

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी दर्शवणारा आम आदमी पक्ष पूर्व परीक्षा समजल्या जाणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत अक्षरश: तोंडावर पडला. झेडपीत लाजीरवाण्या कामगिरीनंतर पक्षाने राज्य संयोजक अमित पालेकर यांची उचलबांगडी केली.
पक्षाच्या कारवाईमुळे उद्वीग्न झालेल्या पालेकरांनी तसेच श्रीकृष्ण परब यांनी राजीनामा दिला आहे. पालेकर आणि परब यांच्या पाठोपाठ आता युवा आघाडीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी देखील राजीनामा दिलाय.
“पक्षासाठी सर्व वेळ दिला, व्यवसाय सोडला एवढेच नव्हे तर कुटुंबीयांकडेही दुर्लेक्ष केले”, अशी भावनिक प्रतिक्रिया पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नेते अमित पालेकरांनी दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आपला केवळ एकाच जागेवर यश मिळवता आले.
यानंतर पक्षाने अमित पालेकरांना पदमुक्त केले. यानंतर संयोजक पदाची अतिरिक्त जबाबदारी श्रीकृष्ण परब यांच्याकडे सोपविण्यात आली. विशेष म्हणजे पालेकर यांच्यासोबत परब यांनीही पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अमित पालेकर आणि श्रीकृष्ण परब यांनी राजीनाम्याची घोषणा करताच युवा आघाडीतून देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी पायउतार होऊन पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं. आप युवा आघाडीचे अध्यक्ष रोहन नाईक आणि उपाध्यक्ष चेतन कामत यांनीही आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी असताना अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. झेडपीसाठी काँग्रेससोबत युतीसाठी स्थानिक नेतृत्व सकारात्मक असताना अरविंद केजरीवाल यासाठी असहमती दर्शवली होती. यानंतर पक्षात बंडाळी सुरु झाल्याचे दिसून आले होते.
झेडपी निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौऱ्यावर असताना काँग्रेसवर सडकून टीका केली होती. शिवाय युती न करता स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते. यामुळे नाराज झालेल्या स्थानिक नेत्यांनी केजरीवाल गोव्यात असतानाच पक्षातून बाहेर पडण्यास सुरुवात केली होती. आता झेडपीच्या निकालानंतर पक्षाला केजरीवाल, परब यांच्या रुपाने मोठा झटक बसला आहे. यानंतर काँग्रेसने केजरीवाल यांनी चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.
काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकरांनी अरविंद केजरीवाल यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. “एकापाठोपाठ एक अशा चार अध्यक्षांनी राजीनामे दिल्यानंतर आपचा विश्व रेकॉर्ड. राहुल म्हांब्रे, एल्विस गोम्स, अमित पालेकर आणि श्रीकृष्ण परब. गोव्यातील आप आता अध्यक्ष विरहीत, दिशाहीन आणि दृष्टीकोन विरहीत झाली आहे. गोव्याने रिमोट कंट्रोल पॉलिटिक्सला नाकारले आहे”, असे ट्विट काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी केले आहे.
अमित पालेकर काँग्रेसच्या वाटेवर
अमित पालेकरांनी आपचा राजीनामा दिल्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या पालेकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेसची निश्चितच शक्ती वाढणार आहे. शिवाय आपसाठी हा मोठा धक्का असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.