Goa G20 Meetings 2023: गोव्यासाठी एक अभिमानास्पद बाब नुकतीच समोर आली आहे. गेल्या काही काळामध्ये गोव्यात G20 संघटनेच्या विविध कार्यगटांच्या बैठका होत आहेत. एकूण आठ बैठकांचे नियोजन गोव्यात होते आणि त्यातील काही बैठका यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
दरम्यान, नुकतेच गोव्यात झालेल्या G20 कार्यगटाच्या एका बैठकीत अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व चक्क गोमंतकीय वंशाच्या महिलेने केल्याचे समोर आले आहे.
(Dr. Deepa Dhume Datta led US delegation in G20 Meeting 2023 in Goa)
इन्स्टाग्राम पोस्टमधून ही बाब समोर आली आहे. व्हिवा गोवा ऑनलाईन या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. केदार धुमे यांनी या पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
केदार धुमे यांनी लिहिले आहे की, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. माझी प्रिय चुलत बहिण डॉ. दीपा धुमे दत्ता यांनी गोव्यातील G20 शिखर परिषदेत अमेरिकन शिष्टमंडळाचे (U.S. Federal Reserve Board) नेतृत्व केले.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयातील त्यांच्या केबिनमध्ये दीपा धुमे दत्ता यांची भेट घेऊन सत्कार केला.
गोव्यात होत असलेल्या G20 कार्यगटाच्या बैठकीत गोमंतकीय वंशाचा एक प्रतिनिधी अमेरिकन सरकारचे प्रतिनिधित्व करत आहे, हा सर्व गोवावासीयांसाठी खरोखरच अभिमानाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
डॉ दीपा धुमे दत्ता या सध्या युएस फेडरल रिझर्व्हमध्ये अॅडव्हान्स फॉरेन इकॉनॉमिक्स विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्या कोकणी भाषिक आहेत. त्यांची आई प्रभा आणि वडील भोलानाथ धुमे हे मूळचे गोव्याचे आहेत.
दीपा धुमे दत्ता यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. पदवी मिळवली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.