संजीवनी सहकारी साखर कारखाना कधी सुरू करणार आणि इथेनॉल प्रकल्प सुरू होणार की नाही, यासंबंधी काय ते स्पष्ट करा, आणि मागची देणी वेळेत द्या, अशी मागणी करीत आज गोमंतक ऊस उत्पादक संघटनेच्या बॅनरखाली शेकडो ऊस उत्पादक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी संजीवनीनगर - धारबांदोडा येथे रस्त्यावर उतरून महामार्ग रोखून धरला.
याप्रकरणी धारबांदोड्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी शेतकऱ्यांकडे बोलणी केली, पण ती विफल ठरले. यावेळी पोलिसांनी १२१ ऊस उत्पादकांना ताब्यात घेऊन त्यांना कुळे पोलिस स्थानकावर आणून बसवून ठेवले व नंतर त्यांची उशिरा सुटका करण्यात आली.
गेली तीन वर्षे ऊस उत्पादक संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, सरकारकडून काहीच ठोस आश्वासन मिळत नाही. त्यातच संजीवनीत इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे सरकारने ठरवले आहे. मात्र, त्याबाबत ऊस उत्पादकांना विश्वासात घेतलेले नाही.
त्यामुळेच संजीवनी सुरू करून ऊस उत्पादकांना न्याय द्या, राज्यातील ऊस उत्पादन नष्ट करू नका, अशी मागणी करीत शेकडो ऊस उत्पादक व त्यांच्या कुटुंबीयांनी धरणे आंदोलन छेडले.
सकाळी सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्याने शेवटी ऊस उत्पादक राष्ट्रीय महामार्गावर उतरले व त्यांनी रस्ता अडवून धरला. सुमारे चाळीस मिनिटे रस्ता अडवून ठेवल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची कोंडी झाली. यावेळी फोंडा व कुळे पोलिस स्थानकाचे निरीक्षक, उपजिल्हाधिकारी तसेच पोलिसांनी धाव घेऊन स्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला.
उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोंडकर यांनी सरकारकडे ऊस उत्पादकांची भेट घडवून बोलणी करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितली. मात्र, ऊस उत्पादकांनी नकार देऊन आम्हाला अटक केली तरी चालेल असे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई व इतरांनी स्पष्टपणे सांगितले. अटक करून सोडले तरी पुन्हा रस्ता अडवू असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन कुळे पोलिस स्थानकावर नेण्यात आले. उपजिल्हाधिकारी व पोलिस पुढील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
ऊस उत्पादकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कुळे पोलिस स्थानकावर आणल्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी इतर काँग्रेसजनांसोबत आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन ऊस उत्पादकांचा विषय येत्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल आणि न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
ऊस उत्पादक संघटना व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची बैठक रात्री पणजीत झाली. या बैठकीत ऊस उत्पादकांवरच इथेनॉल प्रकल्प सुरू करणारी कोणती कंपनी आहे का हे पाहा. तशी कंपनी तयार झाल्यास आम्ही इथेनॉल प्रकल्पास परवानगी देऊ.
तसेच पाच वर्षांपर्यंत जी रक्कम सरकारकडून मिळणार आहे ती मिळेलच, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून ऊस उत्पादकांची बोळवण केली. आज तुम्ही महामार्ग अडविला होता. तुम्हाला अटकही करून कलमे लावली असती, पण आम्ही ते केले नाही.
पाच वर्षे आम्ही जी रक्कम देण्याचे ठरविले होते, ते तुम्ही अन्य पीक घ्यावे यासाठी होते, असाही मुख्यमंत्र्यांनी दम भरल्याचे गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे पदाधिकारी फ्रान्सिस मास्करेन्हस यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.