लिलाव करण्यात आलेली खाण लिजे सुरू करण्यासाठी नव्याने पर्यावरणीय परवाने घेण्याची सक्ती मुंबई उच्च न्यायालयाने केल्यामुळे आता या लीजधारकांसमोर असंख्य अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या लीजधारकांना हे परवाने घेण्यासाठी पर्यावरणीय संमती मिळविण्याबरोबरच वन खाते आणि वन्यजीव अधिकारिणीचीही संमती घेणे गरजेचे होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया बरीच लांबण्याची शक्यता या व्यवसायातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
आतापर्यंत सरकारने 9 खाणपट्ट्यांचा लिलाव केला आहे. त्यात सांगे तालुक्यातील काले, डिचोली तालुक्यातील डिचोली-मुळगाव, शिरगाव-मये व मोंन्त द शिरगाव, कुडणे-करमळे, कुडणे-हरवळे, अडवपाल-थिवी, थिवी-पिर्णा आणि सुर्ला-सोनशी या खाणपट्ट्यांचा समावेश आहे.
गोव्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच लिजांचा लिलाव केला गेला आहे. मात्र पूर्वीची लिजे २०१८ साली रद्द केल्याने आता सर्व नव्या लीजधारकांना या खाणी सुरू करण्यासाठी सगळी प्रक्रिया परत चालू करावी लागणार आहे. या ९ खाणपट्ट्यांत एकूण २२५ दशलक्ष मेट्रिक टन खनिज उपलब्ध असल्याचे खाण संचालनालयाने म्हटले आहे.
वन, वन्यजीव तसेच पर्यावरण खात्याचा दाखला मिळविण्याबरोबरच या खाणींना स्फोटके वापरण्यासाठी संबंधित अधिकारिणीकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. या खाणी सुरू करण्यासाठी पर्यावरण खात्याचे कन्सेंट टू ऑपरेट तसेच खाणी उघडण्याची परवानगी घ्यावी लागेल. भू-जल परवाना घेण्याबरोबरच ग्रामसभेचीही मान्यता घेणे आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयार केलेल्या मान्यता खनिजकर्म अहवालाला इंडियन मायनिंग ब्युरोची परवानगी घेणे आवश्यक आहे.
किमान तीन वर्षे तरी जातील : क्लॉड आल्वारिस
ही संपूर्ण प्रकियाच किचकट असून त्यासाठी किमान तीन वर्षे तरी जातील, असे गोवा फाऊंडेशनचे संचालक क्लॉड आल्वारिस यांनी सांगितले. ते म्हणाले, आतापर्यंत खाण कंपन्यांनी जो धुडगूस घातलाय, त्यामुळे स्थानिक लोक या कंपन्यांवर नाराज होते.
म्हणूनच ग्रामसभांकडून परवानगी मिळण्यासाठी या खाण कंपन्यांना बरीच खटपट करावी लागणार आहे. या खाणींना पर्यावरणीय दाखले मिळाल्यानंतर त्या सुरू करण्यापूर्वी पर्यावरणीय जनसुनावणी घेणे आवश्यक आहे.
खाणी सुरू करण्यास लोकांकडून विरोध झाल्यास किंवा कुणीही या पर्यावरण परवान्याला किंवा पर्यावरणीय अहवाल अभ्यासाला हरकत घेऊन न्यायालयात आव्हान दिल्यास ही प्रक्रिया आणखीही लांबू शकते. त्यामुळे लगेच खाणी सुरू होणार या आशेवर कुणीही राहू नये, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.