PM Modi Speech: सत्तेतील अधिकार, नोकरशाहीचा प्रभाव आणि उद्योगांची अगतिकता; मोदींच्या कानउघाडणीनंतर अर्थविश्वात खळबळ

pm modi ficci speech corporate sector criticism: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राच्या जाहीरपणे केलेल्या कडक कानउघाडणीचे सर्वात समर्पक वर्णन म्हणजे cri de Coeur(क्रि द कोअर) असे करता येईल.
pm modi ficci speech corporate sector criticism
PM Modi SpeechDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

शेखर गुप्ता

फिक्कीच्या (एफआयसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राच्या जाहीरपणे केलेल्या कडक कानउघाडणीचे सर्वात समर्पक वर्णन म्हणजे cri de Coeur(क्रि द कोअर) असे करता येईल. म्हणजे ती त्यांच्या अंतःकरणातून उमटलेली आर्त साद होती, असे म्हणता येईल.

अर्थात, ज्या प्रसंगाच्या अनुषंगाने आपण बोलत आहोत, त्या प्रसंगी पंतप्रधान नेमके कोणत्या भावनेतून बोलत होते, हे केवळ या वाक्प्रचारातून पूर्णपणे स्पष्ट होत नाही. त्या प्रसंगी पंतप्रधान रागाने, निराशेने आणि अगदी अगतिकतेनेही बोलले. ‘तुम्हा लोकांना योग्यपद्धतीने कृतीशील करण्यासाठी मी आता आणखी काय करू?’ असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. त्यांचे बोलणे केवळ अंतःकरणातून उमटलेल्या आर्त हाकेपुरते मर्यादित नव्हते, तर त्यामागे त्याहून कितीतरी अधिक तीव्र अस्वस्थता होती. ते काहीसे अशा सेनापतीसारखे आहे, जो हजारो युद्धघोष करून, प्रेरणादायी शब्द बोलून आणि अगदी थोडीशी ‘स्फूर्ती’ देऊनही आपल्या सैनिकांना एखाद्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करू शकत नाहीये.

pm modi ficci speech corporate sector criticism
PM Narendra Modi Speech: सरकारने सवलती दिल्या, आता उद्योगांनी पुढे यावे; रोजगार, वेतनवाढ आणि गुंतवणुकीवर मोदींचा थेट सवाल

या लेखात मी फ्रेंच वाक्प्रचाराने सुरुवात केलीच आहे, तर या ‘स्फूर्ती’चा संदर्भ वॉटरलूच्या युद्धाच्या वेळी ड्यूक ऑफ वेलिंग्टन यांनी केलेल्या विधानाशी जोडायलाही हरकत नाही. इतिहासात नोंदवलेले त्यांचे मूळ विधान इतके नाट्यमय नव्हते. मात्र, १९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉटरलू या चित्रपटात वेलिंग्टनची भूमिका साकारणारे क्रिस्टोफर प्लमर, आपल्या सैनिकांना लढण्यासाठी प्रेरणा कुठून मिळते, हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्या डचेस ऑफ रिचमंडला सांगतात, “त्यांच्या देशभक्तीची स्फूर्ती म्हणजे जिन (मद्य) आहे.” वेलिंग्टन यांनी आपल्या सैनिकांना ‘घाणेरडे, भिकारी आणि बदमाश’ असे संबोधले होते.

मात्र, पंतप्रधानांना निश्चितच भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राला अशा शब्दांत संबोधायचे नव्हते. म्हणूनच मी वेलिंग्टन यांचे संपूर्ण विधान येथे देण्याचे टाळत आहे. परंतु, पंतप्रधानांची निराशा मात्र तितकीच खोलवरची आहे.

