Serial Killer Mahanand Naik Dainik Gomantak
गोवा

Serial Killer Mahanand Naik: एका फोन कॉलमुळे उघड झाली महानंदची कुकृत्ये; पोलिसांची चाल यशस्वी

दैनिक गोमन्तक

प्रमोद यादव

दुपट्टा किलर महानंद नाईक १५ जूनला फर्लोगवर कारागृहातून बाहेर आला आणि त्याने केलेल्या अमानवी कुकृत्यांच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. एकापाठोपाठ एक महिला बेपत्ता होत असताना हे कोडे पोलिसांना उलगडत नव्हते. अखेर एका फोन कॉलमुळे महानंद नाईक पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

गोव्याच्या इतिहासातील आजवरचे सर्वांत मोठे नृशंस हत्याकांड आणि त्यामागे मैत्री, लग्नाचे आमिष आणि खून असा समान धागा असलेल्या दुपट्टा किलर महानंद नाईकची कहाणी एखाद्या थरारपटासारखीच भयावह आहे. १९९४ ते २००९ अशी १५ वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत दुष्कर्म करत राहिला. लहानशा गोव्यात महानंदची दहशत निर्माण झाली होती आणि पोलिसांपुढे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. (Serial Killer Mahanand Naik)

मात्र, एका फोन कॉलवरून महानंदला अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करून महानंदला अटक करून रिमांड घेतला व चौकशीला सुरवात झाली, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी सी. एल. पाटील यांनी दिली. महानंद अतिशय चाणाक्ष होता.

त्यामुळे या प्रकरणांत पुरावे गोळा करताना तसेच, ते सिद्ध करताना पोलिसांची दमछाक झाली. बेपत्ता महिलांचे मृतदेह मिळत नव्हते. मिळाले तर कुठे फक्त हाडे किंवा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळायचे. त्यामुळे अनेक प्रकरणांत अडचणी आल्या. मात्र, अखेर तपासाअंती सत्य समोर येत गेले, असे पाटील यांनी सांगितले.

अशी होती ‘मोडस् ऑपरेन्डी’

महानंद गरीब मुलींना हेरून त्यांच्याशी मैत्री करायचा. विविध प्रलोभने दाखवून त्यांचा विश्वास जिंकायचा आणि लग्नाचे आमिष दाखवायचा. या काळात तो महिलांशी शारीरिक संबंधही प्रस्थापित करत असे. लग्नाचे आमिष दाखवून महिलांना तो घरातून दागिने आणि पैसे घेऊन यायला सांगायचा. निर्जनस्थळी संधी साधून महानंद महिलांचा दुपट्ट्याने गळा आवळून खून करायचा.

जिगरबाज पोलिस अधिकारी सी.एल पाटील यांची धडाडी

मुलगी बेपत्ता झाली अन्...

फोंडा पोलिस ठाण्यात २००९ साली एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आली अन् तपासाला सुरवात झाली. या तरुणीचे मोबाईलसह इतर साहित्यही गायब होते. हॅण्डसेट नसला, तरी तिच्या नंबरवरील कॉलची माहिती पोलिसांनी मिळवली.

त्यात एक फोन कॉल मिळाला, जो तिला वारंवार केला जायचा. हा नंबर महानंद वापरत होता. त्यावरून अनेक महिलांना दररोज कॉल केले जात होते. यातील एका महिलेची चौकशी केली असता, तिने महानंद फोन करून त्रास देतो तसेच, अत्याचार करत असल्याची माहिती दिली.

महानंदने मान्य केला पहिला गुन्हा

फोंड्यातील बेपत्ता युवतीचा तपास करताना पोलिसांना वाळपईत एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला होता. त्यामुळे संशयाची सुई महानंदकडे वळली. पोलिसांनी हिसका दाखवताच महानंदने गुन्हा मान्य केला. ज्या महिलेचा मृतदेह सापडला, ती महिला जीवंत असल्याचे पोलिसांनी महानंदला उगाच सांगितले.

ती महिला पोलिस ठाण्यात येणार असल्याचे महानंदला सांगितले. अखेर पोलिसांची ही खेळी यशस्वी ठरली आणि घाबरलेल्या महानंदने तिच्या हत्येची कबुली दिली. दुपट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केली होती, असे सी. एल. पाटील यांनी सांगितले.

अन् खून प्रकरणांची मालिकाच उलगडली

महानंदने फोंड्यातील महिलेचा १० जानेवारी २००९ रोजी दुपट्ट्याने गळा आवळून खून केला. सोन्याचे दागिने काढून घेऊन तिचा मृतदेह काजूच्या झाडावर लटकवला होता. पत्नीची मैत्रीण असलेल्या महिलेवर केलेल्या बलात्कार प्रकरणातही तो सापडला. त्यानंतर एक-एक प्रकरण समोर येत गेले आणि त्यांची कबुली महानंदने दिल्याने या मालिकेचा उलगडा झाला.

तेव्हा अटक केली होती पण...

महानंदला एका महिलेल्या प्रकरणात १९९५ साली अटक करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी रिक्षाचालकांनी फोंडा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन केले. तसेच, महानंद आमच्यासोबत होता आणि त्या घटनेवेळी तो जेवण करण्यासाठी घरी गेल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे त्याची सुटका झाली होती. पण पोलिसांनी त्यावेळी महानंद खरेच जेवण करण्यासाठी घरी गेला होता की नाही, याची सत्यता पडताळली नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे.

१४ वर्षांनी हत्येची कबुली

११ सप्टेंबर १९९५ रोजी बेतोडा येथे निर्जनस्थळी महानंदने एका महिलेचा खून करून दागिने पळविले, असा आरोप त्याच्यावर होता. या खुनाची कबुली महानंदने तब्बल १४ वर्षांनंतर ३ मे २००९ रोजी दिली.

विशेष म्हणजे, याच प्रकरणात १९९५ साली त्याला अटक झाली होती. मात्र, पुराव्याअभावी त्याला सोडावे लागले होते. त्यावेळी महानंद पोलिसांच्या कचाट्यात सापडला असता, तर पुढचे अनेक गुन्हे टळले असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT