

Crude Oil Import India: मध्यपूर्वेतील आकाशात घोंघावणारे युद्धाचे ढग आणि इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षाचा तेरावा दिवस उजाडलेला असताना, संपूर्ण जगाचे डोळे विस्फारुन टाकणारी एक बातमी भारताच्या बाजूने आली. जागतिक ऊर्जा संकट गडद होत असताना इराणने भारताच्या तिरंग्याला मानाचा रस्ता दिला. धोरणात्मकदृष्ट्या जगातील सर्वात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या 'होर्मुजच्या सामुद्रधुनीतून' (Strait of Hormuz) भारतीय टँकर्सना सुरक्षित प्रवासाची अधिकृत परवानगी मिळाली. हे केवळ एका जलमार्गाचे उघडणे नसून भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या चाणाक्ष मुत्सद्देगिरीचा आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेचा हा मोठा विजय मानला जात आहे.
जेव्हा अमेरिका, युरोप आणि इस्रायलची जहाजे या मार्गावरुन जाण्यास धजावत नाहीत किंवा त्यांच्यावर इराणने बंदी घातली आहे, अशा काळात 'पुष्पक' आणि 'परिमल' या दोन भारतीय जहाजांनी मृत्यूच्या छायेतून शांतपणे मार्ग काढला. दोन दिवसांपूर्वीच एका भारतीय कॅप्टनच्या नेतृत्वाखालील लायबेरियन ध्वज असलेले जहाजही मुंबई बंदरात सुखरुप पोहोचले. इराणच्या या निर्णयामुळे भारताच्या (India) ऊर्जा सुरक्षेला मोठे कवच मिळाले. ही सामुद्रधुनी जागतिक अर्थव्यवस्थेची मुख्य वाहिनी आहे.
55 किलोमीटर रुंदीचा हा जलमार्ग इराण आणि ओमानच्या मध्ये असून तो पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडतो. जगातील एकूण तेल वाहतुकीपैकी तब्बल 31 टक्के हिस्सा म्हणजेच दररोज 13 दशलक्ष बॅरल तेल याच मार्गावरुन जाते. जर हा मार्ग बंद झाला, तर जागतिक बाजारपेठा कोलमडून पडतील आणि घराघरातील बजेट विस्कळीत होईल, इतकी या मार्गाची ताकद आहे.
इराणने (Iran) आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की, जे देश अमेरिका किंवा इस्रायलच्या हितसंबंधांसाठी काम करत आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग सुरक्षित असणार नाही. मात्र, भारताशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि भारताचा तटस्थ दृष्टिकोन यामुळे इराणने केवळ भारतीय जहाजांना 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. मध्यपूर्वेतील हा विळखा अधिक घट्ट होत असताना भारताने मिळवलेला हा विशेष रस्ता आपल्या परराष्ट्र धोरणाची ताकद सिद्ध करणारा ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.