Som Yag Yadnya Festival 2023 Goa
विवाह झालेल्या व्यक्तीला पत्नीसह अग्निहोत्र करण्याचा अधिकार आहे. अग्निहोत्री व्यक्तीलाच सोमयागाचे यजमानपद भूषवता येते.
सोमयागातही अनेक उपप्रकार आहेत. क्षत्रियांनी या सोमयागाचे वापरलेले पुढचे रूप म्हणजे राजसूय व अश्वमेध यज्ञ. या दोन यज्ञांचे उल्लेख आपण रामायण आणि महाभारतात ऐकले आहेत. राम-रावण युद्धात प्रचंड हिंसा झाली, त्याच्या परिहारार्थ म्हणून प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केला.
इंद्रप्रस्थ उभे करण्यासाठी खांडववन जाळताना जी हिंसा झाली त्याच्या निवारणार्थ राजसूय यज्ञ पांडवांनी केला. युद्धसमाप्तीनंतर पांडवांनीही अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध किंवा राजसूय यज्ञ हे सोमयागाचे अजून थोडे विस्तृत स्वरूप आहे. सोमयाग जाणून घेण्यापूर्वी अजून थोडे जाणून घेणे आवश्यक आहे.
अष्टौप्रहर अग्नी बाळगणारा, जिवंत ठेवणारा, विझू न देणारा अग्निहोत्रीच अशा प्रकारचे यज्ञयाग करू शकतो. नेहमी अग्निहोत्र करणाऱ्यांना महिन्यातून एकदा ‘इष्टी’ नावाचा यज्ञ करावा लागतो. त्या इष्टीमध्ये जर आपल्याला काही वैशिष्ट्यपूर्ण कार्य साध्य करायचे असेल तर वैशिष्ट्यपूर्ण कामनेसाठी ‘नक्षत्रइष्टी’, अमुक अमुक प्रकारची इष्टी असे अनेक प्रकार कामनेप्रमाणे करता येतात.
इष्ट मनोरथ पूर्ण करणारी ती इष्टी. पुत्राची इच्छा असेल तर मग पुत्र+काम+इष्टी म्हणजेच पुत्रकामेष्टी हा यज्ञ आपल्याला माहीत आहे. दशरथ राजाने हा यज्ञ केला होता. हा यज्ञसुद्धा वेदातील यज्ञाचा एक भाग आहे.
ही जी अग्निहोत्र करणारी, अग्नी बाळगणारी मंडळी असतात, त्यांच्यातही दोनतीन उपप्रकार आहेत. तीन अग्निकुंड अग्निशाळेत कायम जिवंत ठेवणारे ‘त्रेताग्नी’ आणि पाच अग्निकुंडांत अग्नी कायम जिवंत ठेवणारे ते ‘पंचाग्नी’. आताच्या काळात बहुतांश त्रेताग्नीच आहेत. पंचाग्नी क्वचितच आढळतात. त्रेताग्नी असलेल्या अग्निहोत्रीला सोमयाग करता येतो.
आधुनिक काळात एकट्याच व्यक्तीला सोमयागाचा सर्व खर्च उचलणे तसे शक्य नसते. त्यामुळे, चारपाच माणसे एकत्र येऊन अशा सोमयागाचे यजमानपद भूषवतात. सोमयागाच्या पूर्ण प्रयोगाचे यजमानपद भूषवणे शक्य नसते.
त्यामुळे, अष्टौप्रहर अग्नी बाळगणारी व्यक्ती त्यासाठी यजमानपदावरती आरूढ करावी लागते. सोमयागी किंवा त्रेताग्नी अग्निहोत्र्याला यजमानपदी बसवावे लागते व त्याच्या हातून हा सोमयाग करून घ्यावा लागतो.
दशरथ राजानेही जेव्हा पुत्रकामेष्टी यज्ञ केला तेव्हा विभाण्डक नावाच्या ऋषींचा मुलगा ऋषी शृंग यांना हृष्यमुख पर्वतावरून, जिथे शबरीमला वगैरे आहे तो भाग, बोलावण्यात आले. दशरथाने आपली मुलगी शांती हिचा विवाह त्याच्याशी केला आणि त्याच्यामार्फत हा पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यात आला.
अग्निहोत्री व्यक्तीलाच सोमयागाचे यजमानपद भूषवता येते. अग्नी बाळगण्याचे हे कार्य एकेकट्याने करता येत नाही. ब्रह्मचारी, विधूर किंवा पत्नीपासून विभक्त असलेल्या व्यक्तीला अग्निहोत्राचा अधिकार नसतो. पत्नी मृत झाल्यास हा अधिकार संपतो. विवाह झालेल्या व्यक्तीला पत्नीसह अग्निहोत्र करण्याचा अधिकार आहे.
त्यामुळे, विवाह झालेल्या त्रेताग्नी किंवा पंचाग्नीला सोमयागाचे यजमान होता येते. लग्न झालेल्या अग्निहोत्रींना दांपत्यांना पत्नीसह हा अग्नी कायम बाळगावा लागतो. घटस्फोटित नसलेल्या व पत्नी हयात असलेल्या अग्निहोत्रीला यजमानपदासाठी बोलवावे लागते. पूर्वी भारतात असे सुमारे 105 अग्निहोत्री होते. आता जवळपास दीडशे दोनशे अग्निहोत्री आहेत.
सोमयागामध्ये आणखी एका पद्धतीने वेगळेपण आपल्याला आढळते. हिंसक सोमयाग आणि अहिंसक सोमयाग. वेदामध्ये सोमयागाचे जे मूळ स्वरूप सांगितलेले आहे, त्यात अज म्हणजे बोकड किंवा शेळी यांचा बळी द्यावा असे सांगितले आहे.
हा जो बळी दिला जातो, हा हिंसात्मक सोमयाग आहे. त्यानंतरच्या काळामध्ये अहिंसात्मक सोमयाग रूढ झाला आणि हिंसात्मक सोमयागाचा निषेधच करण्यात आला. एकेकाळी क्षत्रिय असलेले राजे हिंसात्मक सोमयाग करत असत.
पण, नंतर हिंसात्मक सोमयाग करणारी मंडळी नगण्य झाली, आता तर कुणी नाही. आता होणारे सर्व सोमयाग अंहिसात्मक, म्हणजे ज्यात प्राण्याचा बळी दिला जात नाही, अशा प्रकारचे असतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.