सरकार उद्योजकतेला कोणत्या प्रकारे प्रोत्साहन देऊ शकते? यासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. नियमांचे सुलभीकरण, किमान सरकारी हस्तक्षेप, बाजारपेठेवर योग्य आणि निष्पक्ष देखरेख, वित्तीय शिस्त, परवाने आणि गुंतवणुकीवरील निर्बंधांपासून मुक्तता अशा अनेक गोष्टी त्यात येतात. आणि या संपूर्ण ‘स्फूर्तिदायी’ पॅकेजमधील जिनच्या समकक्ष गोष्ट म्हणजे निश्चितच करकपात होय.

pm modi ficci speech corporate sector criticism
PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मोदी यांच्या नाराजीचे एक प्रमुख कारण म्हणजे करकपातीचा हा लाभ कर्मचाऱ्यांपर्यंत वेतनवाढ, नवीन भरती किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून पोहोचवण्याची कॉर्पोरेट कंपन्यांची उदासीनता. कंपन्यांचा नफा वाढलेला असतानाही असे घडलेले नाही. हे सैनिक त्या शत्रूवर हल्ला करण्यास तयार नाहीत. एकतर त्यांना हल्ला करण्याची भीती वाटत आहे किंवा सुरक्षिततेच्या वातावरणात राहून, करकपातीचा लाभ स्वतःच्या खिशात घालण्यातच ते समाधान मानत आहेत. या अनुषंगाने, पंतप्रधानांनी फिक्कीच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणातील काही विधाने पाहू.

“२०१४ मध्ये कॉर्पोरेट कर ३० टक्के होता. आम्ही तो कमी करून २२ टक्क्यांवर आणला. आज भारतात (India) १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागत नाही.” असे सांगत त्यांनी उद्योजकांना थेट सवाल केला की, मला माहीत आहे, तुम्ही टाळ्या वाजवणार नाही. कारण कितीही दिले तरी तुमचे पोटच भरत नाही. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली का? नाही. तुमची वृत्ती अजूनही तीच आहे, “मोदीजी, तुम्ही करून दाखवा, आम्ही बघू”

pm modi ficci speech corporate sector criticism
PM Narendra Modi Foreign Tour: "मुसाफिर हूं यारो..." मोदींच्या दौऱ्यांवर मिश्कील टोला

काँग्रेसची टीका

पंतप्रधानांच्या कानउघाडणीतून भारतीय उद्योगविश्व सावरत असतानाच, काँग्रेसनेही पंतप्रधानांच्याच वक्तव्याचा आधार घेत सरकारवर तातडीने उलटवार केला. ‘आम्ही इतके दिवस हेच सांगत नव्हतो का?’असा सवाल काँग्रेसने केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सर्वप्रथम प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “१२ वर्षांत पहिल्यांदाच अस्वस्थ झालेल्या पंतप्रधानांनी उद्योगजगताच्या प्रमुखांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्योगजगताच्या प्रमुखांना नक्कीच आश्चर्यच वाटणार असून हे त्यांच्यासाठी धक्कादायक असेल.” ‘एक्स’वरील सविस्तर पोस्टमध्ये त्यांनी या आर्थिक कोंडीसाठी उद्योगांना नव्हे, तर सरकारला जबाबदार धरले.

सरकारच्या धोरणांमुळे मर्जीतील उद्योगपतींना झुकते माप देणारी भांडवलशाही, नियामक यंत्रणांवरील प्रभाव आणि हस्तक्षेप, ‘भीती व दहशतीचे वातावरण’ तसेच ‘तपास यंत्रणांचा ससेमिरा’ यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. अखेरीस, पंतप्रधानांनी इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनीही आपल्या भाषण दौऱ्यात ‘आम्ही हेच तर सांगत होतो’, अशी भूमिका मांडली.

pm modi ficci speech corporate sector criticism
PM Narendra Modi: पिपळाच्या पानाचेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे चित्र, Watch Video

अर्थव्यवस्थेच्या सद्यःस्थितीवर भाष्य करणे हा माझा इथला विषय नाही. मात्र, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राकडून गुंतवणूक, व्यवसायाचा विस्तार आणि नोकरभरती होत नसल्याचे आपल्याला माहीत आहे. देशाचा आर्थिक विकासदर सात टक्क्यांपेक्षा अधिक असताना या क्षेत्राकडून ज्या प्रमाणात गुंतवणूक आणि विस्तार अपेक्षित आहे, त्याच्या जवळपासही हे चित्र नाही. स्टार्टअप्सची संख्या वाढत आहे; मात्र एकूणच उद्योजकतेच्या क्षेत्रात मोठी मरगळ आहे. आर्थिक विकासातील मोठा वाटा सरकारी खर्चातून, विशेषतः पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांवरील खर्चातून येत आहे.

