

आता श्रद्धांजलीचेही राजकारण!
फोंडा पोटनिवडणूक रद्द झाली आहे व त्या वस्तुस्थितीत कोणताही बदल संभवनीय नाही. असे असतानाही त्या वरून सुरू असलेला वाद संपण्याचे नाव घेत नाही. प्रत्येकजण त्यासाठी आपल्याला हवा तो मुद्दा उपस्थित करत आहे, त्यात कोणतेच तथ्य नसते. पण त्यामुळे लोकांची मात्र करमणूक होतेय. भाजपने तेथील प्रचारात रितेश यांना मतदान करा व रवी नाईक यांना श्रध्दांजली अर्पण करा, असे भावनिक आवाहन केले होते. तोच मुद्दा पकडून उत्पल पर्रीकर यांनी तशीच श्रध्दांजली भाजपने मनोहर पर्रीकर यांना का वाहिली नाही, असा सवाल केला. पण काही भाजपवालेच म्हणतात की, भाईंना त्यांच्या पुत्रांना राजकारणात आणण्याचे नव्हते, तसा कोणताच प्रयत्न त्यांनी ते पदावर असताना केला नव्हता. हे उत्पल कसे विसरतात, उलट रवींनी रितेशना राजकारणात आणले होते, हा फरक आहे. ∙∙∙
आणखी अधिवेशन कशाला?
फोंडा पोटनिवडणूक जाहीर झाल्याने गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन अर्धवट असतानाच स्थगीत केले होते. आता ती निवडणूकच रद्द झाल्याने नवे अधिवेशन बोलवा व कामकाज पूर्ण करा अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे व त्यांनी त्या संदर्भात राज्यपालांना निवेदनही सादर केले आहे. वरकरणी ते योग्यच दिसते पण पार पडलेल्या अधिवेशनावरून एकंदर नजर फिरवली तर जितका वेळ कामकाज झाले त्यांतील निम्म्यावर वेळ गदारोळांत वा सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जाऊन धिंगाणा घालण्यात खर्च झाला आहे असे लोकच म्हणतात मग पुन्हा तोच तमाशा पहाण्यासाठी अधिवेशन हवे की भत्ता मिळविण्यासाठी हवे , त्या पेक्षा महत्वाचे म्हणजे अर्थसंकल्प मंजूर झालेला असल्याने वेगळ्या खास अधिवेशनाची गरज ती काय असे प्रश्नही समाजमाध्यमावर उमटताना दिसत आहेत.अधिवेशनाची मागणी करणा-यांनी लोकांच्या या भावना लक्षात घेणे गरज्ेचे ठरले आहे.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
फोंडा पोटनिवडणूक नेमकी कशासाठी न्यायालयाने रद्द केली, ते जाहीर झाले आहे. त्याला नेमका कोण जबाबदार वा कोणाची बेपर्वाई आहे ते खरे तर लक्षात घेऊन भविष्यांत असे घडू नये म्हणून खबरदारी गरजेची आहे. पण त्याकडे लक्ष न देता जो उठतो तो या प्रकरणात दुसऱ्यावर आरोप करताना दिसत आहे व त्यामुळे निवडणूक रद्द झाली तरी तिचे चर्वित चर्वण मात्र सुरू आहे, असे दिसते. शिमगा संपला तरी कवित्व उरते म्हणतात ते असे. ‘आप’चे नेते वाल्मिकी नायक यांनी तर भाजपला निशाणा करताना त्याला रितेशला उमेदवारीच द्यावयाची नव्हती, असा दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे त्याला उत्तर म्हणून भाजपने उर्वरीत काळासाठी रितेशला मंत्रीपदी नियुक्त केले नाही, म्हणजे मिळवले अशी चर्चा राजकीय गोटांत सुरू आहे. कारण त्यामुळे भंडारी समाज भाजपकडे वळू शकतो, असे राजकीय निरीक्षक म्हणतात.
मॉडेलवरून वाद
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत कॉंग्रेस पक्षात वाद उफाळून येऊ लागले असून, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना जवळच्या असलेल्या खासदार ज्योतीमनी यांनी पक्षाची तिकीटे विकल्याचा गंभीर आरोप मागील आठवड्यात केल्यानंतर आता महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष हसिना सय्यद यांनी महिलांवर कॉंग्रेसने अन्याय केल्याचा जाहीर आरोप केला. या प्रकाराला त्यांनी प्रभारी गिरीश चोडणकर तसेच इतरांना जबाबदार धरले आहे. ‘पीटीआय’समोर सय्यद यांनी केलेले वक्तव्य आज गोव्यात लगेच व्हायरल झाले व कॉंग्रेसच्या एका गटात आनंदाच्या उकळ्या फुटल्याचे कळते. आता पाहूया, गिरीश चोडणकर त्यावर काय प्रतिक्रिया देतात ते...
