Assembly Elections Dainik Gomantak
गोवा

Assembly Elections : प्रियोळमध्ये राजकीय बदलाचे वारे; चर्चांना ऊत

गोमन्तक डिजिटल टीम

Assembly Elections :

फोंडा, प्रियोळ मतदारसंघ हा जरी फोंडा तालुक्यात येत असला, तरी लोकसभा निवडणुकीकरता या मतदारसंघाचा समावेश उत्तर गोव्यात करण्यात आला आहे. २००९ साली याच मतदारसंघाने हरण्याच्या वाटेवर असलेल्या भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना हात दिला होता.

प्रियोळातील भरीव आघाडीमुळेच श्रीपाद भाऊ थोड्या मताने का होईना, पण त्यावेळी विजयी झाले होते. त्यामुळे यावेळीही भाजप नेत्यांचे या मतदारसंघावर लक्ष लागून राहिलेले आहे.

या मतदारसंघातून यावेळी श्रीपाद भाऊंना किती आघाडी मिळते यावर अनेक समीकरणे अवलंबून असणार आहेत, पण सध्या प्रियोळात विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. परवा प्रियोळ मतदारसंघातील श्रमधाम योजनेतील घराच्या भूमिपूजनावेळी स्थानिक आमदार तथा कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना डावलल्यामुळे सध्या तीव्र पडसाद उमटत आहेत.

विशेष म्हणजे यावेळी सभापती रमेश तवडकर यांच्यासमवेत प्रियोळ मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर हे दिसल्यामुळे या घटनेला विविध कंगोरे लावण्यात येत आहेत. याबाबतीत मंत्री गावडे यांनी मुख्यमंत्री तथा पक्षाला दोष दिल्यामुळे या चर्चेत अधिकच भर पडली आहे.

तवडकर - ढवळीकर यांची ही ‘युती’ आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आहे की यामागे अन्य कोणता दुसरा हेतू आहे यावरही चर्चा सुरू झाली आहे. या आगळ्यावेगळ्या समीकरणामुळे प्रियोळ मतदारसंघातील राजकारण रंगायला लागले आहे. याचा वेगवेगळा अन्वयार्थ लावला जात आहे.

सुनील भोमकर राजकीय पटलावर?

सध्या म. गो. पक्ष हा भाजप सरकारचा घटक असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ म. गो. ला देऊन मंत्री गावडेंचा पत्ता कट केला जाऊ शकतो असा होरा काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत, पण हा मतदारसंघ एसटीसाठी आरक्षित झाल्यास भोम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सुनील भोमकर यांचा मोहरा मुख्य राजकीय पटलावर आणला जाऊ शकतो असेही संकेत मिळू लागले आहेत.

भोमकर सध्या प्रियोळात राजकीयदृष्ट्या बरेच सक्रिय झाले असून ही त्यांची सक्रियता प्रियोळातील आगामी राजकारणाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.

लवकरच मोठ्या घडामोडी शक्य

एकंदरीत आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मंत्री गावडे यांना घेरण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले असून यामागे कोणती ‘शक्ती’ कार्यरत आहे यावरही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. एकंदरीत प्रियोळ मतदारसंघात होऊ शकणाऱ्या बदलाचे संकेत मिळायला लागले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या बदलाला गती प्राप्त होणार असल्याचे आत्तापासूनच प्रतीत व्हायला लागले आहे.

मंत्री गावडेंचे ‘हम किसीसे कम नहीं’

मंत्री गोविंद गावडे यांची खासियत म्हणजे त्यांचा आत्मविश्वास आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरच त्यांनी आत्तापर्यंत यशस्वी टक्कर दिली आहे. आपल्याविरुद्ध ‘षडयंत्र’ रचले जात आहे हे जाणून मंत्री गावडे यांनी सावधपणे पावले उचलायला सुरवात केली असून भविष्यात उद्‍भवू शकणाऱ्या विविध समीकरणांना तोंड देण्याकरता आपली ‘लॉबी’ वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे.

आता यात मंत्री गावडे किती यशस्वी होतात आणि भविष्यात विपरीत ठरू शकणारी परिस्थिती ते कशी काबूत आणतात याचीच चर्चा सध्या प्रियोळात सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT