गोवा: गोवा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 7 आणि 8 जुलै रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यात (South Goa) 1-2 ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची (>24 तासांत 20.4cm) शक्यता आहे. तसेच ही परिस्थिती पुढील पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मच्छिमारांना 5 दिवसांचा इशारा दिला असुन, गोव्यात उद्या हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. (IMD issues red alert in goa)
(Goa Monsoon Update)
राज्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. नव्याने बनवलेल्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या दरडीवरून माती रस्त्यावर येऊ लागली आहे. परिणामी राज्यातील सर्वच मार्गावरील वाहतूक कोलमडली असून वाहने कासवगतीने पुढे सरकत असल्याचे दिसत आहे.
कुशावती नदीला पूर
सक्रिय मॉन्सून आणि मध्यप्रदेश आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे तसेच पश्चिम किनारपट्टीवरील ‘ऑफशोर टर्फ’ अशा पावसासाठीच्या पुरक स्थितीमुळे राज्यात रविवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांत हंगामातील सर्वात जास्त 156.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा हा गेल्या पाच वर्षांतील विक्रम आहे. दक्षिण गोव्यातही जोरदार सरी कोसळत असून कुशावती नदीला पूर आला आहे. (South Goa Live Update)
पणजी ‘स्मार्ट सिटी’ दुर्गंधीच्या विळख्यात
पणजी(Panaji) शहराच्या कार्पोरेट कार्यालयाचा परिसर म्हणून ओळखला जाणारा पाटोचा अर्धा भाग सध्या पावसाच्या पाण्याखाली जात असल्याचे दिसते. त्यातच या परिसरातील सांडपाण्याचे चेंबर भरून वाहत असल्याने ते घाण पाणी पावसाच्या पाण्यात मिसळले आहे. गेल्या आठवडाभरापासून या परिसरातील चेंबरमधील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने परिसरातील कार्पोरेट कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना येता-जाता दुर्गंधी सहन करावी लागत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.