खरी कुजबूज Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबूज: बोरकर 'त्या' व्हिडिओवर गप्प का?

Khari Kujbuj Political Satire: रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचा (आरजीपी) ‘फुटबॉल’ आता आमदार वीरेश बोरकर यांच्या पायात असल्याचे त्यांनीच जाहीर केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

बोरकर ‘त्या’ व्हिडिओवर गप्प का?

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचा (आरजीपी) ‘फुटबॉल’ आता आमदार वीरेश बोरकर यांच्या पायात असल्याचे त्यांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षावर आता त्यांचीच हुकूमत चालणार, हे स्पष्ट झाले आहे. टीसीपी कायद्याविरोधातील आंदोलनातून बोरकर यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. मात्र, सांत आंद्रे मतदारसंघातील ज्या गावात ते राहतात, तेथील डोंगरकापणीच्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत, असा सवाल समाजमाध्यमांतून उपस्थित केला जात आहे. त्यांच्या गावातील काही नेटकरी रिल्स तयार करून हेच प्रश्न विचारत आहेत. आता आमदार बोरकर यांच्याविरोधात ही मोहीम नेमकी कोणी सुरू केली, हे कदाचित त्यांना माहीत असेल किंवा नसेलही. मात्र, पक्षात सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत कोणीतरी त्यांच्याविरोधात समाजमाध्यमांतून नियोजनबद्ध मोहीम उघडली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विश्वनाथ दळवींचे ‘शक्तिप्रदर्शन’?

फोंड्याचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांचा २९ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने फोंडा शहरासह खांडेपार पंचायतीच्या परिसरात झळकलेले त्यांचे मोठमोठे बॅनर्स आणि कटआउट्स सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. दळवी हे भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून शक्तिप्रदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. निवडणुकीपूर्वीचा हा त्यांचा शेवटचा वाढदिवस असल्याने ‘नाऊ ऑर नेव्हर’च्या धर्तीवर त्यांनी हे शक्तिप्रदर्शन करण्याचा चंग बांधल्याचे बोलले जात आहे. आता या शक्तिप्रदर्शनाचा त्यांना राजकीयदृष्ट्या किती फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नाही का?

मनोजच्याही ‘चाली’!

स्वतःला रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करीत आमदार वीरेश बोरकर यांनी याआधी पक्षाच्या सर्व समित्या बरखास्त करून निलंबित केलेल्या सदस्यांना पुन्हा पक्षात घेतले. त्यानंतर आता पक्षाच्या पाटो–पणजी येथील कार्यालयातील कागदपत्रांची गोपनीयता राखण्यासाठी स्वतःच्या लेखी परवानगीशिवाय इतरांना कार्यालयात जाण्यासही निर्बंध घातले. दोन दिवसांत घडलेल्या या घडामोडींमुळे आरजीपीतील अंतर्गत वाद पुन्हा चिघळला. अजय खोलकर गटही बोरकरांविरोधात उभा ठाकला आहे. रविवारी सायंकाळी खोलकर गटाने पक्ष कार्यालयासमोर जाऊन बोरकरांच्या कृतीचा निषेध नोंदवला आणि मनोज परब आम्हाला पुन्हा हवेत, अशी मागणीही लावून धरली. एकूणच प्रकरणात आमदार बोरकर यांनी खेळी सुरू केल्यानंतर परब यांनीही खोलकरांना पुढे करीत ‘राजकीय चाल’ सुरू केल्याचे आणि पक्ष पुन्हा स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे.

बाबू कवळेकर पुन्हा विधानसभेत पोहोचणार?

या समाजात उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची रीत आहे. मावळत्या सूर्याला लोक नमस्कार करीत नाहीत; तर सूर्य मावळताना आनंदाने टाळ्या ठोकतात. राजकारणातही असेच असते. जो राजकारणात विजयी ठरतो, त्यालाच समाज आठवण ठेवतो. पराभूतांचा हिशोब कोणी ठेवत नाही. सुमारे वीस वर्षे केपे मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व असलेले बाबू कवळेकर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करू शकणार का? बाबू कवळेकर यांना केपेची जनता पुन्हा स्वीकारणार का? गेली पाच वर्षे आमदार नसताना व सत्तेत कोणतेही पद नसताना जनतेशी ‘कनेक्ट’ राहिलेल्या बाबू कवळेकर यांची जादू चालणार का? सध्या धनगर आंदोलनात ‘बिझी’ असलेल्या बाबूंसाठी आमदारकीची लढाई संघर्षपूर्ण राहणार, हे निश्चित.

मॅडम सरपंच अन्‌ डायव्हर्जन्सी प्रमाणपत्र!