कुंकळ्ळीत भाजप नेतृत्वहीन?
कॅप्टन नसलेल्या जहाजाला दिशा कोण दाखवणार? अशा आशयाचे एक बोध वाक्य आहे. डबल इंजिन सरकार असलेल्या भाजपची कुंकळ्ळी मतदारसंघात स्थिती ‘शिप विथआऊट रडार’ अशीच झाल्याची खंत खुद्द भाजपचे कार्यकर्तेच व्यक्त करतात. पालिका निवडणुका जवळ आल्या पालिका क्षेत्रात भाजपची चांगली समर्थन शक्ती आहे. असे असताना भाजपने पालिका निवडणुकीत सर्व शक्तिनिशी उतरण्यासंदर्भांत कोणतीही हालचाल सुरू केली नसल्याचा दावा कार्यकर्ते करतात. काँग्रेसने चौदाही प्रभागात दोन-दोन इच्छुक उमेदवार ‘शॉर्ट लिस्ट’ केल्याचे समजते. भाजपच्या गोटात मात्र ‘सब कुछ शांत शांत’ आहे. दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले व भाजपच्या संघटनात्मक कार्यात दीर्घ अनुभव असलेले विद्यमान नगरसेवक विशाल देसाई यांनीही मौन बाळगल्याचे कार्यकर्ते सांगतात. सुदेश भिसे हे पंचायत क्षेत्रातील असल्याने त्यांचीही तळमळ पालिका निवडणुकीबाबत फिकीच असल्याचे कार्यकर्ते सांगतात.भाजपचे स्थानिक मंडळ अध्यक्ष राजकारणात नवखे असल्याने व पंचायत क्षेत्रातील मतदार असल्याने पालिकेच्या राजकारणात त्यांचा प्रभाव शून्यच आहे. काही माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अनुभवी कार्यकर्ते आपली खासगी कामे झाल्याने आता पुरे राजकारण. म्हणून गप्प आहेत. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात भाजपची सक्षम नेतृत्वाची गरज कोण भागवणार, हे पहावे लागेल!
...तर पालेकर काय करतील?
आम आदमी पक्षाच्या राज्य संयोजकपदावरून हटवण्यात आलेले ॲड. अमित पालेकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सांताक्रुझ मतदारसंघावर नजर ठेवून त्यांनी हा राजकीय निर्णय घेतल्याचे दडून राहिलेले नाही. एकेकाळी ‘आप’ने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले होते. आता सांताक्रुझच्या उमेदवारीवर ते समाधान मानणार आहेत का? सांताक्रुझ मतदारसंघ हा ख्रिस्तीबहुल मानला जातो. त्यामुळे तेथे ख्रिस्ती व्यक्तीला कॉंग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त असताना पालेकर यांनी हा प्रवेश केला आहे. पुढे उमेदवारी मिळाली नाही, तर पालेकर कॉंग्रेसमध्ये राहतील का? अशी विचारणा आताच समाज माध्यमावर होऊ लागली आहे.
पहिला पगार पार्टीवर खर्च ?
एका मंत्र्याच्या वशिल्याने बऱ्याच वर्षांपूर्वी मडगाव पालिकेत कारकून म्हणून कामाला लागलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना त्यांचा ‘गॉडफादर’ सत्तेतून बाहेर पडल्याने कायमस्वरुपी नोकरी मिळत नव्हती. पण मागच्या वादग्रस्त नोकरभरतीच्यावेळी त्यांचे नशीब उजळले. एका नवीन ‘गॉडफादर’चे पाय धरल्याने (आणि हात ओले केले असल्यानेही असेल कदाचित) त्यांना नव्याने कामावर घेतलेल्या १२ जणांबरोबर आत घुसवले गेले. आता कायमस्वरुपी नोकरी मिळाल्यावर कुणालाही आनंद होणे साहजिकच. त्यामुळे त्या दोघांनी म्हणे आपल्या कायमस्वरूपी नोकरीचा पहिला पगार मिळाल्यावर चक्क त्या पैशांतून नगरपालिका कर्मचाऱ्यांना पार्टी दिली, असे सांगितले जाते आणि तीही नगरपालिकेतच. सध्या या पार्टीची बरीच खमंग चर्चा चालू आहे बरं का!
