डिचोली: कामगारांच्या भवितव्याचा विचार करून सरकारने आता तरी तातडीने खाण प्रश्न एकदाचा निकालात काढावा. विनविलंब राज्यातील कायदेशीर खाणी सुरु करा, अशी मागणी खाण बंदीमुळे संकटात आलेल्या डिचोलीतील सेसाच्या कामगारांनी केली आहे. सेसाच्या अस्वस्थ कामगारांनी सोमवारी (ता. 4) मयेसह डिचोली मिळून दोन्ही नवनिर्वाचित आमदारांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली.
खाणी सुरू करून कामगारांना पूर्ण वेतन मिळण्यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या कामगारांनी केली आहे. सेझा कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आज मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची भेट घेतली.
आमदारांची भेट घेतलेल्यामध्ये कामगार संघटनेचे किशोर लोकरे, नारायण गावकर, इंद्रकांत फाळकर, राजेश गावकर, दीपक पोपकर, संजय मांद्रेकर, महेश होबळे, अनिल सालेलकर, बाबूसो कारबोटकर, बबन नाईक आदी कामगार उपस्थित होते. खाणी सुरू व्हाव्याच
खाण बंदीपासून गेली चार वर्षे कामगार संघर्ष करीत आहेत. मात्र आजपावेतो कामगारांच्या पदरी निराशा पडली आहे. कामगार संकटात अडकले आहेत, असे सेसा कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर म्हणाले. जनतेने पुन्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आणले आहे. जनतेचा हा विश्वास सार्थ ठरविताना सरकारने ठोस पावले उचलून खाण प्रश्न निकालात काढावा. कामगारांच्या भवितव्याशी खेळू नये, अशी मागणीही कारबोटकर यांनी केली .
विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार
सोमवारी सायंकाळी कामगारांनी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची त्यांच्या डिचोलीतील कार्यालयात भेट घेतली. कामगारांनी आपली व्यथा आमदार डॉ. शेट्ये यांना कथन केली. कायदेशीर खाणी सुरु करून आमच्यावरील संकट दूर करावे. डंप पॉलिसी अवलंबिताना कामगारांच्या हिताचा विचार व्हावा. थकीत वेतन मिळावे, अशा मागण्या कामगारांनी पुढे केल्या. आमदारांनी कामगारांचे म्हणणे आणि मागण्या ऐकून घेतल्या. या विषयावर कामगार, कायदा सल्लागार यांची संयुक्त बैठक घेऊन अगोदर चर्चा करून नंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन तोडग्यासाठी बैठक घेण्याची ग्वाही आमदार डॉ. शेट्ये यांनी कामगारांना दिली. तत्पूर्वी सकाळी कामगारांनी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.