CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant|...बोला ‘प्रमोद’जी बोला!

दैनिक गोमन्तक

...बोला ‘प्रमोद’जी बोला!

फौजदारी आचार संहितेच्या नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी गुन्हेगारी घडते, त्या राज्यातील पोलिसांनी त्या गुन्ह्याचा तपास करणे आवश्यक असते. पण अजीब गोवेकरांच्या राज्यात सगळेच अजीब असावे. याचे कारण म्हणजे सोनाली फोगट खूनप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची सरकारने केलेली तयारी. यापूर्वी गोव्यात सिध्दी नाईक या युवतीचा खून झाला. त्यावेळीही या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी झाली होती. पण मुख्यमंत्र्यांनी ती मानली नाही. पण फोगट प्रकरण सीबीआयकडे देण्यास ते तयार आहेत. याचे कारण सांगताना मुख्यमंत्री म्हणतात, सिध्दी ही गोव्याची असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले नाही. फोगट गोव्याबाहेरच्या असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास काही हरकत नाही. गोव्यातील माणसांच्या खुनाचा तपास स्थानिक पोलिसांनी करावा आणि राज्याबाहेरील लोकांच्या खुनांचा तपास सीबीआयने हेच तत्त्व जर सरकार अंगीकृत करत असेल तर कुडचडे येथे झारखंडमधील एका कामगाराचा खून झाला आहे. सरकार या खूनाचाही तपास सीबीआयद्वारे करणार का? बोला प्रमोदजी बोला! ∙∙∙

केंद्र-राज्य भूमिकेत तफावत

खाण लिजांचा लिलाव झाल्यास बाहेरच्या बड्या कंपन्या राज्यात येतील या संदर्भात नेत्यांना का बरे भीती वाटावी? सूत्रांच्या मते केंद्रीय भाजपला निकट असलेल्या काही बढ्या कंपन्या खाणी ताब्यात घेण्यासाठी येऊ शकतात. या बढ्या कंपन्यांना राज्यात येऊ देण्यासाठीच लिलाव प्रक्रिया ताबडतोब हाती घेण्याचे आदेश केंद्राने दिले असल्याची चर्चा खुद्द भाजपामध्ये चालू आहे. याचा अर्थ भाजपाच्या केंद्रीय व स्थानिक नेत्यांमध्ये एकजिनसीपणा नाही, असाच संदेश प्राप्त होतो. गोव्यातील काही स्थानिक नेते काही खाण कंपन्यांचे वकीलपत्र घेतल्यासारखे वर्तन करतात. खाणी राज्य सरकारच्या मालकीच्या असल्या तरी त्या स्थानिक खाण कंपन्यांच्याच घशात घालण्याची नेत्यांची अजूनपर्यंतची भूमिका होती. याबाबत केंद्राला सतत हस्तक्षेप करावा लागला, परंतु हे सर्व उपद्‍व्याप बाहेरच्या कंपन्या आणण्यासाठीच केंद्र सरकारने चालविला होता, असे म्हणणे धारिष्ठ्याचेच होईल. लिलाव प्रक्रिया सुरू केली तर लेवल प्लेईंग फिल्ड तयार होईल व साऱ्याच कंपन्यांना त्या स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. राज्यातील खाण व्यवसायात अवघ्याच काही कंपन्यांची मिरासदारी कशासाठी असावी? ∙∙∙

राज्यातील रेतीमध्येही सोने

एका बाजूला लोह खनिज खाणींचा लिलाव करण्यासंदर्भात वस्तुस्थिती काय आहे, याचा अंदाज येत नाही. दुसऱ्या बाजूला रेती उपसा संदर्भातही राज्य सरकारकडे योग्य धोरण नाही. या रेती उपसा प्रक्रिया सुरळीत बनविण्यासाठी राज्य सरकार आता रीतसर परवाने देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. परंतु त्याचवेळी पर्यावरणवाद्यांनी धोक्याचे बटणही दाबले आहे. क्लॉड अल्वारिस हे नंदकुमार कामत यांचा हवाला देऊन नदीच्या रेतीमध्येही सोन्याचे अंश सापडत असल्याचा इशारा देऊ लागले आहेत. गोव्यातील लोह खनिजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोने असल्याचा निर्वाळा मुंबईस्थित प्रयोगशाळेने दिलेला असतानाच रेतीमध्येही सोने असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने राज्य सरकारची झोप उडेल. एका बाजूला राज्य सरकार केंद्राकडे निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी करते तर दुसऱ्या बाजूला सोन्याचे साठे कवडीमोलाने निर्यात होत आहेत, असे जर केंद्राच्या लक्षात आले तर काय होईल? ∙∙∙

काँग्रेसला पुन्हा खिंडार?