भारतीय कॉर्पोरेट क्षेत्र जोखीम घेण्यास इतके कचरत असेल, तर ही परिस्थिती अचानक निर्माण झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही अस्वस्थता वाढत आहे. काही जण मागणीचा अभाव असल्याची तक्रार करतात, तर काहींच्या मते सरकारी नियम आणि नियमनांमुळे उद्योगांचा श्वास गुदमरतो आहे. अगदी निर्यातीसारख्या सकारात्मक आणि देशाच्या हिताच्या व्यवहारांसाठीही आजवर अनेक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी असंख्य अर्ज आणि कागदपत्रे भरावी लागतात. माझ्या मते, देशात येणाऱ्या प्रत्येक डॉलरचा मागोवा ठेवण्याची इच्छा रिझर्व्ह बँकेला असावी. आणि अर्थातच, प्रत्येक कागदपत्राच्या तीन-तीन प्रती सादर कराव्या लागतात.

pm modi ficci speech corporate sector criticism
PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

सरकारने काही ठिकाणी धोरणांमध्ये शिथिलता आणली असली तरी; नोकरशाहीची पकड पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाली आहे. एक छोटा प्रश्न प्रश्न विचारतो, गुगलवर न शोधता सांगा. खाणकाम, औषधनिर्माण आणि पोलाद या खात्यांचे मंत्री कोण आहेत? या तीन खात्यांचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे पंतप्रधानांनी याच क्षेत्रांमध्ये भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राच्या अपयशावर विशेष बोट ठेवले होते. त्या अनुषंगाने काही प्रश्न आहेत. आपण लोहखनिजासारख्या कच्च्या मालाची निर्यात का करतो? आपल्याकडे बॉक्साइटचा एवढा मोठा साठा असतानाही तयार पोलाद आणि विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियम मिश्रधातूंची आयात का करावी लागते?

pm modi ficci speech corporate sector criticism
PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

औषधनिर्मिती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असतानाही औषधनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सक्रिय औषधी घटकांसाठी (एपीआय) चीनवर अवलंबून का राहावे लागते? संबंधित खात्यांचे महत्त्वाचे मंत्री एकतर प्रभावहीन आहेत किंवा पक्षाच्या कामात व्यग्र आहेत. दुसरीकडे, सर्व अधिकार पंतप्रधान कार्यालयात केंद्रित झाले आहेत. त्यामुळे या कार्यालयावर अधिक ताण येत आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार नोकरशाहीकडे जातात. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रानेही ही परिस्थिती जणू स्वीकारली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी उद्योगविश्वाला चांगलाच परिचित असलेला मार्ग अवलंबला जात आहे. व्यवस्थेतील लाभांचा काही हिस्सा वाटून देऊन सत्ताधाऱ्यांशी सलोखा राखला जात आहे. हे सर्व व्यवहार पूर्णपणे कायदेशीर आणि नियमांच्या चौकटीत होत असले, तरी त्यातून बरेच काही स्पष्ट होते.

pm modi ficci speech corporate sector criticism
PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

निवृत्त होणाऱ्या सचिवांची संख्या पाहा. विशेषतः अर्थ मंत्रालयातील निवृत्त होणारे सचिव प्रभावशाली कंपन्यांच्या संचालक मंडळांवर महत्त्वाची पदे मिळवताना दिसतात. तसेच, खासगी क्षेत्रातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या बँकांचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती होत आहे.

