरुस्तीकाम मोफत करून दिले. ‘फुलू खुस्तार खोजने’, म्हणतात ते असे! ∙∙∙

पालथ्या घड्यावर पाणी!

राज्यात मागे एका लहान मुलाचा पिटबूल श्‍वानाच्या हल्ल्यानंतर मृत्यू झाला होता. हिस्त्र श्‍वान पाळल्यास, त्यांनी इजा केल्यास कारवाई करण्यात जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. या गोष्टी केवळ कागदोपत्रीच होताना दिसत आहेत, प्रत्यक्षात कारवाई काहीच नाही, अशी स्थिती आहे. राज्यात पाळीव तसेच भटक्या श्‍वानांमुळे अपघात होणे, जीवितहानीचे प्रकार वाढले असून पशुसंवर्धन खात्याकडून यावर आळा घालण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र पालथ्या घड्यावर पाणी अशीच स्थिती आहे. ∙∙∙

‘आंबा महोत्सवा’चे घोडे अडते कुठे ?

कृषी संचालनालयातर्फे २०२४ साली कला अकादमीत पहिल्या ‘आंबा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत या महोत्सवाचे आयोजनच करण्यात आले नाही. चौकशी केल्यास समजले की,

आंबा महोत्सव तीन वर्षांतून एकदा आयोजित करण्यात येणार आहे. जर राज्यात इतक्या विविधांगी महोत्सवांचे आयोजन केले जात असेल तर शेतकऱ्यांना आणि गोमंतकीय आंब्याला प्राधान्य देणाऱ्या आंबा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी का करण्यात येऊ नये? अशी चर्चा सध्या सुरू आहे. खरेतर यंदा आंब्याचे पीक उत्तम आले आहे. पुढच्या वर्षी तसे येईलच याची शाश्‍वती नाही, असे

असताना दरवर्षी आंबा महोत्सव आयोजनाचे घोडे नेमके अडते कुठे? असा प्रश्‍न शेतकऱ्यांमध्ये चर्चिला जात आहे. ∙∙∙

विक्रेत्यांचा प्रश्न सुटेल?

दोनापावला जेटीवरील विक्रेत्यांचा प्रश्न अजूनही कायम आहे. तो कधी सुटणार आहे, हे कोणास ठाऊक. राजकारणामुळे हा प्रश्न सुटण्यास विलंब झाला, हे सर्वश्रुत आहे. आधीच्या नगरसवेकाने या विक्रेत्यांसाठी काही पर्याय महानगरपालिकेसमोर ठेवले होते; पण तो नगरसेवक पडला अपक्ष, त्यामुळे यावर काय होऊ शकते, हे नमूद करायला नको. मात्र, मंगळवारी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष, संचालकांसमवेत महापौर रोहित मोन्सेरात यांनी बैठक घेतली. या बैठकीत दोनापावला व मळा परिसराचे वैशिष्ट्य जपण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर चर्चा झाली. महापौरांनी पुढाकार घेऊन जर दोन्ही ठिकाणचा कायापालट होणार असेल तर निश्चितच चांगली बाब आहे, त्यामुळे दोनापावला येथील विक्रेत्यांचा रखडलेला कित्येक दिवसांपासूनचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. ∙∙∙

आता दीपक पाऊसकरांची क्रिकेट स्पर्धा

सावर्डे मतदारसंघाचे आमदार असलेल्या सभापती गणेश गावकर यांनी आयोजित केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे सामने सध्या धूमधडाक्यात सुरू असतानाच माजी आमदार दीपक पाऊसकर यांनीही आपली क्रिकेट स्पर्धा जाहीर केली असून १ मे रोजीपासून या स्पर्धेचा धूमधडाका पाहायला मिळणार आहे. आता विधानसभा निवडणूक जवळ आल्याने अशा स्पर्धांचे आयोजन होणे साहजीकच. आतापर्यंत कित्येक क्रिकेट स्पर्धांना स्पॉन्सरशीप देणारे संकेतभाई आर्सेकर आपली स्पर्धा कधी आयोजित करणार, याबाबतही चर्चा रंगली आहे.∙∙∙

उर्फानचे राजकीय वजन!

