पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या ‘जीएफए पुरस्कार सोहळा २०२६’ कार्यक्रमात सोमवारी संघटनेचे माजी अध्यक्ष शिवानंद साळगावकर यांना प्रशासकीय विभागातील, तर माजी भारतीय कर्णधार, दिग्गज मध्यरक्षक मॉरिसियो आफोन्सो यांना खेळाडू विभागातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ताळगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये कार्यक्रम झाला.
यावेळी २०२६-२७ मोसमातील युवा लीगसाठी गोवा फुटबॉल संघटना आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्यात भागीदारीची घोषणा करण्यात आली. गोव्यातील युवा फुटबॉलच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
पंचगिरीतील योगदानाबद्दल बर्नांडिन्हो वेल्हो आणि मिलाग्रिस तेरेझ, गोमंतकीय फुटबॉलसाठीच्या योगदानाबद्दल दिवंगत व्हॅलेरियन आर. गेर्सन रेबेलो, सामना फिक्सिंगच्या आरोपांच्या चौकशीतील कामगिरीबद्दल संदीप चोडणकर, तसेच सामन्यांच्या सचोटीबाबतच्या चिंता संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल प्रवीण दाभोलकर यांना विशेष प्रशंसापत्र देण्यात आले. युवा फुटबॉलच्या विकासातील योगदानाबद्दल रिलायन्स फाउंडेशनचाही गौरव झाला.
स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला गोवा व्यावसायिक लीगचे विजेतेपद पटकावत सलग तिसरे लीग जेतेपद मिळविल्याबद्दल ‘वर्षातील सर्वोत्तम संघ’ पुरस्कार मिळाला. कॅरेन ॲन डिसोझाने ‘चाहत्यांची आवडती खेळाडू’ हा पुरस्कार पटकावला. ‘‘प्रत्येक मोसमाचे यश अनेकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असते. गोव्याच्या संपूर्ण फुटबॉल समुदायाच्या योगदानामुळेच आपण आजच्या यशाचा उत्सव साजरा करीत आहोत.
गोमंतकीय फुटबॉलला आणखी उंचीवर नेण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न सुरू ठेवू,” असे जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी सांगितले. राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक मिळविणाऱ्या गोवा बीच फुटबॉल संघाला, तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गोवा महिला संघाला प्रत्येकी दीड लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.