मडगाव: गोव्यात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली असून त्याचा फटका सामान्य लोकांना बसत आहे. राज्यात दर महिन्याला सरासरी १०५३ जणांना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून चावल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
यातून समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भटकी कुत्री ही जागतिक पर्यटन क्षेत्र असलेल्या गोव्यासाठी एक चिंतेची बाब ठरली आहे. लोकसभेत दिलेल्या एका प्रश्नांच्या उत्तरातून ही बाब पुढे आली आहे.
२०२२ ते यंदाच्या जानेवारी महिन्यांपर्यंत म्हणजे एकूण ३७ महिन्यांत गोव्यात लोकांना कुत्री चावण्याच्या ३८ हजार १९७ घटनांची नोंद झाली आहे. याचाच अर्थ महिन्याला सरासरी १,०५३ तर दिवसाला सरासरी ३५ जणांना कुत्र्यांनी चावण्याचा घटना घडल्या आहेत. राज्य सरकारने एकात्मिक आरोग्य माहिती पोर्टलवर ही माहिती अपलोड केली आहे.
केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री एस. पी. सिंग बाघेल यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री बाघेल यांनी दिलेल्या उत्तरातील माहितीनुसार, २०२२ मध्ये गोव्यात कुत्रे चावण्याच्या ८,०५७ घटनांची नोंद झाली होती. २०२३ मध्ये हे प्रमाण ११ हजार ९०४ एवढे होते, तर २०२४ मध्ये त्यात आणखी भर पडून ते १७ हजार २३६ वर पोचले. जानेवारी २०२५ या एका महिन्यात कुत्रा चावण्याच्या १,७८९ घटना घडल्या. जानेवारी २०२५ चा विचार करता दिवसाला सरासरी ५८ जणांना कुत्रा चावण्याच्या घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळेच गोव्यात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू लागली आहे. वास्तविक नगरपालिका आणि पंचायती यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन हे काम करणाऱ्या एनजीओंना आर्थिक साहाय्य देण्याची गरज आहे. दुर्दैवाने तसे होत नाही.सावियो कुतिन्हो मडगावचे माजी नगराध्यक्ष.
समुद्र किनाऱ्यावर फिरणारी भटकी कुत्री ही गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना डोकेदुखी ठरली आहेत. विशेषतः विदेशी पर्यटकांवर या भटक्या कुत्र्यांचा हल्ला होतो. त्यामुळे पर्यटक समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी घाबरू लागले आहेत. या समस्येवर जिल्हा प्रशासनाने त्वरित तोडगा काढावा, यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठकही घेण्यात आलेली आहे.डिक्सन वाझ, सरपंच केळशी पंचायत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.