Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; ‘रो-रो’ दुरुस्तीला !

Khari Kujbuj Political Satire: मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मराठीतील प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांची मराठी कविता सभागृहाला ऐकवण्‍यास सुरुवात केली. ही संधी साधून युरींनी त्‍यांना मध्‍येच रोखले.

Sameer Panditrao

‘रो-रो’ दुरुस्तीला !

मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या दोन रो-रो फेरींपैकी एक फेरी अवघ्या काही दिवसांतच दुरुस्तीसाठी पाठवल्याने प्रवाशांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. सरकारने इतका पैसा खर्च केला, तो योग्य पद्धतीने वापरला गेला नाही का? की घाईघाईने या फेरी सुरू केल्या? असे प्रश्न आता सर्वसामान्यांमधून विचारले जात आहेत. आम्ही मोठ्या आशेने अन् अपेक्षेने या रो-रो फेरीचा वापर करायला लागलो, पण इतक्या लवकर एक फेरी बंद पडल्याने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता दुसरी फेरी कधी बंद पडेल, याची भीती वाटते अशी चर्चा प्रवाशांमध्ये होताना दिसते. ∙∙∙

चक्रावलेले गवे !

एक वेळ अशी होती की, गोव्यात गवे दाट जंगलात राहत असल्‍यामुळे लाेकांना त्‍यांचे फारसे दर्शन होत नव्‍हते. त्‍यामुळे लोकांना गवा पाहता यावा म्हणून बोंडला अभयारण्यात एक गवा आणला होता. मात्र या गव्‍याबद्दल जी बातमी छापली गेली, त्‍यात मोठा घोळ झाला होता. त्‍यात चुकून त्याच दिवशी झालेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाचा फोटो ‘हाच तो गवा’ अशा कॅप्शनसह या बातमीत वापरला, परिणामी वृत्तपत्राने माफी मागावी म्हणून कार्यालयावर मोर्चाही आणला. रवी मुख्यमंत्री असताना त्यांनी माकड, रानडुक्कर यांना शेतकऱ्यांसाठी उपद्रवी प्राणी ठरवू, असा प्रस्ताव आणला. पुढे त्यांच्या जागी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ते मनावर घेतले नाही. नजीकच्या काळात तर पात्रांवाच्या राजकीय शिष्याने क्रीडामंत्री असताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी उपद्रवी ठरलेल्या गव्याला चक्क बोधचिन्‍हाचा मान देऊन ‘क्रीडामित्र’ बनविले. मात्र आता मंत्रिपद गेल्यावर याच शिष्याने, प्रियोळच्या गवा हल्ल्याचे निमित्त धरून वन व कृषी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यात कृषीखाते पात्रांवाकडे असल्याने हा विषय पत्रकारांनी तिकडे नेला. शेवटी गुरू तो गुरू. त्याने प्रश्न पत्रकाराला ‘रेडा व गवा’ फोंडा ‘तालुका मतदार संघ’ ‘वनखाते व कृषीखाते’ यावरून इतके गोल फिरविले की त्या प्रश्नकर्त्याला नक्की घेरी आली असणार. मुलाखतीचा व्हायरल व्हिडीओ गव्यांनी पाहिल्यास, आपण ‘गवे आहोत की फकीर रेडे आहोत’ यावरून जर ते चक्रावून निषेध म्हणून त्‍यांनी गोवा सोडून जाणे पसंत केले, तर नवल वाटू नये ∙∙∙

विजयनंतर आता युरी?

अधिवेशन काळात सभागृहात कुणी मराठी भाषेतून बोलले, तर आमदार विजय सरदेसाई त्‍याला कसे डिवचतात, हे मंत्री सुदिन ढवळीकरांच्‍या बाबतीत कायमच दिसून येते. पण, आज मात्र विजय यांची जागा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घेतली. अर्थसंकल्‍पावरील चर्चेला उत्तर देणारे भाषण संपवत असताना, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मराठीतील प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांची मराठी कविता सभागृहाला ऐकवण्‍यास सुरुवात केली. ही संधी साधून युरींनी त्‍यांना मध्‍येच रोखले आणि ‘तुमचे सुदिन ढवळीकर झोपले आहेत, आधी त्‍यांना उठवा’ असा उपरोधिक टोला त्‍यांनी लगावला. पण, ‘हजरजबाबी’ असलेल्‍या मुख्‍यमंत्र्यांनीही संधी न दवडता ‘तुम्‍हाला ही कविता समजली. पण, कोकणी करूनही ऐकवतो’ असे म्‍हणत युरींना खाली बसण्‍यास भाग पाडले. पण, यातून युरी आलेमावही मराठीच्‍या विरोधात नाहीत ना? असा प्रश्‍न मात्र निश्‍चित उपस्‍थित झाला. ∙∙∙

जीत यांचा ठराव

मांद्रेचे ‘मगो’चे आमदार जीत आरोलकर यांनी गुरुवारी विधानसभेत मराठीला दुसरी राजभाषा करा, असे शून्य तासाला नमूद केले. त्यावर विजय सरदेसाई यांनी आरोलकर यांनी हे इंग्रजीत सांगितले आणि ते युक्तीवाद कोकणीत करत आहेत, असा मुद्दा पुढे आणला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही विधानसभेतील कायद्याची दुरूस्ती शून्य तासाला मांडता येते का, असा युक्तीवाद केला. मराठीचा ठराव आरोलकर हेच मांडू शकत होते. ‘मगो’ची मराठी विषयक भूमिका आहे. सुदिन ढवळीकर मंत्री असल्यामुळे ते हा मुद्दा मांडू शकत नव्हते. भाजपची भूमिका राजभाषा प्रश्न केव्हाच संपला अशी असल्याने त्यांचे आमदार तो मुद्दा काढणार नाहीत. भाजपला तीन अपक्षांचे समर्थन आहे, त्यातील डॉ. चंद्रकांत शेट्ये सोडले तर इतरांकडून तशी आशा नव्हती. त्यामुळे आरोलकर यांनी आपले कर्तव्य निभावले तरी इंग्रजीत म्हणणे मांडल्याने तो समाज माध्यमावर चर्चेचा विषय ठरला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळ साधत आरोलकर यांना म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मराठीप्रेमींना गोंजारणे सोडले नाही, हेही लपून राहिले नाही. ∙∙∙

