
शपथविधीसाठी शिवलेले सूट पडून
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याने अनेक इच्छुक आमदारांनी शपथविधीसाठी सूट शिऊन घेतले आहेत. काहींना आता हे सूट छोटे होऊ लागल्याने नव्याने शिऊन घ्यावे लागणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव सांगत असताना दिगंबर कामत मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगत होते, हे पाहताच आलेमाव कामतांकडे मोर्चा वळवत म्हणाले, कामत साहेब आता मुख्यमंत्र्यांच्या कानात काही सांगू नका ८ ऑगस्टनंतर तुमचे काम करतील, असे सांगितलेय. त्यांच्या या वक्तव्यामुळे विधानसभेत उपस्थितांत एकच हशा पिकला आणि मुख्य म्हणजे त्यांचा हा मार्मिक बाण कामतांना खटकला देखील.
बाबू व बाबाजीची दोस्ती!
कोण कोणाचा मित्र असावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र, काही जणांना इतरांच्या भानगडीत नाक खुपसण्याची भारी हौस. माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाबाजी सावंत यांच्यात सध्या बरीच दोस्ती झाली आहे, असे दिसते. तसे बाबाजी बाबूंच्या मतदारसंघात येत नाहीत आणि त्यांच्या शिक्षकी पेशाशी तर बाबूंचा दूर दूरचा संबंध नाही. बाबाजी सरांचा भाजपाशी जवळचा संबंध आहे. बाबूही भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष यातूनच मैत्री जुळली असणार. बाबाजीने शिक्षक संमेलनात बाबूला व्यासपीठ दिले. बाबूने विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला बाबाजीला व्यासपीठ दिले. ‘बाबू व बाबाजी का जोड मजबूत झालाय’, असे लोक म्हणू लागलेत!
‘तोच’ न्याय पालिकेला का नाही?
मडगावच्या नगराध्यक्षांचा ठरवून दिलेला कार्यकाळ संपल्याने त्यांना पदावरुन हटवून नगराध्यक्षपदाचा ताबा दुसऱ्याकडे द्यावा, अशी मागणी मागचा कित्येक काळ अधून मधून होत आहेच. मात्र बाबांचा खंबीर आशीर्वाद असल्याने दामू शिरोडकर नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरून कुठल्याही परिस्थितीत खाली येत नाहीत. हल्लीच कार्यकाळ संपल्याचा दावा करून दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष संजना वेळीप यांना पदावरून खाली उतरण्याचा आदेश भाजप पक्षाने दिला होता. जर जिल्हा पंचायतीच्या बाबतीत भाजप असे आदेश काढतो, तर मडगाव पालिकेच्या बाबतीत असे आदेश का बरे येत नाहीत, असा सवाल आता काही नगरसेवक करू लागलेत. यावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक काही खुलासा करतील का?
आमदारांचे ‘पीए’ पण सामील?
बुधवारी विधानसभेत रेंट-ए-कार परवान्यांसाठी मंत्र्यांचे ‘पीए’ पैसे घेतात, अशा आरोपांनी चांगलीच खळबळ उडाली आहे. असे आरोप काही उगाच होत नाहीत, नक्कीच कोणीतरी पैसे घेतले असणार, अशी चर्चा आता गल्लीबोळात सुरू झालीय. एका आमदाराने तर अधिवेशनात थेट सांगितले की, पैसे घेणारे वेगळेच लोक आहेत आणि त्यांनी मंत्र्यांच्या ‘पीए’ला पैसे दिले. यावर संबंधित मंत्र्याने तक्रार करण्यास सांगितले असले तरी, आग उगाच पेटत नाही; कुठेतरी काहीतरी जळत आहे, अशी चर्चा आता जोर धरू लागलीय. या प्रकरणात लोकांना वाटू लागले आहे की, मंत्र्यांचे ‘पीए’ असले तरी, यात आमदारांचे ‘पीए’ देखील सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, ‘रेंट-ए-कार’ परवाने मिळवण्यासाठी मंत्रालयापासून ते स्थानिक पातळीपर्यंत अनेक ठिकाणी ‘सेटिंग’ लागते, असे बोलले जातेय; खरे खोटे ते पैसे देणाऱ्यांनाच ठाऊक नाही का?.
सरकारपुढला पेच
विधानसभा अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळात बदल अपेक्षित आहेत, त्यामुळे आता कुणाला संधी आणि कुणाला वगळणार याबाबत सत्ताधारी मंत्री, आमदारांच्या कार्यकर्त्यांत चर्चा सुरू आहे. फोंडा तालुक्यात चारही मतदारसंघात चार मंत्री होते, त्यातील एका मतदारसंघाच्या मंत्र्याला काढून टाकण्यात आल्याने सध्या तीन मंत्री शिल्लक आहेत. मात्र, या तिन्ही मंत्र्यांना हात लावणे सरकारला मोठे मुश्किलीचे ठरणार आहे. कारण दोन मंत्री हे भंडारी समाजाचे आहेत तर तिसरा मंत्री हा ‘मगो’चा आमदार आहे. भविष्यात ‘मगो’सोबत निवडणुकीला जायचे झाल्यास याच आमदाराची गरज सरकारला लागणार आहे, त्यामुळे पुढील रणनीती आखूनच कुणाला वगळायचे आणि कुणाला घ्यायचे हाच पेच सध्या सत्ताधारी पक्षाला लागून राहिला आहे.
हा तर देवीचा कोप !
देवाची करणी आणि नारळात पाणी, अशी एक म्हण आहे. देवावर श्रद्धा असलेले मानतात की, जर आपण काही गैर केले तर देवाचा कोप होतो. श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण ही जागृत देवी. हजारो भक्तांची या देवीवर अपार श्रद्धा आहे. देवी शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मूळची कुंकळ्ळीची. बाटाबाटीच्यावेळी देवी आज जिथे मंदिर आहे, तिथे फातर्पा येथे स्थलांतरित झाली होती. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यात देवीचे मूळ स्थानी कुंकळळीत आगमन होते.ज्या रस्त्यावरून देवीची पालखी मिरवणूक येते, त्याच रस्त्याला लागून उभारलेले बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. कुंकळ्ळीत तशी अनेक बेकायदेशीर बांधकामे आहेत मात्र पालखी रस्त्यावरील बांधकामावर कारवाई होते, कारण देवी कोपली, असे भक्त म्हणायला लागले आहेत.
शौनकची ‘तत्परता’?
शौनक बोरकर हे फोंडा पालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक. मात्र त्यांचा संचार खडपाबांध मधल्या पाच, सहा, सात या तीनही प्रभागांत दिसून येतो. परवा प्रभाग पाच मधल्या एका सोसायटीत पावसामुळे झाड पडले. ही बातमी कळताच बोरकर साहेब तिथे हजर. केवळ हजर झाले नाहीत, तर त्या समस्येचेही त्यांनी निवारण केले. अशा अनेक आपत्तीजनक प्रसंगाना ते असेच धावून जाताना दिसतात. या त्यांच्या तत्परतेची फोंड्याच्या खडपाबांध भागात जोरदार चर्चा सुरू असून पुढच्या निवडणुकीत प्रभाग सहा महिलांकरता आरक्षित झाला तर दुसऱ्या प्रभागात राहण्याची ही तयारी तर नव्हे ना, असा तर्क त्यांचे काही विरोधक करताना दिसत आहे. काही का असेना, सध्या बोरकरांची गाडी ‘फुल स्पीड’मध्ये असून त्याचा फायदा या भागातील लोकांना होत आहे, हेही नसे थोडके!
पाऊस चांगला पडतोय; अळंबी खा!
चाय पिया सामोसा खाया, अशा तऱ्हेची विनोदी उत्तरे देणारे रवी पात्राव तसेच सर्वांचे आवडते आमदार आहेत. कुणाला कधी दुखवायचे नाही, पण हळूच कसा चिमटा काढायचा हे त्यांना चांगले अवगत आहे. विधानसभा अधिवेशनाच्या सुरवातीलाच विधानसभेच्या दारावर कुणीतरी त्यांना पावसाबद्दल विचारले तर पाऊस चांगला पडतोय, अळंबी खा, असा मिश्किल सल्ला त्यांनी दिला. आता तर वन्य प्राण्यांबद्दल बोलताना त्यांना आपले मित्र करा, असा सल्ला ते देतात. वन्य प्राणी आपले शत्रू नाहीत, त्यामुळे त्यांना मित्र करा, असा सल्ला द्यायला ते विसरत नाहीत, त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्याला आधी प्रश्न पडतो, तो म्हणजे पात्रावंना नेमका कोणता प्रश्न विचारायचा. ∙∙∙
चतुर्थीनंतर कशाला?
फोंड्यातील वरचा बाजारामधील धोकादायक घोषित केलेल्या मासळी मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील सर्व विक्रेत्यांनी तेथून नवीन मार्केटात स्थलांतरित करण्याची तयारी दर्शवल्याने नगराध्यक्ष आनंद नाईक यांना हायसे वाटले आहे. पण लोकांना मात्र नवाच प्रश्न पडला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जुने मार्केट इमारत धोकादायक ठरलेली आहे व म्हणून ती पाडून त्या जागी नवीन इमारत उभारली जाणार आहे. त्यानुसार मासळी व मटण विक्रेत्यांनी गत महिन्यातच नव्या इमारतीत स्थलांतर केले. पण पहिल्या मजल्यावरील साठेक व्यापारी वेळ काढत होते, प्रत्यक्षात खरेदीसाठी येणाऱ्या सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे. त्यांच्या मागणीनुसार चतुर्थीपर्यंत वाट पाहिली व दरम्यानच्या काळांत काही दुर्घटना घडली तर काय अशी भीती अनेकजण व्यक्त करत आहेत. स्थलांतराची तयार असेल तर चतुर्थीनंतर कशाला, आताच का नाही, अशी विचारणाही ते करत आहेत.
असाही तगादा..
गृह खात्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या ठराविक कालावधीनंतर बदल्या केल्या जातात. मात्र, सध्या काही पोलिस स्थानकात असे काही अधिकारी अन् कर्मचारी आहेत, ते आपल्याला संबंधित पोलिस ठाण्यातून रिलीव्ह करू नये, म्हणून वरून फोन किंवा राजकीय तगादा लावण्याचे प्रकार सुरू आहेत. जेणेकरून त्या ठाण्याच्या निरीक्षकांनी त्यांची ‘रीलिव्ह’ ऑर्डर काढू नये. सध्या अनेकांना लांबच्या पल्ल्याच्या पोलिस स्थानकात जाण्याची इच्छा नसल्याने संबंधित अधिकारी मुजोर झाले आहेत. ही मंडळी कामे करण्यास देखील कंटाळा करत आहेत. विशेष म्हणजे, ड्युटीवर वेळेत येत नाहीत. यात महिला पोलिसांचाही समावेश आहे. ज्या अलीकडेच ‘रिक्रूट’ झाल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.