Election Dainik Gomantak
गोवा

Goa News : तिसवाडीत भाजपचे ‘वजन’ भारी; चार मतदारसंघांवर वर्चस्व

Goa News : बाबूश मोन्सेरात यांचा तालुक्यावरील प्रभाव फायदेशीर

गोमन्तक डिजिटल टीम

अवित बगळे

Goa News : पणजी, तिसवाडी तालुक्यातील पणजी मतदारसंघ सातत्याने भाजपच्या बाजूने राहिला आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतरही या मतदारसंघाचा कल भाजपच्या बाजूनेच राहिला आहे. इतर मतदारसंघांत व्यक्तिनिहाय प्रभाव आहे.

पणजीत भाजपचा आमदार निवडून येत असला तरी शेजारील ताळगावात बाबूश मोन्सेरात ज्या पक्षात असतील तो पक्ष त्या मतदारसंघातून जिंकत आला आहे. सध्या ते भाजपात असल्याने त्यांच्या पत्नी जेनिफर भाजपच्या उमेदवारीवर विधानसभेवर निवडून आल्या आहेत.

सांताक्रुझ मतदारसंघात कॉंग्रेसचे रुडॉल्फ फर्नांडिस तर कुंभारजुवेतून राजेश फळदेसाई विजयी झाले. त्यानंतर ते आता भाजपवासी झाले आहेत. सांतआंद्रे मतदारसंघात रिव्होल्युशनरी गोवन्सचे वीरेश बोरकर विजयी झाले आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ सोडला तर उर्वरित चार मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत.

यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला या तालुक्यातून किती मताधिक्य मिळते हे पाहणे औपचारिकता आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत पणजीतून अपक्ष लढलेले उत्पल पर्रीकर यांनीही लोकसभा निवडणुकीत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे समर्थन करतो, असे सांगितले आहे.

सांतआंद्रे

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या व अल्पसंख्याकबहुल मतदार असलेल्या मतदारसंघाची गतविधानसभेत रिव्होल्युशनरी गोवन्सने गणिते बिघडविली. भाजपमध्ये आलेल्या फ्रान्सिस्को सिल्वेरा यांचे कसब यावेळी लोकसभेला दिसणार आहे.

कारण रिव्होल्युशनरी गोवन्सचा एकमेव आमदार या मतदारसंघाने निवडून दिला आहे. सिल्वेरा यांनी भाजपच्या उमेदवारीवर गतनिवडणूक लढविली. पराभूत झाले तरी आता भाजपच्या उमेदवाराला या मतदारसंघातून चांगली मते मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. त्यावरच त्यांचेही पुढील भवितव्य ठरणार आहे.

सांताक्रूझ

सांताक्रूझ मतदारसंघ व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. मगोपला मानणारा मोठा मतदार याठिकाणी असला तरी ख्रिश्‍चन समुदायही मोठ्या संख्येने आहे. त्याशिवाय अल्पसंख्याक व परराज्यातून स्थायिक झालेल्या लोकांच्या इंदिरानगर या वस्तीतील मते या मतदारसंघाचा निकाल बदलवणारी ठरली आहेत.

चिंबल व इंदिरानगर हा भाग ज्याच्या मागे राहतो, त्या उमेदवाराचा विजय पक्का मानला जातो. काँग्रेसच्या उमेदवारीवर रुडॉल्फ फर्नांडिस निवडून आले; पण ते आता भाजपमध्ये आल्याने लोकसभेला ते भाजपसाठी किती मते खेचून आणतील, हे पाहावे लागेल.

पणजी

पणजीत काँग्रेसची साधारण पाच ते साडेपाच हजार एकगठ्ठा मते आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा पाठिराखा राहिलेला हा मतदारसंघ त्यांच्या पश्‍चात काँग्रेसने पोटनिवडणुकीत हिसकावून घेतला होता. त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले बाबूश मोन्सेरात यांनी भाजपमध्ये प्रवेश करून हा मतदारसंघ भाजपकडे ठेवला. मध्य पणजी आणि मळा परिसर भाजपचा एकगठ्ठा मतदारांचा भाग राहिला आहे.

गतनिवडणुकीत उत्पल पर्रीकर हे अपक्ष म्हणून लढल्याने मनोहर पर्रीकरांच्या समर्थकांची आणि भाजपची अशी मतविभागणी झाली, त्यात भाजपची मूळ मते पर्रीकरांच्या बाजूने झुकल्याचे दिसून आले. तरीही बाबूश मोन्सेरात यांनी निसटता म्हणजे ७१६ मतांनी विजय मिळवला. लोकसभेचा विचार केला तर मोन्सेरात व उत्पल यांची दोघांची मिळून मते भाजप उमेदवाराला पडतील का, हा एक प्रश्‍न आहे.

कुंभारजुवे

या मतदारसंघात राजेश फळदेसाई यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येण्याची किमया साधली. भाजपच्या जनिता मडकईकर यांना भाजपने उमेदवारी दिली तेथेच फळदेसाई यांचा विजय निश्‍चित झाला; परंतु त्याठिकाणी अपक्ष राहिलेल्या रोहन हरमलकरांनी ३,८७० मते घेऊन आव्हान निर्माण केले होते.

मडकईकर यांची साडेतीन हजारांवर असलेली आणि फळदेसाई यांच्या पावणेसात हजार मतांतून भाजप उमेदवाराला किती मते मिळतील, हे पाहावे लागणार आहे. मडकईकर यांनी अजूनतरी भाजप सोडलेला नसला तरी फळदेसाई यांनी अल्पावधीत मतदारसंघावर कब्जा केला असल्याने ती भाजपसाठी चिंतेची बाब आहे.

ताळगाव

पणजीला जोडून असलेल्या मतदारसंघावर मोन्सेरात कुटुंबाचा वरचष्मा राहिला आहे. मोन्सेरात ज्या पक्षात असतील, तो उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट आहे. काँग्रेसमधून भाजपात येऊन कमळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या जेनिफर मोन्सेरात या येथील आमदार आहेत.

भाजपच्या सर्व उपक्रमांना त्या उपस्थित राहतात, शिवाय पक्षाने दिलेली कामेही त्या मतदारसंघात राबवतात. बाबूश मोन्सेरात यांचा अद्यापि या मतदारसंघात करिष्मा चालतो. त्यामुळे ताळगावमधून पणजीपेक्षा जास्त मते मिळवून देण्यात जेनिफर या यशस्वी होतात का, ते पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT