पणजी: साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातील बायोडायजेस्टरच्या मोठ्या दुरुस्तीमुळे हा प्रकल्प पुढील २५ दिवस नव्याने कचरा स्वीकारणार नाही. त्यामुळे उत्तर गोव्यातील पंचायती आणि नगरपालिका यांच्यासमोर कचरा व्यवस्थापनाचे आव्हान उभे राहणार आहे. या काळात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक पातळीवर पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.
दररोज २५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची साळगाव प्रकल्पाची क्षमता आहे. उत्तर गोव्यातील किनारी पंचायतींसह म्हापसा आणि पणजी शहरांतील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. पर्यटन हंगामात किनारी भागात कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने प्रकल्प बंद राहण्याच्या काळात संकलन, वाहतूक आणि प्रक्रियेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात दररोज सुमारे ८८० टन कचरा निर्माण होतो. काकोडा येथे १०० टन प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प कार्यरत आहे; मात्र बायंगिणी येथील १०० टन आणि वेर्णा येथील २५० टन प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पांचे काम रखडले आहे. त्यामुळे साळगाव प्रकल्प बंद राहिल्याने पर्यायी व्यवस्थेवरील भार वाढण्याची शक्यता आहे.
साळगाव प्रकल्प ३० ऑक्टोबर २०१६ रोजी कार्यान्वित झाला. सात ते आठ वर्षांच्या वापरानंतर बायोडायजेस्टरची मोठी दुरुस्ती किंवा बदल आवश्यक ठरतो. मात्र, येथील बायोडायजेस्टर गेली दहा वर्षे सातत्याने कार्यरत असल्याने त्यांची दुरुस्ती करण्यासाठी कामकाज तात्पुरते थांबविण्यात येणार आहे.
पर्यायी व्यवस्थेची सात ठिकाणे
साळगाव प्रकल्प बंद राहणार असल्याने गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सात ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यात कांपाल, पाटो, आसगाव, हेडलॅण्ड सडा, कुंकळ्ळी, काणकोण आणि पेडणेचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.