लोकशाहीत मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करणे गरजेचे असते. अधिकार मिळाला म्हणून कोणत्याही व कसल्याही प्रमाणपत्रावर सही करायची नसते, हा सरळ-सोपा कायदा काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना समजत नाही. फातर्पा येथील एका देवस्थानाच्या जमिनीवर कुळ असलेल्या एका व्यक्तीने खोटी कागदपत्रे वापरून देवस्थानाच्या जमिनीवर आपला अधिकार प्रस्थापित केल्याची घटना उघडकीस आली. देवस्थानाचा सेवेकरी म्हणून असलेल्या या महाभागाने आपले नाव बदलून त्या देवस्थानातील महाजनांच्या कुळाचे नाव आपल्या नावापुढे जोडले. जन्मदाखला प्रमाणपत्रात असलेल्या मूळ नावाची व्यक्ती आणि त्या देवस्थानातील महाजनांच्या कुळाचे नाव जोडलेली व्यक्ती एकच असल्याचे प्रमाणपत्र फातर्पा पंचायतीच्या विद्यमान सरपंच मॅडमने त्या कुळाला बहाल केले. कोणताही आधार नसताना त्या कुळाचे नाव, जात आणि महाजनकीचा अधिकार बहाल करण्याचे कारस्थान करणारी ती बिचारी महिला सरपंच मात्र आता संकटात सापडली आहे.

आणि शिक्षक परीक्षेत नापास!

‘बरे जाल्यार व्हकल नवऱ्याचे आणि वायट जाल्यार रायबाऱ्याचे’ अशी कोकणीत म्हण आहे. परीक्षेचा निकाल बरा लागला तर क्रेडिट शिक्षकांना व कोचिंग क्लासवाल्यांना आणि निकाल वाईट लागल्यास त्याचे श्रेय विद्यार्थ्यांना. गेल्या आठवड्यात गोवा शालांत मंडळाने राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी (जीटीईटी) परीक्षा घेतली होती. सुमारे सहा हजार शिक्षक या परीक्षेला बसले होते. मात्र, या परीक्षेचा निकाल आश्चर्य वाटावा असाच लागला. माध्यमिक स्तरावर केवळ एकोणचाळीस टक्के निकाल लागला. म्हणजे माध्यमिक स्तरावरील एकसष्ट टक्के शिक्षक नापास झाले. याचा अर्थ पाचवी ते आठवीपर्यंत शिकविणारे ६१ टक्के शिक्षक अपात्र ठरले आहेत. प्राथमिक स्तरावर शिकविणाऱ्या शिक्षकांचा निकाल त्या मानाने थोडा चांगला म्हणजे साठ टक्के लागला आहे. प्राथमिक शाळेत शिकविणारे चाळीस टक्के शिक्षक नापास झाले. याचा अर्थ चाळीस टक्के प्राथमिक शिक्षक शिकविण्यासाठी अपात्र ठरले आहेत. शंभर टक्के साक्षरता आणि इंग्रजी भाषेचे गोडवे गाणाऱ्या गोव्यातील शिक्षक किती ‘स्मार्ट’ आहेत, याचा हा उत्तम पुरावा. जर गुरुच नापास व्हायला लागले तर शिष्यांकडून काय अपेक्षा?

गिरीशबाब कुठून लढणार?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार, असे सांगून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. काहींना तर मोठा धक्का बसलाय. गिरीश यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमधील काही नेतेही गोंधळलेले आहेत, म्हणे. गिरीशबाब कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, याबद्दलच्या तर्कवितर्कांना आता ऊत आला आहे. ज्या इच्छुकांनी तयारी केली, त्यांच्यासमोरही गिरीश यांनी मोठा प्रश्न निर्माण केला आहे. कारण, गिरीशबाब हे फातोर्डा, मडगाव, नावेली, दाबोळी, मुरगाव किंवा शिरोडा मतदारसंघातून लढतील, अशीही चर्चा रंगली आहे. शेवटी कोणता मतदारसंघ निवडायचा, हा निर्णय स्वतः गिरीशबाबच घेतील. दुसरीकडे, गिरीश यांच्या वाढदिवशी विजय सरदेसाई यांनी गिरीश यांना, ‘तुमचा मतदारसंघ लवकर निवडा,’ असा सल्ला दिला. म्हणजेच, विजय यांनाही गिरीश यांच्या मतदारसंघाबद्दल उत्सुकता आहेच.