गणेशोत्सवात राजकीय पक्षानी गाफील राहिल्यास पक्षांतर सारख्या गोष्टी सहज होऊ शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. आता गणेशचतुर्थीत पुन्हा एकदा कॉंग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. गेल्यावेळी जरी पक्षांतराचा डाव फसला असला, तरी यंदा तो फसणार नाही, यासाठी नियोजन केल्याचे चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. जुलैमध्ये झालेल्या पक्षांतराच्या प्रयत्नात सहभागी असलेल्यांनी यंदा ज्यांच्यामुळे हा डाव विफल झाला. त्या तीनपैकी दोघांना आपल्या बाजूने वळण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. यातील एक व्यक्ती विधिमंडळ गटनेता होण्याच्या शर्यतीत असून, त्याला ते पद मिळणार नाही, असे समजते. त्यांच्या नाराजीवर लक्ष केंद्रित करून पक्षांतर करण्याचे कारस्थान सध्या शिजत आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचे पायसदान

चतुर्थीनिमित्त भाजपचे नेते तसेच फिलिप नेरी, क्लाफास यासारखे नवभाजपा नेते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरी जाऊन बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आल्याचे फोटो वर्तमानपत्रात झळकले. मात्र एक फोटो छापून आला नाही आणि तो म्हणजे काँग्रस आमदार संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस व एल्टन डिकॉस्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या भेटीचा. या तिन्ही काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरी जेवण घेतले. रामायणात राजा दशरथ यांनी आपला उत्तराधिकारी जन्माला घालण्यासाठी विश्वामित्र ऋषीकडून पायसदान घेतले होते. आता या तिन्ही काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतलेल्या पायसदानामुळे नवे काही उत्तरदायित्व ठरविले जाणार नाही ना? ∙∙∙

गोव्यातील ‘स्मार्ट मगर’

आम्ही या अगोदर स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट उपकरणे ऐकली असणार, परंतु स्मार्ट मगर ही गोष्ट पहिल्यांदाच ऐकायला मिळत आहे. सांताक्रूझ येथील पाणथळ जागेत असलेली ‘मगर’ही स्मार्ट असल्याचे स्थानिक आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी सांगितले आहे. या मगरींना पकडण्यासाठी वन खात्याकडून सध्या प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न विफल झाले आहे. रुडाल्फ यांच्या म्हणण्यानुसार पानथळ जागेतल मगरी स्मार्ट म्हणजे हुशार असून त्यांना पकडण्यासाठी ठेवलेल्या पिंजऱ्यात त्या जात नाही. मगरांना जाळ्यात अडकायचे असेल, तर वन खात्याला सुद्धा आता स्मार्ट युक्ती वापरायला लागणार आहे. ∙∙∙

उत्पलच्या भेटी आणि बाबूशचे फलक

पणजीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर सध्या अनेक ठिकाणी गणेशचतुर्थीनिमित्त घरोघरी भेटी देत आहेत. त्यांच्या या भेटीची छायाचित्रे संबंधित मंडळी समाजमाध्यमांत तत्काळ सामाईक करीत आहेत. तर दुसरीकडे आमदार बाबूश मोन्सेरात हे किंवा त्यांचे सुपुत्र तथा महापौर रोहित मोन्सेरात यांची गणपती भेटीची छायाचित्रे समाजमाध्यमांत नजरेसच पडत नाहीत. परंतु अनेक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात आमदार मोन्सेरात यांचा व आपले छायाचित्र असलेले गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा देणारे फलक लावलेले आहेत. त्यामुळे मोन्सेरात फलकावर दिसतात, असे अनेकजण म्हणतात. गतवर्षी विधानसभा निवडणूक पुढे असल्याने रोहित मोन्सेरातही अनेकांच्या घरी गणेशदर्शनाला गेले होते, याची आठवण संबंधित नगरसेवकच करून देत आहेत. आता ते तुमच्या घरच्या गणेश दर्शनाला का आले नाहीत, असे विचारले तर तुम्हीच विचारा? असे सांगणारेही आहेत. असो कोणी कोणाच्या घरी जायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न... ∙∙∙

गणेश चतुर्थी भेट की राजकीय ?

गणेशचतुर्थीच्या दिवसांमध्ये राजकीय नेते एकमेकांच्या घरी भेट देण्याची पद्धत गोव्यात कायम आहे. आपले राजकीय मतभेद विसरून नेते खुल्या मनाने भेट देतात. परंतु, या भेटीतून देखील यापूर्वी राजकारण झाल्याचे दिसून आले आहे. यंदा आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या निवासस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, कॉंग्रेस आमदार मायकल लोबो आणि केदार नाईक हे एकाच वेळी उपस्थित होते, असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, यानंतर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे, की ही केवळ चतुर्थी भेट होती, की आणखी वेगळे काय? त्यामागे कोणता वेगळा राजकीय हेतू आहे. खास करून लोबो हे कॉंग्रेस ताोडण्याच्या तयारीत असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले असून, यातून वेगळे निष्कर्ष काढले जात आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa And Kokan Today's Live News: पेडणे खून प्रकरण; आजगावकर यांचा सखोल चौकशी करण्याची मागणी

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

Cashew Production Declined: काजू पीक घटले; दारूभट्ट्या थंडावल्या, हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Cashew Agriculture : गोव्यातील काजूचे प्रस्‍थ

SCROLL FOR NEXT