
दोन दशके उलटली. सरकारे आली-गेली, फाईली फिरल्या... पण फोंडा-तिस्कमधील सरकारी आरोग्य निवासस्थानांच्या खापऱ्यांवर अजूनही कोणाचाही हात पडलेला नाही. कधी काळी कर्मचाऱ्यांनी वास्तव्य केलेल्या या इमारती आता सळसळत्या गवतात लपलेल्या सापांचे सुरक्षित निवासस्थान झाल्या आहेत. छताचे पत्रे कधी उडतील याचा नेम नाही, भिंती पडलेल्या, पायऱ्या गळक्या – अशा या इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्थानिकांनी कितीदा तरी आवाज उठवला. पण स्थिती बदललेली नाही. एकीकडे सरकार ‘स्वच्छ भारत’ आणि ‘हर घर जल’सारख्या मोहिमा चालवतं, पण या भग्न इमारती मात्र ‘हर घर भंगार’ मोहिमेचं मूर्तिमंत उदाहरण बनल्या आहेत. जर वेळेत ही धोकादायक इमारत पाडली नाही, तर भविष्यात एखादा अपघात झाला, तर जबाबदारी कुणाची? सध्या तरी ही इमारत ‘सरकारी दुर्लक्षाचे’ ऐतिहासिक पुरावे म्हणून उभी आहे. पाहुणे फोंड्याला फिरायला आले, तर तिस्कची ही ‘हॉरर टुरिझम’ साईट म्हणून दाखवता येईल! ∙∙∙
चोडण रायबंदर मार्गावर सुरू केलेली रो-रो फेरीबोट सेवा सरकारला डोकेदुखी ठरेल, असे दिसते. या फेरीबोटीसाठी वाढीव शुल्क आकारण्यात येते. त्यातही स्थानिक पर्यटक असा वाहनांसाठी भेद केला जातो. आता स्थानिकांनी पारंपरिक तीन फेरीबोटीही या मार्गावर ठेवा, जुनेच तिकीट दर ठेवा, अशी मागणी पुढे रेटली आहे. सरकारला विचार करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे स्थानिकांना नको असल्यास रो-रो फेरीबोटी इतरत्र हलवू, असे उद्गार काढण्याची वेळ मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर आली आहे. ∙∙∙
‘हाती के खाने के दात और दिखाने के दात अलग होते है’, अशी हिंदीत एक म्हण आहे. राजकारण म्हणजे चिखलाचे डबके असे म्हटले जाते. राजकारणात चिखल आहे म्हणून चांगले लोक राजकारणात उतरत नाहीत, असे काही लोकांचे म्हणणे आहे. राजकारणी विशेष करून सत्तेवर असलेले मंत्री, आमदार शेत जमिनी बुजवून इमारती उभारतात, असाही आरोप होतो. मात्र, आता आपले राजकारणी शेतात उतरायला लागले आहेत, ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी प्रत्यक्षात कधी शेतात पाय टाकला की माहीत नाही. मात्र, काही दिवसांमागे रोहन शेतीची नांगरणी करताना व पेरणी करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सभापती रमेश तवडकर यांचा चिखलाशी जवळचा संवाद शेतात पावर टीलर चालवताना रमेश तवडकर यांचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड, एल्टन डीकॉस्टा हे ही जरी शेतात उतरले नसले तरी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत ट्रॅक्टर व हार्वेस्टरची सोय केली आहे. काही का असेना, राजकारणी शेतात उतरतात हे सकारात्मक म्हणावे लागेल. ∙∙∙
सोमवारी, म्हापशातील एका शालेय विद्यालयाची संरक्षक दगडी भिंत कोसळली. पहाटेच्या वेळी ही घटना घडल्याने, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मागील तीन वर्षांत तिसऱ्यांदा हा विद्यालयाच्या संरक्षक भिंतींचा काही भाग कोसळला. त्यानुसार, दोनवेळा स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमदार निधीतून ती दुरुस्त करून दिली होती. परंतु विद्यालयाची देखील जबाबदारी आहे की नाही? आपल्या मालकीच्या संरक्षक भिंतीची स्थिती कमकुवत झाली असताना, विद्यालायकडून आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. याच भिंतीचा आणखी एक भाग कोसळू शकतो, अशी काहीशी स्थिती आहे. अशातच आता पुन्हा नव्याने विद्यालय या कोसळलेल्या भिंतींची दुरुस्ती करावी, असा अर्ज शेवटी आमदारांकडेच करतील. ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शाळा व्यवस्थापनाला आपली जबाबदारी कधी कळणार अन् एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी व्यवस्थापनाला जाग येते की नाही?, हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. ∙∙∙
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना आपल्यात व पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यात वाद नाहीत, असे सांगावे लागत आहे. सोमवारी पर्वरीत विधानसभा संकुलाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आवर्जून सांगितले. त्यांचे पूर्वीचे मित्र बाबू आजगावकर यांनी जीत यांची गोवा पर्यटन विकास महामंडळावर नियुक्ती केली होती, याची आठवण करून देताच ती नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सांगत आरोलकर यांनी हजरजबाबीपणाचे दर्शन घडवले. राजकारणात कोणी मित्र वैगेरे नसतो, असेही ते म्हणाले. तोच न्याय आर्लेकर यांनाही लागू होतो, असे पत्रकारांनी म्हणताच मनातील भाव चेहऱ्यावर येणार नाहीत याची काळजी घेत तसे काही नाही, असे म्हणत त्यांनी आर्लेकर यांना जवळ ओढले आणि विषय बदलला. ∙∙∙
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचा साळगावचे आमदार केदार नाईक यांना विजयी करण्यात किती हात होता, याची राजकीय चर्चा निवडणुकीनंतर बरीच झाली आहे. आता लोबो हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आल्यानंतर त्यांच्या हालचालींकडे राजकीय चष्म्यांतून बारीकपणे पाहिले जात आहे. सोमवारी विधानसभेत ते साळगावचे आमदार केदार यांच्याशी हातवारे करून बोलत होते. ते काय बोलले असावेत याचा केवळ अंदाजच लावता येत होता कारण त्यांचा आवाज फार मर्यादीत होता. ∙∙∙
गोव्याच्या सर्वच शहरांत वेगवेगळ्या हंगामात विविध वस्तू घेऊन परप्रांतीय विक्रेते येतात व रस्तोरस्ती फिरून त्या वस्तु विकत असतात. मडगावांत तर अशा या विक्रेत्यांचे प्रमाण पुष्कळच असते. हे लोक प्रमुख रहदारीच्या भागांत रस्त्यावर राहून विक्री करतात त्यामुळे वाहतुकीत तर व्यत्यय येतोच पण त्यातून स्थानिक नगरपालिकेला महसुलाच्या रुपांतून कोणताच फायदा होत नाही. मात्र स्थानिक बाजारपेठेंतील व्यापा-यांना फटका बसतो. रस्त्यावरच वस्तु मिळत असल्याने कोणी बाजारांत जात नाहीत. पूर्वी चतुर्थी, दिवाळी, नाताळ सारख्या मुख्य सणांच्या दिवसातच हे विक्रेते येत होते. पण आता वर्षांतील बाराही महिने हे लोक रस्त्यावर फिरून व्यापार करत असतात. मग बाजारांतील व्यापाऱ्यांनी काय करायचे, अशी विचारणा ते करू लागलेत. नगरपालिकेचे बाजार निरीक्षक व त्यांचे सहकारी यांचे या लोकांशी काही संधान तर नसावे ना, अशी शंकाही आता काहींना येऊ लागली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.