वाहने उदंड, पार्किंगची बोंब

गोवा पोलिस रहदारी विभागाचे मनुष्यबळ राज्यातील वाहनांच्या तुलनेने बरेच कमी आहे. वाहनं वाढत आहेत; पण त्या मानाने पार्किंग व्यवस्थेचा विचार कुणीच करताना दिसत नाही. पार्किंग व्यवस्था अगोदरच जागेवर आणायला पाहिजे. नोंदणीकृत वाहनांची संख्या १४.६ लाख आहे. सध्या रहदारी पोलिस विभागात ७४४ कर्मचारी आहेत. त्यात आणखी सहाशेहून अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. रस्ता सुरक्षेसाठी वाढत्या वाहनांच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी प्राधान्यक्रमाने जागेवर आणण्याची नितांत गरज आहे. कारण शिस्त हलली की व्यवस्थाच ढेपाळायला लागते. ‘अंथरूण बघून पाय पसरावेत’ अशी म्हण आहे. लोकसंख्येइतकीच वाहनांची संख्या. म्हणजे, इथे मोठी पांघरूणरूपी व्यवस्था तात्काळ उभी करणे आवश्यक आहे. कारण पाय आकुंचित करणे शक्यच नाही.

राम मंदिर परिसराचे सुशोभीकरण कधी?

मडगाव येथील श्री राम मंदिराचे नूतनीकरण व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी फातोर्डाच्या आमदारांनी पुढाकार घेतला होता. जून महिन्यात या कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. हे काम चतुर्थीपूर्वी पूर्ण होईल, अशी ग्वाहीसुद्धा देण्यात आली. हे काम पर्यटन खात्याकडून त्यांना मंजूर झालेल्या निधीतून करण्यात येणार होते. मंडप, शौचालय, खोली बांधणे, तसेच मंदिरावरील छप्पर दुरुस्त करणे, अशी ही कामे होती. मात्र, जुलै महिना संपत आला आणि चतुर्थीला दीड महिना बाकी असतानाही अजून या कामास सुरुवात झाली नाही. केवळ नारळ फोडून आमदारांना काय साध्य करायचे होते, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. तसेच एखाद्या दुसऱ्या राजकारण्याने या कामात खो तर घातला नाही ना, अशी शंकाही उपस्थित होत आहे. शेवटी ‘मुँह में राम और बगल में छुरी’ असाच हा प्रकार दिसतोय.

वीरेश कावळा, मोर की घुबड?

२०२२ मधील विधानसभा निवडणुकीत आमदार वीरेश बोरकर यांना सांतआंद्रेतून निवडून आणण्यासाठी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजीपी) सर्वच कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले होते. त्यांच्या या परिश्रमांचे फळ म्हणून वीरेश विधानसभा सभागृहापर्यंत पोहोचले. परंतु, गेल्या काही महिन्यांत आमदार बोरकर यांनी पक्ष स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी ज्या कुरघोड्या केल्या, त्यावर पक्षाचे बहुतांश कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातूनच अजय खोलकर यांनी बोरकर यांच्यावर, ‘कावळा असलेला वीरेश स्वतःला मोर म्हणवून घेत आहेत. परंतु, वीरेश घुबड आहे. कारण तो रात्रीच्या कुरापती करतो,’ अशी जहरी टीका केली. त्यामुळे आरजीपीचे कार्यकर्तेही आता वीरेशना नेमके काय म्हणावे, याचा विचार करीत आहेत.

अकलेचे तारे तोडले...

पत्रकार परिषदेत काही जण तोंडाला येईल ते बोलतात आणि स्वतःचेच हसे करून घेतात. असाच एक प्रकार शनिवारी ‘आम आदमी पक्षाच्या’ पत्रकार परिषदेत घडला. ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आतिशी आणि अमित पालेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपापले मुद्दे व्यवस्थितपणे मांडले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका युवा कार्यकर्त्याने थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘डॉ. सावंत यांनीही ‘नीट’ परीक्षा देऊनच डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. मग आज या पेपरफुटीप्रकरणी ते गप्प का?’ असा सवाल त्यांनी मोठ्या आवेशात केला. मात्र, बिचाऱ्याला कदाचित हे माहीतच नसावे की डॉ. प्रमोद सावंत यांनी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता आणि त्या काळात ‘नीट’ परीक्षेची पद्धत अस्तित्वातच नव्हती. पत्रकार परिषद संपल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी त्यांना ही वस्तुस्थिती समजावून सांगितली; मात्र तोपर्यंत त्यांच्या विधानाचे चांगलेच हसे झाले होते.

मुख्यमंत्र्यांची कन्या मैदानात!