विजयनगरची लगबग

नवनियुक्त राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हे आज सायंकाळी गोव्यात पोहचतील. जनता पक्षातून कारकिर्द सुरू केलेल्या त्यांनी स्थापनेपासून तेलगू देसममध्ये प्रवास सुरू केला आहे. त्यांची व आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांची १९७८ पासूनची मैत्री आहे. त्यामुळे तेथील राजकीय दोर तोडून राज्यपाल या तटस्थ पदापर्यंत वाटचालीसाठी ते आठवडाभर मानसिक तयारी करत असावेत. ते या दरम्यान कुटुबीयांच्या विद्यालयात गेले विद्यार्थ्यांशी भावूक संवाद साधला. वडील व भावानंतर वारसाहक्काने अध्यक्षपद लाभलेल्या मंदिरात जात त्यांनी राजकीय पदांचा राजीनामा देत गोव्यात येण्यासाठी स्वतःला तेथील जबाबदाऱ्यांतून अधिकृतपणे मुक्त केले. ∙∙∙

पिल्लई आता केरळमध्ये

उठसूठ केरळच्या दौऱ्यावर जाणारे मावळते राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे आता केरळच्या कायमच्या दौऱ्यावर गुरुवारी रवाना झाले. नवे राज्यपाल शपथबद्ध होईपर्यंत तांत्रिकदृष्ट्या ते पदावर असतील. केरळच्या भाजपचे दोन वेळा प्रदेशाध्यक्ष असलेले पिल्लई तेथील जनमानसात आपले स्थान टिकवून आहेत. केरळमध्ये आपापसांत न पटणाऱ्या कार्डिनलना एकत्र आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधानांसोबत त्यांच्या बैठका आयोजित करण्यात त्यांचा पडद्यामागचा वावर लक्षणीय असे. त्यांचा पिंड हा लोकांत मिसळणारा असल्याने ते सातत्याने फिरत असत. गोव्यात असताना ते राजभवनात कमी व गावांत जास्त असत. दानशूरपणाबद्दलही ते यापुढे ओळखले जातील. ∙∙∙

दामूंचा आनंद

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सध्या कुठे असा प्रश्न पडू शकतो. ते सध्या चिरंजीव रोहांग नाईक याच्या पदवीदान सोहळ्याच्या निमित्ताने व्यग्र होते. मध्यंतरी त्या समारंभाला इटलीत जाण्यासाठी व्हिसा प्रक्रिया करण्यासाठी ते मुंबईत होते. दामू यांचे जीवन कष्टाने भरलेले होते, ते त्यांनीच अनेकदा सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा चिरंजीव रोहांग याने ‘क्रिएटिव्ह ॲडव्हर्टायजिंग’ मध्ये पदव्युत्तर पदवी मिळाल्याचा आनंद निश्चितच दामू यांना आहे. या समारंभाच्या छायाचित्रात दामू यांचा हसरा चेहरा बरेच काही सांगून जाणारा आहे. यानिमित्ताने इटलीतील मिलान येथे अभिनंदन, चॅम्प रोहांग नाईक, दीक्षांत समारंभ ही केवळ पदवीप्राप्ती नसून, तो शिस्तीचा, एकाग्रतेचा आणि अनंत त्यागांचा गौरव आहे. तू सिद्ध केलं आहेस की, जिथे मन लावून प्रयत्न केले जातात, तिथे यश अटळ असतं. हे तर केवळ तुझ्या अद्भुत प्रवासाचं पहिलं पान आहे. मोठं स्वप्न पाहा आणि शिकणं कधीही थांबवू नकोस! हे दामू यांनी काढलेले उद्‍गार फारच बोलके आहेत. ∙∙∙

मडगावमधील ‘रेंट अ बाईक’

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी रेंट अ कार बद्दलचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. विक्टर हॉस्पिटललगत ‘रेंट ए कार’च्या तीन कचेऱ्या सुरु आहेत व वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. त्यामुळे स्थानिकांना त्याचा त्रास होत आहे. वाहतूक व पोलिस खात्याने याची दखल घ्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. पण मडगाव पालिकेमागे जिथे स्थानिकांना दुचाकी ठेवण्यास जागा आहे, तिथे ‘रेंट अ बाईक’च्या वीस ते पंचवीस दुचाकी ठेवल्या जातात, त्यामुळे स्थानिकांना पार्कींगला जागा शोधावी लागते. आता तर तिथे दुचाकी दुरुस्तीही सुरू झाली आहे. हे सगळे कुणाच्या आशीर्वादाने चाललेय हे कामत यांना माहीत नाही का? या दुचाकी हटविल्या जात नाहीत. काही नगरसेवकांनी आवाज उठविला. नंतर तोही बंद झाला. याकडे कामत यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आता मडगावात सुरू झालीय. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT