Mumbai-Goa Highway: Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway: गोव्यात येणाऱ्यांवर ‘टोल’धाड

Mumbai-Goa Highway: बांदा-माजाळीत नाके : मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत नितीन गडकरींनी घेतला विविध कामांचा आढावा

दैनिक गोमन्तक

Mumbai-Goa Highway: काही वर्षांपूर्वी गोव्यात येणाऱ्या वाहनांवर टोल आकारण्यात होता. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारची ‘एकच कर’प्रणाली लागू झाल्यामुळे हे टोलनाके बंद झाले होते. परंतु आता पुन्हा गोव्यात येणाऱ्यांना ‘टोल’ द्यावा लागणार आहे.

बांदा आणि माजाळी येथे राष्ट्रीय महामार्गावर टोल नाके असतील. त्यामुळे गोव्यात येणे आता महागणार आहे. मात्र, टोलमधून राज्याबाहेर जात परत येणाऱ्या गोमंतकीयांना सूट दिली जाणार का, याविषयी संदिग्धता आहे.

राष्ट्रीय महामार्गाची सर्व कामे पूर्ण झाल्यावर केरी आणि मोले येथेही टोल नाके उभारण्यात येणार आहेत. गडकरी यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत महामार्गावरील कामांचा आढावा घेतला. त्यांनी यावेळी अनेक सूचना केल्या. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राज्यातील वास्को व मडगाव बसस्थानकांच्या जागी बस पोर्ट बांधण्यासाठी महिनाभरात प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी केली आहे. मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक ९ रस्तामार्गे

जोडण्यासाठी असणारी अडचण कशी दूर करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. मडगावातील पश्चिम बगलमार्ग ते काणकोण या ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे. सरकारच्या ताब्यात असलेल्या ९० टक्के जमिनीवर हे बांधकाम आधी केले जाणार आहे.

महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजनांवरही या बैठकीत चर्चा झाली. पत्रादेवी-पोळे महामार्गाच्या कामाचाही आढावा या बैठकीत घेतला. मी केलेल्या मागण्यांचा मी निश्चितपणे पाठपुरावा करणार आहे. उड्डाणपूल, अंडरपास हे पूर्वीच बांधणे आवश्यक होते, असे आमदार वीरेश बोरकर म्हणाले. मोपा रस्त्याच्या कामाचाही आढावा गडकरी यांनी या बैठकीत घेतला.

आगशीतील टोलनाका रद्द

विशेष म्हणजे, राज्यात टोल नाके नसतील, एवढ्यावरच सध्या समाधान मानले जात आहे. महामार्ग रुंदीकरणावेळी आगशी येथे टोल नाक्यासाठी भू-संपादन करण्यात आले होते. मात्र, आज केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याच्या दोन्ही सीमांवर टोल नाके उभारण्याची सूचना केल्याने आगशी येथे टोलनाका ऩसेल, हे स्पष्ट झाले आहे. बांदा येथे टोल नाका उभारण्यात आला असून तो केवळ सुरू करणे बाकी आहे, तर माजाळी येथे टोल नाका उभारावा लागणार आहे. सध्या कर्नाटकात अंकोल्याजवळ टोल नाका आहे.

बस पोर्ट विकसित करणार

माविन म्हणाले की, राज्यात बस पोर्ट विकसित करण्याची घोषणा करण्यास मला त्यांनीच सांगितले होते. तेही काम ते मार्गी लावणार आहेत. नाताळनिमित्त गोमंतकीयांना दिलेली ही भेट आहे. २२ हजार कोटी रुपयांची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. सागरमाला विषयावर चर्चा झालेली नाही. अपघातप्रवण क्षेत्रांतील त्रुटी दूर करण्यासाठी १७७ कोटी रुपये देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. प्रकल्पांना राज्यात होत असलेल्या विरोधाचा मुद्दा बैठकीत कोणीच काढला नाही.

पूल, महामार्गांचे प्रस्ताव

माविन गुदिन्हो यांनी सांगितले, की प्रकल्पांच्या कामाचा आढावा गडकरी यांनी घेतला. पूल, महामार्ग यांची जी कामे बाकी आहेत तीही मार्गी लावतो, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यांनी कोणताही प्रस्ताव नाकारलेला नाही. मुरगाव तालुक्यातील उड्डाणपुलांची मागणी मी केली. विमानतळ ते किणीनगरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम लवकरच करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. त्याचा तपशीलवार प्रकल्प आराखडा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याला ६५० कोटी रुपये खर्च येणार आहे.

भोमप्रश्‍नी मुख्यमंत्री काढणार तोडगा

सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले, की बांबोळी क्रॉसजवळ उड्डाणपूल हवा या मागणीचा पाठपुरावा करत होतो, तीच मागणी प्रामुख्याने गडकरी यांच्याकडे मांडली.

आगशी-मोयते येथे गुरे जाण्यासाठी एक मार्ग, धारगळ दोन खांब आणि कोलवाळ चार रस्ता येथे उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केली आहे. भोमच्या रस्ता रुंदीकरणाचा स्थानिकांना फटका बसणार असल्याचा विषयही या बैठकीत मांडला असता मुख्यमंत्र्यांनी आपण त्याचा आढावा घेऊन तोडगा काढतो, असे सांगितले आहे.

पेडे-म्हापसा येथे लवकरच उड्डाणपूल : हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी सांगितले की, पेडे येथे सहा दिशांनी रस्ते येऊन मिळतात. तेथे वाहतूक कोंडी होते. तेथे उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्या मागणीला पाठिंबा दिला आहे. तेथे उड्डाणपूल किंवा अंडरपास बांधावा, अशी मागणी आहे. त्यावर शक्य तितक्या लवकर आदेश देऊ, असे गडकरी यांनी सांगितले. काहीजण बैठकीनंतरही या मागणीसाठी गडकरी यांना बैठकीबाहेर भेटले, तेव्हाही त्यांनी मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. पेडे येथे उड्डाण पुलासाठी यापूर्वी प्रस्तावच पाठवला नव्हता, हेही तितकेच खरे आहे.

बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय

  1. मोप विमानतळ जोड महामार्गाचे काम एप्रिलमध्ये पूर्ण होणार.

  2. हा उन्नत मार्ग देशातील सर्वांत उंच खांबांवर असेल.

  3. पर्वरी येथील पाच किलोमीटर उन्नत मार्गाचे काम जानेवारी अखेरीस सुरू होईल.

  4. मडगाव पश्चिम बगलमार्गाच्या कामाला प्रशासकीय मान्यता

  5. बंदर जोडरस्त्याचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करणार

  6. बोरी पुलाच्या कामाचा विचार, तत्त्वतः मान्यता

  7. मुंबई-कन्याकुमारी, गोवा-हैदराबाद रस्ता कामासाठी सल्लागाराची नियुक्ती

  8. साखळी, खानापूर, चोर्लामार्गे बेळगाव रस्त्याचे पर्यावरण नियम पालन करून काम

  9. अनमोड ते साखऱ कारखाना खांडेपार रस्त्याच्या कामाला लवकरच सुरवात.

गेल्या 10 वर्षांत 25 हजार कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे राज्यात झाली. आणखी 10 हजार कोटी रुपयांची कामे होणार आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दृष्टीने विकसित राज्य म्हणून गोवा पुढे येईल.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Today's News Live: सायबर क्राईम रोखण्यासाठी गोवा पोलिस अलर्ट, 152 मोबईल नंबर केले ब्लॉक

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

SCROLL FOR NEXT