देशविरोधी कारवाई केल्याच्या आरोपानंतर दिल्ली पोलिसांच्या कोठडीत असलेल्या उमर खालिद याला सोडावे, अशा आशयाचे फलक गोव्यातील युवकांच्या सभांमध्ये झळकले. दिल्लीतील कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनामुळे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे गोव्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यातही खालिदविषयी फलक झळकले. त्याचा निषेध करण्यासाठी ‘युथ फॉर भारत’ या संघटनेने रविवारी सायंकाळी आझाद मैदानात येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, रविवार असल्याने आणि हिंदुत्ववादी तसेच विद्यार्थी संघटनांच्या पाठबळावर मैदानात युवकांची मोठी गर्दी होईल, असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. मात्र, येथे लक्ष वेधले ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कन्या पार्थवीने. तिने यावेळी हजेरी लावली आणि बिनधास्तपणे कॅमेरासमोर आपले म्हणणेही मांडले. घरातच राजकारणी असल्याने बोलण्याचा निडरपणा आपोआप मुलांमध्ये येतो, हे यावेळी स्पष्ट झाले.

उल्हास तुयेकर पुन्हा नावेली सर करणार?

‘सदां सदां वडा पुनव आसना’ अशी कोकणीत म्हण आहे. याचा अर्थ प्रत्येक वेळी ‘तुक्का’ लागतोच असे नाही. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नावेली मतदारसंघात भाजपाचे उल्हास तुयेकर यांनी निवडणूक जिंकून इतिहास कायम केला होता. सासष्टीतील आठपैकी केवळ एकट्याच नावेली मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलले होते. नावेलीत भाजपाचा विजय हे एक मॅजिकच होते. आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उल्हास तुयेकर इतिहासाची पुनरावृत्ती करणार की नाही, हे भाजपाच्या हातात नसून विरोधकांच्या हातात आहे. दावा जरा विचित्र असला तरी त्यात तथ्य आहे. या मतदारसंघात उल्हास यांच्या विरोधात विरोधी गटातून वालांका आलेमाव, प्रतिमा कुतीन्हो, सिप्रु व आणखी चार इच्छुक पुढे आहेत. आता हे सगळे विरोधक निवडणुकीत उतरले, तर उल्हास निश्चित खुश होणार. उल्हास तुयेकर यांचा विजयरथ विरोधकांच्या गल्लीतून जाणार, हे निश्चित.

‘त्या’ सायबाची झाली फजिती...

मडगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिसाचा दरारा एवढा जबरदस्त आहे की, ठाण्यातील अन्य पोलिसही त्याला ‘सायबा’ म्हणूनच हाक मारतात. या सायबासोबत गेल्या आठवड्यात एक मजेशीर प्रसंग घडला. नावेली येथे काँग्रेसचे निदर्शन सुरू असताना त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात हे पोलिस महाशय मग्न होते. त्याच वेळी कोणीतरी त्यांच्या डोक्यावरील विग अलगद काढून घेतला. काही वेळ शोधाशोध आणि मिनतवाऱ्या केल्यानंतर विग परत मिळाला; मात्र तोपर्यंत या घटनेची बातमी वाऱ्यासारखी इतर पोलिसांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर ठाण्यात या किस्स्यावर चांगलीच खसखस पिकली. ‘बरं झालं, अद्दल घडली,’ अशा शब्दांत काही पोलिस एकमेकांशी या घटनेची चर्चा करत होते. सायबांचा हा ‘विगप्रसंग’ आता बरेच दिवस पोलिस वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार, हे मात्र नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शिवकृपेने खुलणार यशाचे दरवाजे! 'या' राशींसाठी सोमवार ठरणार अत्यंत शुभ; सुख, समृद्धी सह प्रत्येक कार्यात मिळणार यश

Goa Job Promise Robbery Case: 24 लाखांच्या दरोड्याचा आरोपी पुन्हा गजाआड! 18 वर्षांच्या तरुणाची फसवणूक; कोलवाळ पोलिसांकडून एकाला अटक

Goa ST Community Development Fund: एसटींच्या प्रश्नाला उत्तर द्या! 3200 कोटींचा निधी का पोहोचला नाही? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा भाजप सरकारला थेट सवाल

Houthi Rebels Attack Saudi Arabia: हौथी बंडखोरांचा सौदी अरेबियावर मोठा प्रतिहल्ला! 'अरामको'चे तेल प्रकल्प क्षेपणास्त्रे अन् ड्रोनने लक्ष्य

Narendra Modi Exam Reform Task Force: विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मोदी सरकारचे मोठे पाऊल; नंदन नीलेकणी यांच्याकडे 'टास्क फोर्स'ची धुरा

SCROLL FOR NEXT