Vegetables became expensive लांबलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे शेजारील राज्ये उदा. कर्नाटक, महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीपाल्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे बिन्स दोनशे रुपये किलो, तर टोमॅटो 45 ते 50 रुपये किलो दराने विकले जात आहेत.
स्थानिक घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक रोडावल्याने गोव्यातील व्यापाऱ्यांनाही वधारलेल्या भावानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. पुढील एक-दोन आठवडे जर पाऊस लांबला तर भाजीपाल्यांचे दर आणखी वाढण्याची भीती येथील विक्रेते व्यक्त करत आहेत.
पणजी महापालिका मार्केटमधील भाजीविक्रेते सादिक बेग म्हणाले, सध्या टोमॅटोची आवक कमी झाली आहे. घाऊक व्यापाऱ्यांकडून 22 किलोचे कॅरेट 900 रुपयांनी खरेदी करावे लागते. सध्या बाजारात बटाटा व कांदा सोडला तर सर्व पालेभाजी व फळभाज्यांचे दर वाढले आहेत.
बाजारात सध्या इंदौर आणि आग्र्याहून बटाटा येत आहे. कोथिंबीर, मेथी आणि शेपूची जुडी 20 रुपये दराने विकली जात आहे. पालक मात्र स्वस्त, 10 रुपयांना एक जुडी मिळत आहे.
पणजी मार्केटमधील दर (प्रतिकिलो)
कांदा : ३० रुपये
बटाटा : २५ ते ३० रुपये
टोमॅटो : ४५ ते ५० रुपये
कारली : ८० रुपये
भेंडी : ६० रुपये
बिन्स : २०० रुपये
कोबी : ४० रुपये
फ्लॉवर : ४० रुपये
पालेभाजी (प्रतिजुडी)
मेथी : २० रुपये
लाल भाजी : २० रुपये
कांदा पात : २० रुपये
पालक : १० रुपये
शेपू : २० रुपये
कोथिंबीर : २० ते ३० रुपये
पुदिना : १० रुपये
लिंबू : ५ रुपये (प्रतिनग)
अर्धा कच्चा टोमॅटो बाजारात
मॉन्सून अजूनही सक्रिय झालेला नाही. त्यामुळे कर्नाटकात धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला उत्पादनावरही परिणाम होत आहे. टोमॅटो अर्धाकच्चा बाजारात आणला जात असल्याचे व्यापारी भगत यांनी सांगितले.
त्यांच्या मते, तो टोमॅटो गोव्यात विक्रेत्यांकडे जाईपर्यंत एक दिवस निघून जातो. त्या कालावधीत त्या टोमॅटोचा रंगही बदलतो आणि विक्रीसाठी तो तयार होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.