पणजी: गोवा राज्यातील 12 वी पर्यंतच्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. शाळा सुरु होणार असून विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती मात्र करण्यात आलेली नाही. सुरवातीच्या काळात विद्यार्थ्यांना हवी असल्यास वेळेत सवलत दिली जाईल. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल अशा निर्णयाचे परिपत्रक आज शिक्षण संचालनालयातर्फे (Goa Education Board) संचालक भूषण सावईकर यांनी जारी केले आहे.
शिक्षण संचालनालयाने येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे परिपत्रक सर्व शाळांना कालच जारी केले आहे. गेली दोन वर्षे बंद असलेले प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. दिवस कमी असल्याने शाळा व्यवस्थापनानी विद्यार्थ्यांच्या (Students) आरोग्याचा विचार करून काही कडक निर्बंध शाळेत लागू करण्याबाबत नियमावली तयार करण्यात येत आहे. हा निर्णय सरकारी व सरकारी अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच विशेष शाळांसह पूर्व प्राथमिक शाळांना लागू असून या शाळांच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे नियम तसेच मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे बजावण्याचे या परिपत्रकात सूचित करण्यात आले आहे. या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी कोरोना मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी असलेले वर्ग कमी पडतील त्यामुळे वर्गातील तासिकांच्या वेळेतही काही प्रमाणात बदल केले जाण्याची शक्यता आहे. वर्गामध्ये क्षमतेच्या 50 टक्के विद्यार्थ्यांचा समावेश करण्याच्या सूचना असल्याने शिक्षकांच्या लेक्चर्समध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थापनाला नियमित वेळापत्रकापेक्षा नव्याने वेळापत्रक तयार करावे लागणार आहे.
गोव्यात अजूनही कोविडची (Covid-19) साथ चालू असताना प्राथमिक शाळा सुरू करण्याचा शिक्षण खात्याचा निर्णय चुकीचा आहे. सरकार लहान मुलांना धोक्याच्या खाईत लोटत आहे अशी टीका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी केली आहे. शाळा व्यवस्थित सॅनिटाईझ केल्या जाणार का असा प्रश्न करून विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाल्यास त्याची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.
10 वी, 12 वीचा निकाल मे अखेरीस
10 वी व 12 वीच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा एकाचवेळी 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस घोषित केला जाईल अशी माहिती गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी दिली. मंडळाने 10 वी व 12 वीच्या पहिल्या सत्राची परीक्षा डिसेंबर 21 ते जानेवारी 22 या दरम्यान घेतली होती. त्याचा निकाल फेब्रुवारी 22 च्या अखेरीपर्यंत जाहीर होईल.
महाविद्यालयेही सुरू
गोवा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या राज्यातील सरकारी तसेच खासगी महाविद्यालयाचे तसेच गोवा विद्यापीठातील प्रत्यक्ष वर्ग येत्या सोमवारी 21फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक विद्यापीठाचे रजिस्टार व्ही. एस. नाडकर्णी यांनी जारी केले. या महाविद्यालयाचे तसेच गोवा विद्यापाठातील विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल्स ऑफलाईन (Offline Exam) पद्धतीने होईल. कोविड नियमांचे पालन करून वर्ग सुरू होतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.