Sanquelim: साखळी बाजारातील समस्या दूर करण्‍यासाठी पंचायत मंडळ प्रयत्‍नशील; रश्मी देसाईंची ग्वाही

विक्रेत्यांना महत्त्‍वपूर्ण सूचना; समस्‍या दूर करणार
Sanquelim Bajar
Sanquelim BajarDainik Gomantak

Sanquelim Bajar: एकेकाळी प्रसिद्ध असलेले व अलीकडे हरवत चाललेले साखळीच्‍या बाजाराचे वैभव व लोकप्रियता पुन्हा मिळवून देण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. आठवडा बाजाराच्या दिवशी लोकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्‍यासाठी पंचायत मंडळ प्रयत्‍नशील आहे, अशी ग्‍वाही साखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी दिली.

Sanquelim Bajar
Goa Kokani Academy : कोकणीत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी' या विषयावरील संवाद; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन

साखळी आठवडी बाजाराच्‍या दिवशी काल नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी प्रत्‍यक्ष भेट देऊन विक्रेते व ग्राहकांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, मार्केट निरीक्षक बसप्पा व अन्‍य कर्मचारी उपस्‍थित होते.

बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांनी संध्‍याकाळी जाताना कचरा तेथेच न टाकता तो एकाच ठिकाणी साठवून ठेवावा. त्यामुळे पालिकेला तो उचलणे सोयीचे ठरेल. तसेच ‘सिंगल यूज’ प्लास्टिकच्या वापरावर बंदी असल्‍यामुळे त्याचा वापर करू नये, अशा सूचना देसाई यांनी विक्रेत्यांना केल्‍या.

या बाजाराला लागून असलेल्या पालिकेच्या सुमारे १ हजार चौरस मीटर जागेची पाहणीही यावेळी नगराध्‍यक्षांनी केली. सदर जागा व बाजाराच्या मध्ये असलेल्या पारंपरिक नाल्यावर जलस्रोत खात्याच्या साहाय्याने संरक्षक भिंती उभारून नाला वरून बंद करण्याची योजना आखण्यात येणार आहे. त्यामुळे बाजार व त्या जागेला समानता प्राप्त होईल. जागा समान झाल्यास आठवडा बाजारालाही जास्त जागा मिळेल, असे नगराध्यक्षा देसाई यांनी सांगितले.

मासळी, चिकन-मटणसाठी स्वतंत्र मार्केट

नगराध्‍यक्षांनी नियोजित बाजार प्रकल्पाच्या जागेचीही पाहणी केली. हा प्रकल्प झाल्यानंतर तेथे मासळी, चिकन, मटण बाजाराला स्वतंत्र जागा दिली जाणार आहे. त्यानंतर सध्याचे मासळी, चिकन-मटण मार्केट जमीनदोस्त करून ती जागा मोकळी करण्यात येईल व तिचा पार्किंग व इतर कामांसाठी वापर करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे यावेळी सांगण्‍यात आले.

साखळी बाजारात येजा करण्यासाठी चांगला रस्ता व पार्किंग व्यवस्था नसल्याने लोक बाजाराकडे पाठ फिरवतात. त्यामुळे बसस्थानकापासून असलेल्या रस्त्यासाठी बोलणी सुरू आहे. ती पूर्ण होताच हा रस्ता केला जाणार असल्याने लोकांना बाजारात येजा करणे सुलभ होईल.

तसेच जास्तच जास्त जागा खुली करून ती पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे, असे नगराध्यक्षा देसाई यांनी सांगितले. साखळी बाजार सध्या ओस पडू लागल्याने व्यापारी चिंतेत आहेत. त्यांची ही चिंता दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. नवीन मार्केट प्रकल्पाचा आराखडा तयार करून त्याचे सादरीकरण पालिका बैठकीत करण्यात आल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com