बाप्पा, पाव रे पोलिसांना...
राज्यात सध्या प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. कुठे चोऱ्या, दरोडे, खून, मारामारी आणि इतर बरेच काही. रोजच कुठे ना कुठे गुन्हे घडलेले असतात आणि पोलिस तपास सुरू असल्याचे पालुपद पोलिस अधिकारी लावतात. आता हा तपास कसा ‘चालू’ आहे हे खुद्द पत्रकारांनाही कोडे पडून राहिले आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी बऱ्याचदा पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळतात. अर्थात त्यांनाही माहीत आहे, आपण एखादे थातूरमातूर कारण दिले आणि कदाचित अडचणीत आलो तर...! विषय असा आहे की, गणेशोत्सव काळात शहर परिसरात राहणारी अनेक कुटुंबे गावी गेली आहेत. आता गावी म्हणजे गोव्यातच. पणजीहून पेडणे किंवा फोंड्याहून आमोणे, मडगावहून सांगेला किंवा वास्कोहून मडकईला. परराज्यातील लोकांचे सोडूनच द्या. पण खुद्द गोमंतकीय चतुर्थीसाठी आपापल्या गावी गेल्याने आता प्रश्न आहे तो म्हणजे आपले सामानसुमान सुरक्षित राहील ना, याचा. अर्थातच प्रत्येक गोमंतकीयाला आपले घर चोरीपासून मुक्त असावे असे वाटणारच. पण चोर मात्र बरोब्बर संधी हेरून असतात. अजूनपर्यंत तरी गोव्यात झालेल्या मोठ्या चोऱ्यांचा छडा काही लागलेला नाही. त्यामुळे कदाचित ऐन चतुर्थीला चोर मोठा दणका देतील की काय, अशी भीती पोलिसांना वाटत आहे. तरीपण बाप्पा आहे ना...! अनेक पोलिस स्थानकात गणेशोत्सव असतो. यंदाही तो आहेच. त्यामुळे पोलिसांनी सध्या भार ठेवला आहे तो गणरायावरच. शेवटी बाप्पा या चोरांना चांगली बुद्धी देईल, आणि चोरीचा आकडा शुन्यावर येईल, असा विश्वास या पोलिसांना वाटतोय. ∙∙∙
(crime has increased tremendously in goa state)
चतुर्थीचा जोश..!
चतुर्थीचा पहिला दिवस गोव्यात ‘तय'' म्हणून साजरा होतो. वास्तविक या दिवसापासून खरी आमची चवथ सुरू होते. त्यामुळे बहुतेक लोक घरीच असतात. एक गोष्ट खरी आहे की, कोविडनंतर चतुर्थीचा माहोल पूर्वीसारखा राहिला नाही. आधी लोक दीड-दोन दिवस का होईना आपल्या मूळ घरी जाऊन मुक्काम करीत. सर्व भाऊ एकत्र जमत; परंतु आता केवळ पूजेला जाऊन येतात किंवा आरतीमध्ये भाग घेऊन आपापल्या घरी परत जातात. कोविडने जसा इतर सर्व क्षेत्रांवर प्रभाव टाकला, तसा धर्म उत्सवावरही टाकलेला आहे. असे असले तरी मंगळवारीही बहुतेक बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी, धक्काबुक्की पाहायला मिळाली. एकाच्याही तोंडावर मास्क नव्हता. उत्सव म्हटले, की गोवेकरांच्या अंगात विलक्षण उत्साह संचारतो. तरीही मान्य करावे लागेल की, चतुर्थीचा जोश काही प्रमाणात उणावलेलाच आहे. ∙∙∙
मुख्यमंत्री आश्वस्त
काँग्रेसमधील आठ सदस्य भाजपमध्ये कधी येतील, याची फिकीर करणे मुख्यमंत्र्यांनी आता सोडून दिल्याचे माहीतगार सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांना ते आलेले हवे आहेतच. परंतु त्याबाबत घाई नाही, असेही सांगण्यात आले. मात्र, विश्वजीत राणे यांच्याबरोबरच आणखी दोघा नेत्यांनी ही फूट विफल ठरविण्यासाठी प्रयत्न केले. याचा मात्र सुगावा सर्वांना लागला आहे. विशेषतः विश्वजीत राणे यांनी फुटिरांना फोन करून तुम्ही पुन्हा जिंकून येऊ शकणार नाही, असे त्यांना बजावले होते, अशी चर्चा सुरू आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी आखलेल्या या मिशनला तीन मंत्र्यांनी खो दिला, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आणि पक्षश्रेष्ठी नाराज झाले. या तीन मंत्र्यांना आपल्या खात्यांवर संक्रांत येईल, अशी भीती वाटते. भाजपला मात्र सध्या तरी कोण आले काय किंवा नाही, याची फारशी भ्रांत नाही. उलट नवे आठजण भाजप विधिमंडळ पक्षात आले तर मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी अधिकच वाढणार आहे. खाणारी तोंडे वाढतील, याचे काय? त्यामुळे विश्वजीत यांनी त्यांना काहीशी मदतच केली, नव्हे काय? ∙∙∙
दुखावलेले नेते
गोवा प्रदेश काँग्रेसने महागाईवर तीन दिवसीय चर्चेचे आयोजन केले होते. ‘महागाईवर चर्चा’ अशा शीर्षकाखाली हे आंदोलन राज्यातील महत्त्वाच्या शहरांत नुकतेच झाले. महागाईची झळ खरोखरच सर्व जनतेला बसली आहे. महागाईवर चर्चा काँग्रेसने मुद्दा उचलला खरा; पण त्यात चर्चा काही झालीच नाही. उलट विविध ठिकाणी विविध नेत्यांची भाषणबाजी झाली. तर चर्चा म्हटल्यानंतर या आंदोलनाच्या अनुषंगाने सर्वसामान्यांना काय वाटते, तसेच त्यांची मते जाहीरपणे नोंदवून घेण्याचे काम काँग्रेसने करायला हवे होते, असे काँग्रेसमधल्या काही वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. या नेत्यांना आंदोलनासाठी किंवा त्या चर्चेसाठी निमंत्रित केले नव्हते, असेही नंतर समजले. काँग्रेसने महागाईचा मुद्दा अनेक वेळा उचलला. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने महागाईवर आंदोलन छेडले. आता काही निवडणुका नसल्या तरी पक्षाने असे काही सर्वसामान्यांचे प्रश्न सतत उचलावेत, असे या दुखावलेल्या नेत्यांना वाटते. ∙∙∙
‘झुआरी’वरील नवा पूल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी झुआरी पुलाच्या शेवटच्या सांधेजोड कार्यक्रमात त्यांनी जोरदार भाषण केले. यापूर्वी मांडवी आणि अटल सेतूसाठीही अशाच प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यामुळे झुआरीबाबत काही नवे घडलेले नाही. परंतु हा पूल भव्यदिव्य आहे आणि प्रमोद सावंत सरकारच्या शिरपेचात एक नवे पीस त्यामुळे खोवले जाणार आहे. सावंत त्याबाबत लकीच ठरले. अनेक कामे त्यांच्या कारकिर्दीच्या पूर्वी सुरू झाली. परंतु त्यांचे कार्यक्रम मात्र सावंत यांच्या कारकिर्दीतच संपन्न झाले. झुआरी पुलाची सांधेजोड झाली असली तरी किती लवकर तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, शंकाच आहे. भाजपचे नेते नोव्हेंबरमध्ये तो सुरू होणार असल्याचे छातीठोकपणे सांगत असले तरी पुढचे सहा महिने तरी लोकांना वाट पाहावी लागू नये, म्हणजे झाले. शिवाय घाई-घाईने पूल सुरू केले तर अटल सेतूप्रमाणेच होऊ शकते. त्यामुळे नव्या झुआरी पुलाबाबत तरी हेळसांड नको. करोडो रुपये खर्च केलेल्या या पुलाबाबत सरकारने दक्ष राहावे आणि कंत्राटदारांवर करडी नजर ठेवावी, अशी अपेक्षा आहे. ∙∙∙
मग योजना बारगळली का?