गोवा हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला हे सध्या ‘पॉवरफूल’ बनले आहेत. काँग्रेस ते भाजप असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. भाजपचे ते मुस्लीम नेता ‘चेहरा’ म्हणून ओळखले जात आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते सुरवातीला दिगंबर कामत यांच्यावर गरळ ओकत होते. मागाहून कामत भाजपवासी झाल्यानंतर मुल्ला यांनी कामतांचे गुणगाण गायला सुरुवात केली व विजय सरदेसाई यांच्यावर शरसंधान साधले. राजकारणात नेमक्या वेळी कोणता तीर मारावा, हे ‘बबलू’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या मुल्ला यांना नेमके माहीत आहे. विधानसभा निवडणूक आता पुढच्या वर्षी होणार आहे. नावेलीत मुस्लीम धर्मीयांची मते वाढली आहेत. ही मते येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी निर्णयाक ठरणार आहेत. उर्फान मुल्ला हे आपले राजकीय डावपेच रचू लागले आहेत व नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर हेही त्यावर बारीक नजर ठेवून आहेत बरे का..! ∙∙∙

फसलेली म्युटेशन शिबिरे

गोव्यातील बहुतेक मामलेतदार कार्यालयात पडून असलेली म्युटेशन प्रकरणे प्रचंड आहेत. त्याबाबत लोकांच्या तक्रारी वरचेवर येत असतात. त्याचसाठी सरकारने ही प्रकरणे हातावेगळी करण्यासाठी गेल्या रविवारी उत्तर गोव्यातील विविध तालुक्यात विशेष म्युटेशन शिबिरांचे पण त्याला तसा प्रतिसाद मिळाला नाही. उत्तरेत दोन हजारांवर प्रकरणे प्रलंबित असताना या शिबिरांत केवळ २१६ अर्जच म्हणे निकाली काढले. त्यामागील कारण जे आता पुढे आले आहे ते पहाता ‘आंधळे दळते अन् कुत्रे पीठ खाते’ त्याचीच प्रचिती आली. उत्तर गोव्यांतील उपजिल्हाधिकारी व मामलतदार म्हणे लईराई जत्रेच्या व्यवस्थेत व्यस्त असल्याने म्हणे ते म्युटेशन प्रक्रियेला पूर्ण वेळ देऊ शकले नाहीत, तसे होते तर ही शिबिरे पुढे का ढकलली नाहीत, याचे उत्तर मात्र संबंधितांकडे नाही. ∙∙∙

महाभारतातील नाट्याचा आवाका!

८२ वर्षांचे अशोक समेळ हे नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते आहेत. ‘अश्वत्थामा’ याविषयावर सखोल संशोधन करून त्यांनी लिहिलेल्या गलेलठ्ठ कादंबरीच्या ९ आवृत्त्या निघाल्या. त्यांनी याच विषयावर नाटक लिहिले आहे, त्याचा शुभारंभी प्रयोग ठाण्यात शुक्रवारी होणार आहे. काश्मीर व इतर प्रदेशात जाऊन त्यांनी ‘अश्वत्थामा’संबंधित संदर्भांचे संशोधन केले. समेळांकडून शिकण्याजोगे खूप आहे. सगळे येते म्हणणाऱ्या आमच्या कथित नटांनी व दिग्दर्शकांनी, महाभारताच्या एका पात्रावर इतके शिकून इतके लिहिणे म्हणजे पोरखेळ नव्हे. फुशारक्या मारणे सोपे. कादंबरीचा आवाका व परीघ केवढा असतो, त्याचा हा पुरावा. १५० पानांच्या दीर्घकथेला कादंबरी म्हणण्याचा प्रघात गोव्यात पडला आहे. नाटकाच्या परीक्षकांना घुमट आरतीतील समेळ वाद्य माहीत असेल; पण अशोक समेळ व इतर अद्ययावत ज्ञान तोकडेच. सध्या कला अकादमीचे नाट्य - महाभारत विविध वळणे घेत आहे. याच्यावरच एक महानाट्य लिहिता येते. ∙∙∙

कार्यकर्त्यांच्‍या आग्रहामुळे मनोजशी फारकत!

आगशीचे पंच ज्‍युलियस आल्‍मेदा यांच्‍यावरील कारवाईनंतर रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षात (आरजी) उभी फूट पडल्‍याचे आणि पक्षाध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर असे दोन गट पडल्‍याचे आतापर्यंत स्‍पष्‍ट झाले होते. आता ‘आरजी’ने ज्‍या सोशल मीडियाचा आधार घेऊन शेकडो कार्यकर्ते जोडले, त्‍याच सोशल मीडियाचे महत्त्‍वपूर्ण साधन असलेल्‍या फेसबुकवर परब आणि बोरकर यांनी एकमेकांना ‘अनफॉलो’ केल्‍याने कार्यकर्ते गोंधळात पडलेले आहेत. आल्‍मेदा यांच्‍यावरील कारवाईनंतर वीरेश यांनी मनोज परब यांची साथ सोडावी, असा तगादा सांतआंद्रेतील कार्यकर्त्यांनी लावल्‍यामुळेच वीरेश यांनी परब यांच्‍यापासून फारकत घेण्‍यास सुरवात केल्‍याची चर्चा सध्‍या ‘आरजी’च्‍या कार्यकर्त्यांत सुरू आहे. ∙∙∙

‘तो’ केवळ इशाराच?

