Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: तानावडे ‘इनशर्ट’मध्ये!

Khari Kujbuj Political Satire: माजी मुख्यमंत्री व वार्केचे पात्रांव चर्चिल आलेमाव यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यात ते सांगतात, की बाणावलीत आपण आमदार व मंत्री असताना जो विकास केला तो यापुढे कोणीही आमदार झाला तरी त्यांच्याकडून होणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

तानावडे ‘इनशर्ट’मध्ये!

राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांचा यापूर्वीचा पेहराव कुर्ता-पायजमा असायचा. अनेक कार्यक्रमातही ते याच पेहरावात दिसायचे. राजकारणी म्हटले की पेहराव बदलत जातो. मुख्यमंत्री प्रमोद सावंत ‘इनशर्ट’मध्ये असायचे, पण आता ते कोट परिधान करतात. शनिवारी पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आलेले असताना झालेल्या कार्यक्रमास तानावडे यांनी उपस्थिती लावली. तानावडे यांना कुर्ता-पायजमामध्ये पाहणाऱ्यांना त्यांनी केलेला ‘इनशर्ट’ पाहून धक्काच बसला. अचानक पेहरावात तानावडे यांनी का बदल केला असावा हे त्यांनाच माहीत. तानावडे यांनी खादीचा कुर्ता-पायजमा परिधान करायला सुरवात केल्यानंतर अनेकांनी त्यांचे अनुकरण करीत पेहराव खरेदी केला होता. पक्षाच्या कार्यक्रमात अनेकजण कुर्ता-पायजमा पेहराव करून येत असत. ‘इनशर्ट’मध्ये वावरणे ही गोमंतकीयांची खासियत आहे, कदाचित थोडा बदल म्हणून त्यांनी ‘इनशर्ट’ केलेला असावा. ∙∙∙

पोस्टरवर स्पष्टीकरण

सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त आणि शवप्रदर्शनाच्या शुभेच्छा देण्यासाठी टीएमसीचे संयोजक समील वळवईकर यांनी जुने गोवे फेरी धक्क्याजवळ लावलेले पोस्टर फाडण्यात आले होते आणि ते पोस्टर कोणी फाडले याचे कोडे लोकांना पडले होते, परंतु ते पोस्टर जुने गोवे पंचायतीची परवानगी न घेता जलवाहिनीवरती लावल्याने काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण विनोद आचारी नामक व्यक्तीने समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे हा आचारी जुने गोवे पंचायतीचा सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, अधिकारी की सुपर सरपंच आहे, अशी चर्चा कुंभारजुवे मतदारसंघात होत आहे. पोस्टर कोणी फाडले हा प्रश्न होता, त्यावर आचारीभाऊने थेट स्पष्टीकरण दिल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ∙∙∙

चर्चिल आलेमाव यांचे आव्हान

माजी मुख्यमंत्री व वार्केचे पात्रांव चर्चिल आलेमाव यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यात ते सांगतात, की बाणावलीत आपण आमदार व मंत्री असताना जो विकास केला तो यापुढे कोणीही आमदार झाला तरी त्यांच्याकडून होणार नाही. हे आपले त्यांना आव्हान आहे. बाणावलीत आरोग्य केंद्राची मान्यता आपण मिळवून आणली. केवळ प्रोव्हेदोरियाकडून ही जागा आरोग्य खात्याच्या ताब्यात देणे बाकी आहे. मुख्यमंत्र्यांनी हे काम लवकरात लवकर करून देण्याचे आश्वासन दिल्याचे ते सांगतात. आपण खारेबांदचा, ओर्ली पुलाचा विकास केला. सार्वजनिक बांधकाममंत्री असताना जे रस्ते बांधले ते अजूनही जशाच्या तसे आहेत असेही ते या व्हिडिओत सांगतात, पण नेमके याच दिवसात हे सर्व सांगायची काय गरज असे लोक बोलू लागले आहेत. सध्या आप व काँग्रेसमध्ये बाणावलीवरून जो वाद चालू आहे, त्याचा फायदा घेण्याचा चर्चिल यांचा डाव तर नसेल ना! असे लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙

काँग्रेसमध्ये नेमके चाललेय तरी काय?

आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी काँग्रेसने गोव्यात इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यास हा पक्ष गोव्यातून हद्दपार होईल असे म्हटल्यावर काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी लगेच पलटवार करताना २०२७ मध्ये बाणावलीत काँग्रेसचा उमेदवार असेल व तत्पूर्वी जिल्हा पंचायतीच्या सर्व ५० जागा काँग्रेस लढवेल असे जाहीर करून टाकले. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर साहेबांनी थोडे सबुरीने घेत व्हेंझींचे मत हे त्याचे वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे. शिवाय इंडिया आघाडीतील पक्षांनी एकसंध राहणे जरुरीचे असल्याचे मत व्यक्त केले. काँग्रेसने कोणता तरी एक पवित्रा घ्यावा व पक्षातील नेत्यांनी वेगवेगळी मते व्यक्त करू नयेत. काँग्रेसच्या नेत्यांमध्येच सुंदोपसुंदी नाही का? असे लोकांना दिसेल की नाही व त्याचा परिणाम काँग्रेस पक्षावरच जास्त होईल हे वेगळे सांगणे न लगे. ∙∙∙

सनबर्नविरोधकच मागतात ‘पास’!

सनबर्न महोत्सवाविषयी सुरू असलेल्या वादात एक नवीन ट्विस्ट आले आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, काही विरोधक खासगीत सनबर्नचे ‘पास’ मागत आहेत. यामुळे या विरोधकांची खऱ्या अर्थाने कोणती भूमिका आहे, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अशा स्वार्थी विरोधकांची नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, अशा लोकांमुळे सगळ्या विरोधकांची प्रतिमा खराब होते. पेडणेतील स्थानिकांमध्ये या मुद्यावरून चिंता व्यक्त होत आहे. अशा लोकांमुळे सनबर्न होण्याची शक्यता वाढली आहे आणि त्यामुळे पेडणेकरांचा स्वाभिमान धोक्यात आला आहे अशी चर्चा पेडणेत सुरू झाली आहे. ∙∙∙

पंचाहत्तर कोटींचे नूतनीकरण हेच का?

कला अकादमीत तीन दिवस ‘स्वरमंगेश’ संगीत संमेलन झाले. अनेक रसिक यानिमित्ताने नूतनीकरण केलेल्या अकादमीत प्रथमच पोहोचले. त्यांच्यात चर्चा सुरू होती ती ७५ कोटी खर्चून नूतनीकरण केलेल्‍या अकादमीची. अनेक जण परिसर न्‍याहाळत होते. परंतु त्‍यांचा पुरता अपेक्षाभंग झाला. कारण, कला अकादमीच्या आवारात त्‍यांना कचरा इतस्‍तव पडलेला दिसला; शिवाय आर्ट गॅलरीही बंद आहे. कार्यालय, संगीत वर्ग अजून वास्तूत आलेले नाहीत. काही जण कुजबुजत होते की, अकादमीत होणारे सुरश्री केसरबाई संमेलन बंदच आहे. इथे चाललेय तरी काय? अर्थात ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’, असा विचार करून लोक शांत राहतात. आणखी काय करणार? ∙∙∙

भंडारी समाजातील वाद विकोपाला

गोमंतक भंडारी समाजामध्ये फूट पडल्यापासून या समाजाच्या लोकांचा या दोन्ही गटावरील विश्‍वास ढळू लागला आहे. समाज बळकट व मजबूत करण्याऐवजी त्यामध्ये फूट पाडून तो कमकुवत बनवण्यात येत आहे. त्यांच्यामधील मतभेद व वाद कमी होण्याऐवजी ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वी विद्यमान समाज समितीविरोधातील उपेंद्र गावकर या गटाची बैठक झाली. या बैठकीला समाजाचे ज्येष्ठ नेते व मंत्री उपस्थित होते. विद्यमान समितीमधील पदाधिकारी तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला न जाण्याचे ठरवण्यात आले आहे. ही समिती विरोधकांना कशीच दाद देत नसल्याने विरोधी गटासमोर अडचणी उभ्या रहात आहेत. समाजाचा विकास बाजूला ठेवून कोर्टकचेरीच सुरू झाली आहे. विरोधी गटाच्या तक्रारीवर संस्था महानिरीक्षक जो निर्णय देतील तो कोणाच्याही पारड्यात असला तरी त्याला न्यायालयात आव्हान दिले जाईल हे निश्‍चित. समाजाची विद्यमान समिती आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या तयार करत आहे व त्यामुळे ही समिती किती काळ अबाधित राहील हे येणारा काळच ठरवेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT