Serendipity Arts Festival
पणजी: प्रतिष्ठित सेरेंडिपीटी कला महोत्सव उद्या, (रविवार) १५ डिसेंबरपासून पणजी शहरात सुरू होत आहे. या महोत्सवातील सारेच कार्यक्रम दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील असतात. महोत्सवातील डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या सरस कार्यक्रमांचा आस्वाद घेणे हा खचितच आनंदाचा अनुभव असतो. मात्र, गोमंतकीय कलाकारांचे सादरीकरण या महोत्सवात अपवादानेच होते.
विशेषतः त्यातील नाट्य विभागात तर एकाही गोमंतकीय दिग्दर्शकाचे नाटक आजपर्यंत सादर झालेले नाही. मात्र, उद्या सुरू होणाऱ्या महोत्सवात कौस्तुभ नाईक यांनी प्रियांका पाठक यांच्यासोबत दिग्दर्शित केलेले नाटक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कौस्तुभ नाईक यांनी आतापर्यंत वेगळ्या धाटणीची नाटके सादर करून गोमंतकीय प्रेक्षकांवर प्रभाव टाकला आहे.
सेरेंडिपीटीत सादर होणारे ‘गाब्रियल्स ट्रायल’ हे त्यांनी लिहिलेले आणि सहदिग्दर्शित केलेले नाटक देखील त्याला अपवाद नाही. एका गुलामाचा इथोपिया ते गोवा प्रवास आणि त्याच्यावरचा खटला यावर हे दीड तासाचे नाटक आधारलेले आहे. इतिहास आणि स्वत्व या संबंधित मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न हे नाटक करते. गाब्रियलच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अतिरेकांचे परीक्षण करणारे हे नाटक आहे. या नाटकात केतन जाधव, श्रावण फोंडेकर, प्राजक्ता कवळेकर आणि विभव सावंत यांच्या भूमिका आहेत.
कला अकादमी संकुलातील ‘फाऊंड्री’मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग १५ रोजी दुपारी १२ वा. सादर होणार आहे. दुसरा प्रयोग संध्याकाळी ४ वाजता असेल. एका परीने सेरेंडिपीटी महोत्सवातील नाट्य विभागाचा पडदा गोमंतकीय दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या नाटकाने उघडत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
हिंदी भाषेत सादर होणाऱ्या या नाटकाचा विषय गोमंतकीयांच्या ओळखीचाच आहे, तो म्हणजे ‘इन्क्विझिशन’. मात्र, या नाटकात इन्क्विझिशनचा बळी आहे एक इथोपियन गुलाम. चार वर्षांचा असताना त्याला मुस्लिम व्यापाऱ्याला विकले जाते. तिथून तो भारतात पोहोचतो. भारतात आल्यानंतर मुस्लिम मालकाला गुंगारा देऊन तो पळून जातो आणि पोर्तुगीज शासन असलेल्या भागात पोहोचतो. तिथं तो ख्रिश्चन धर्म स्वीकारतो. पण पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न करताना तो इन्क्विझिशनच्या कचाट्यात सापडतो. त्याच्यावर ट्रायल होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.