राज्‍यातील मोकाट गुरांमुळे होणाऱ्या अपघातांना ती गुरे जबाबदार नसून त्‍यांचे मालक जबाबदार असतात, असे वक्तव्‍य मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी केले. अशा गुरांची जबाबदारी पंचायत खात्‍याने घ्‍यावी आणि गोशाळांशी सामंजस्‍य करार करून तेथे ती सोडावी, असेही त्‍यांनी सांगितले; पण ही विधाने करीत असताना अपघातांना जबाबदार असलेल्‍या गुरांच्‍या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्‍याचा इशारा आपण याआधी दिलेला होता, हेच ते विसरले. मुख्‍यमंत्र्यांच्‍या या इशाऱ्यानंतर राज्‍यात अशाप्रकारचे शेकडो अपघात झाले. तरीही त्‍यातील एकाही प्रकरणात गुराच्या मालकावर कारवाई का झाली नाही? असा प्रश्‍‍न आता अनेकजण विचारत आहेत. ∙∙∙

विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

संयमाचे फळ गोड असते म्हणतात ते खरे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत गेल्या वीस वर्षांपासून साठवून ठेवलेल्या घातक विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा अखेर सरकारला मुहूर्त मिळाला. आमदार युरी आलेमाव यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले. राज्य सरकारने गेल्या वीस वर्षांपासून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत साठवून ठेवलेला घातक कचरा तेथून हलवून विल्हेवाट लावण्याची योजना आखली आहे. कचरा उलचलण्याचे काम या आठवड्यात होणार आहे. सरकार यासाठी पंधरा कोटी रुपये खर्च करणार आहे. कुंकळ्ळीला अखेर त्या घातक विषारी कचऱ्यातून मुक्ती मिळणार असल्यामुळे स्थानिक खुश आहेत. एक मात्र खरे की, युरी विरोधकही आता म्हणू लागले आहेत, युरी है तो मुमकीन है! ∙∙∙

पार्किंग स्थानकावर आतिक्रमण!

मडगावात जिथे जिथे दुचाकी पार्किंग करण्याची ठिकाणे आहेत, तिथे काही स्थलांतरित हातात दुचाकी सीट कव्हर विक्री करताना दिसतात. सीट कव्हर विकत घेण्यासाठी दुचाकी चालकावर दबाव आणतात. जर विकत घेतले नाही, तर पार्क करून ठेवलेल्या दुचाकीचे कव्हर धारदार शस्त्राने कापले जाते, असा अनुभव कित्येक जणांना आला आहे. यावर अजून कोणी आवाज उठवला नसला तरी नगरपालिका, पोलिसांनी याची दखल घेणे व त्यांना तिथून हटवणे, गरजेचे आहे, अशी चर्चा वाहन चालकात सुरू आहे. नगरपालिका, पोलिस नागरिकांसाठी कारवाई करेल का? हा प्रश्न चर्चेत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'दुचाकी की चालतं-फिरतं मृत्यूचं जाळं', चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बापाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल

Goa Panchayat Construction : कचरा कंत्राटदारांवर आता 'जीपीएस'ची नजर; विकसित गोवा पंचायत संमेलनात मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन!

Lakshmi Narayan Rajyog: "बुध-शुक्राची जुळली युती, लक्ष्मी नारायण योगाची प्राप्ती!" परदेश प्रवासासोबत अचानक धनलाभाचे संकेत

Goa Murder Case: स्वीडिश पर्यटकाच्या आईचा लढा अपयशी? कोर्टाकडून सीबीआयचा 'क्लोजर रिपोर्ट' मंजूर; हत्येचा पुरावा न मिळाल्यानं तपास बंद

जम्मू-काश्मीर अन् लद्दाख दाखवले पाकिस्तानचा भाग, नेपाळ एअरलाईन्सच्या नकाशाने खळबळ; अखेर भारतीयांच्या संतापापुढे झुकली कंपनी

SCROLL FOR NEXT