मोदी सरकारला आपण जितक्या मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणत आहोत, असे वाटते आणि प्रत्यक्षात सरकार सुधारणा करतही आहे, तितक्याच प्रमाणात या सुधारणांमधून अधिकार नोकरशाहीच्या हातात जात आहेत. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्र नोकरशाहीला केवळ सूचक इशारे देऊन आधीच तिच्याशी जुळवून घेत आहे आणि संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत आहे. यातून एक विरोधाभास समोर येतो. हे सरकार अत्यंत शक्तिशाली आहे; मात्र धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची त्याची यंत्रणा अत्यंत कमकुवत आहे. परिणामी, वरच्या स्तरावर विकेंद्रित झालेले अधिकार मधल्या स्तरावर एकवटले जात आहेत.

pm modi ficci speech corporate sector criticism
PM Narendra Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्‍टेंबरमध्‍ये गोव्‍यात; विकास प्रकल्पांची होणार पायाभरणी, CM प्रमोद सावंतांची माहिती

शक्तिशाली सरकारही धोरणात्मक गोंधळापासून अलिप्त राहू शकत नाही. उलट, प्रचंड अधिकार हाती असल्यामुळे असे सरकार धोरणांमध्ये वारंवार बदल करण्याची शक्यता अधिक असते. दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कर (एलटीसीजी) हा सध्या मोठ्या चर्चेचा विषय आहे. या सरकारने या करामध्ये आतापर्यंत किती वेळा बदल केले, याची मोजदाद करा. लाभांशावरील कराबाबतही असेच घडले आहे. १९९१ पासून आजपर्यंतच्या अर्थमंत्र्यांनी सातत्याने असे सांगितले आहे की, सुधारित अर्थव्यवस्थेचा खरा पाया म्हणजे माफक आणि स्थिर, तसेच आधीच अंदाज बांधता येतील असे करदर. मात्र, सध्याच्या सरकारबाबत असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. या सरकारकडून व्यक्तींवर आकारला जाणारा कर हा कंपन्यांना लागू असलेल्या करदराच्या जवळपास दुप्पट आहे.

सरकारने आपल्या सार्वभौम अधिकारांचा वापरही अत्यंत धडाकेबाजपणे केला आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे सार्वभौम सुवर्ण रोख्यांवरील (सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स) भांडवली नफ्याच्या करसवलतीत सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने केलेले बदल. हे बदल सरकारच्या सोयीसाठी आणि सोन्याच्या किमतीतील चढ-उतारांपासून संरक्षणाची तरतूद न करताच या रोख्यांची योजना आणणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या चुका झाकण्यासाठी करण्यात आले. या सगळ्यातून एक जुना संदेश पुन्हा अधोरेखित होतो. भारतात सरकार कधीही चुकीचे असू शकत नाही!

pm modi ficci speech corporate sector criticism
Rahul Gandhi Video: काय चाललंय? राहुल गांधींना Kiss करुन तरुण पळाला, सुरक्षा रक्षकानं लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रालाही आपल्या अनेक कृतींबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल. मात्र, काही प्रकरणांमध्ये सरकारचीच बाजू कमकुवत आहे. दुर्दैवाने, भारतीय उद्योगजगताला हे माहीत आहे; मात्र याबाबत उघडपणे बोलण्याचे धाडस कोणीही करणार नाही. पडद्यामागे किंवा अनौपचारिक चर्चांमध्ये ते सरकारविरोधात नाराजी व्यक्त करतात. मात्र, संतप्त पंतप्रधानांसमोर किंवा गेल्या दोन वर्षांपासून एकच उपदेश करणाऱ्या अर्थमंत्र्यांसमोर ते गप्प आणि अपराधी भावनेने मान खाली घालून बसतात. ही केवळ मोदी सरकारच्या काळातील घटना नाही. २००७ मध्ये भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी उद्योगजगताच्या प्रमुखांना स्वतःसाठी अवाजवी वेतन घेत असल्याबद्दल खडसावले होते.

pm modi ficci speech corporate sector criticism
Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

उद्योग आणि वित्त क्षेत्रातील वर्तुळांमध्ये अनेक जाणकार आणि सक्षम व्यक्तींकडे मांडण्यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, त्याबाबत उघडपणे बोलण्याचे धाडस कोणीही दाखवत नाही. भारतीय उद्योगजगताला आता आणखी एका राहुल बजाज यांची प्रतीक्षा आहे. किंबहुना, असे एक नव्हे, तर अनेक राहुल बजाज उद्योगजगताला हवे आहेत.

(अनुवाद: रोहित वाळिंबे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.