चतुर्थीपूर्वी काँग्रेसला भगदाड पाडून आठजणांनी भाजपमध्ये डेरेदाखल होण्याची योजना फसली आहे. काँग्रेसमधील तीन सदस्य आता फुटण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यांनीही आपला एक भक्कम गट बनवून फुटिरांना टाटा-बायबाय केले. एका मोठ्या नेत्याचा मेहुणा हिरव्या नोटांचे भली मोठी बॅग घेऊन काही आमदारांना भेटला. त्याचे नाव पिंकी असल्याचीही चर्चा मध्यंतरी समाजमाध्यमांमध्ये चालली होती. दुसऱ्या बाजूला आठजणांचा गट बनत नसेल तर दिगंबर कामत यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचीही तयारी दर्शविली होती. परंतु भाजप पक्षश्रेष्ठींनी या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार दर्शविला. कोणत्याही प्रकारची पोटनिवडणूक घेण्यात पक्षश्रेष्ठी आता तयार नाहीत. तुमचा आठजणांचा गट बनवा, तसेच कायदेशीर फूट म्हणून दाखवूनच भाजपमध्ये प्रवेश करा, असा आदेश अमित शहा यांनी दिला आहे. परंतु काँग्रेसमधील आठजण निश्चित प्रवेश करतील, याची भाजप पक्षश्रेष्ठींना खात्री आहे. तो सुदिन कधी उजाडतो, याबाबत मात्र सगळे अधांतरी आहेत. ∙∙∙
७५ टक्के पंचायती?
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे सध्या खुशीत आहेत. त्यांचे भाऊ सरपंच झालेत. पीर्ण पंचायतीत सात-चार असे गणित त्यांनी जुळवून आणले आणि भाजपचा झेंडा रोवला. वास्तविक अनेकांची नजर तानावडेंच्या भावामुळे या पंचायतीकडे लागली होती. त्यामुळे तानावडेही तेथील राजकारणावर बारीक लक्ष ठेवून होते. भाजपने ७५ टक्के पंचायती आपल्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या असल्याचा दावा केला असला तरीही बहुतांश स्थानिक स्वराज संस्थांमध्ये किती कार्यकर्ते या पक्षाचे आहेत, याचा शोध घेतल्यास हाती फारसे काही लागणार नाही, असे पक्षातीलच एक नेता म्हणाला. गोव्यासारख्या राज्यात अशी खातरजमा करणेही कठीण आहे. याची पुरेपूर जाणीव भाजप नेतृत्वाला आहे. ज्या मोठ्या राज्यांमध्ये सरपंच थेट निवडले जातात. तेथे मात्र सत्ताधारी पक्षाची कसोटी लागत असते. गोव्यात भाजप पुन्हा सत्तेवर आल्यानंतर पंचायतींवर आपला झेंडा लागणार याची त्यांना खात्री होती. काँग्रेसने तर विधानसभा निवडणुकीनंतर तलवारी म्यान करून ठेवल्या आहेत. फुटकळ आंदोलने सोडली तर कोणाचाच आवाज नाही. भाजपच्या हे पथ्यावरच पडले तर नवल ते काय? ∙∙∙
काँग्रेसचा लीडर कोण?
राज्यात काँग्रेस पक्षाला सध्या कुणी वालीच राहिलेला नाही. मागच्या काळात दिगंबर कामत विरोधी पक्षनेते होते, आता अलीकडेच झालेल्या निवडणुकीत एक काळ भाजपचे नेते असलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो काँग्रेस पक्षात आले काय आणि विरोधी पक्षनेतेपद उचलून पळाले काय. शेवटी राजकारणात काहीही होऊ शकते, बरोबर ना...! मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमधील बहुतांश आमदार भाजपच्या गळाला लागले. आता भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी आवई उठली असतानाच कधी शमली ते कळलेच नाही. शेवटी काँग्रेस आमदारांचा भाजप प्रवेश म्हणजे पेल्यातील वादळ ठरले. पण या पेल्यातील वादळात दिगंबर पंत आणि मायकल भाऊ दोघेही काँग्रेसच्या लिस्टमधून बाहेर पडले. त्यामुळे सध्या काँग्रेसला विरोधी पक्ष नेता नाहीच मुळी. आता हे पक्ष नेतेपद खरे म्हणजे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनाच द्यायला हवे. कारण एक युवा नेता, त्यातच आमदार नसताना काँग्रेसच्या झेंड्यावर अनेक आंदोलने चालवली. खुद्द मागच्या विधानसभा अधिवेशनात अनेक प्रश्न आणि समस्या मांडताना सरकारला नाकीनऊ आणले, ते संकल्पबाबनी. संकल्प आमोणकर यांच्यासारखा लढाऊ बाणा काँग्रेसच्या इतर आमदारांत कुठेच दिसला नाही. त्यामुळे खरे म्हणजे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेतेपदाचे खरे दावेदार हे संकल्पच असल्याचा सूर सध्या काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. ∙∙∙
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.