विश्वनाथ दळवी ‘ॲक्शन मोड’वर?
फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यावर आता इच्छुक उमेदवारांना २०२७ च्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागू लागलेत. या निवडणुकीच्या प्रचारामुळे थंडावलेल्या समाजकार्याला गती मिळताना दिसू लागली आहे. भाजपचे दक्षिण गोवा सचिव तथा फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी यांनीही प्रचारामुळे बंद पडलेले आपले समाजकार्य पुन्हा सुरू केल्याचे बघायला मिळत आहे. आज त्यांनी कुर्टी येथील दीपनगर भागात युवकांच्या भेटीगाठी घेऊन आपण २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. यातून पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले दळवी पुन्हा ॲक्शन मोडवर आल्याचे दिसू लागले आहे. आता त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीकरता भाजपची उमेदवारी मिळते का, दुसरा विचार करावा लागतो हे मात्र बघावे लागेल. हे आम्ही नाही बोलत दीपनगर भागातील लोकच, असे बोलताना दिसत होते. आता बोला..
सांताक्रूझ गटाध्यक्षाचा उल्लेखच नाही!
सांताक्रूझमध्ये जी काही काँग्रेस टिकून राहिली आहे, त्यात निष्ठावंत कार्यकर्ते निश्चित आहेत. जॉन नाझारेथ हे काँग्रेसचे येथील गटाध्यक्ष. ॲड. अमित पालेकर यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशावेळी त्यांच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला नाही. अगदी अलिकडे प्रवेश केलेल्या केतन भाटिकरांपासून काशिनाथ जल्मी, राजन घाटे यांची नावे घेण्यात आली. नाझारेथ हे काँग्रेसचे गटाध्यक्ष, ते सांताक्रूझमधील अनेक विषयांना सतत वाचा फोडत आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मेरशी येथील सिग्नल चालू करावेत, यासाठी ‘भीक मागो’ आंदोलनही केले होते. नाझारेथ यांना व्यासपीठावरही पाचारण करण्यात आले नाही आणि त्यांच्या नावाचा उल्लेखही केला गेला नाही, याची चर्चा कार्यक्रमस्थळावर सुरू होती.
मोन्सेरात विसरले की काय?
पणजी महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडीनंतर काही दिवसांतच तीन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून पाच सदस्य घेण्याची तरतूद आहे. परंतु एडवर्ड जॉर्ज, शेखर डेगवेकर आणि रेजिना आल्मेदा हे तीनच सदस्य घेतले गेल्याने काहींनी आश्चर्य व्यक्त केले. कारण निवडणूक काळात मंत्री मोन्सेरात यांनी ज्यांना-ज्यांना उमेदवारी नाकारली, त्यांना तुझा निश्चित विचार करू, असे आश्वासन अनेकांना त्यांनी दिले होते. परंतु तीनच नावे जाहीर केल्याने इतरांचा त्यांना विसर पडला की काय, असे दिसते. काहींना म्हणे स्वीकृत नगरसेवक म्हणून घेऊ, असेही त्यांनी सांगत निवडणुकीत आपला सदस्य निवडीसाठी त्यांचा वापर करून घेतला, असेच म्हणावे लागेल. मोन्सेरातनी कदाचित या बाबी विसरल्यात काय, असा प्रश्न आता ज्यांना शब्द दिला होता, त्यांना सतावतो आहे म्हणे!
अमितद्वयींना वडीलधारी सल्ला!
आम आदमी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांचा शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते तसेच प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी सुरुवातीला भाषण केले. त्यांनी काँग्रेसमध्ये दोन अमित झाले आहेत, त्यामुळे त्यांना एक आणि दोन क्रमांक न देता एकाला ‘अमित'' आणि दुसऱ्याला ‘पालेकर'' असे म्हणावे लागेल. अमित पालेकरांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळकटी येईल, असा विश्वास व्यासपीठावरील नेत्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. त्याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस यश मिळवेल आणि सरकार स्थापन होईल, असे भाकीतही मान्यवरांनी व्यक्त केले. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिलेला सल्ला. यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठतेनुसार म्हणजेच वडीलधारी सल्ला अमितद्वयींना दिला. त्यांनी ॲड. पालेकर हे नेते आहेत, हे सांगत त्यांच्यासह सर्वांनी एकत्रितरित्या पक्षाच्या हितासाठी निर्णय घ्यावेत आणि पक्ष पुढे न्यावा, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता दोघांनाही हा सल्ला मानावा लागणार हे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.