

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित 'ऍशेस' मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात दुसऱ्याच दिवशी मैदानातील पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. ५ जानेवारी रोजी खेळाच्या तिसऱ्या सत्रात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली. या वादाचा परिणाम खेळावरही झाला आणि लाबुशेनला आपली विकेट गमवावी लागली. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
ही घटना तिसऱ्या सत्रात घडली जेव्हा एक ओव्हर संपल्यानंतर बेन स्टोक्स लाबुशेनच्या जवळून गेला आणि त्याने काहीतरी सुनावले. यावर लाबुशेननेही प्रत्युत्तर दिले. यानंतर स्टोक्सने लाबुशेनच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय आक्रमकपणे त्याच्याशी संवाद साधला.
दोघेही एकमेकांना भिडल्याचे पाहून अंपायरला तातडीने मध्यस्थी करावी लागली. स्टोक्सच्या या 'माइंडगेम'चा फटका लाबुशेनला बसला. वादाच्या काही वेळातच एका बेजबाबदार शॉटवर लाबुशेन ४८ धावांवर बाद झाला. जॅकब बेथलने त्याचा सोपा झेल घेतला.
तत्पूर्वी, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात जो रूटच्या दमदार शतकाच्या जोरावर ३८४ धावांचा विशाल धावसंख्या उभारली. जो रूटने २४२ चेंडूत १६० धावांची संयमी आणि आक्रमक खेळी केली. त्याला हॅरी ब्रूकने ९७ चेंडूत ८४ धावा करून मोलाची साथ दिली, तर जेमी स्मिथने ४६ धावांचे योगदान दिले. इंग्लंडच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने २ बाद १६६ धावा केल्या आहेत. ट्रेविस हेडने धडाकेबाज फलंदाजी करत ८७ चेंडूत नाबाद ९१ धावा ठोकल्या आहेत. तो सध्या शतकाच्या उंबरठ्यावर असून तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन डावाची मदार त्याच्यावर असेल.
लाबुशेन बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा वेग मंदावला असला तरी हेडने एक बाजू लावून धरली आहे. सध्या ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या धावसंख्येपेक्षा २१८ धावांनी पिछाडीवर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.