

JD Vance Residence Attack: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडालेली असतानाच याचे हिंसक पडसाद आता अमेरिकेत पाहायला मिळत आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्या वॉशिंग्टन येथील निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामुळे अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले असून सीक्रेट सर्व्हिसेसने एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वॉशिंग्टन डीसीच्या बाहेरील भागात असलेल्या उपराष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानावर घडली. 'फॉक्स 19' ला मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री 12:15 च्या सुमारास सीक्रेट सर्विसच्या एजंटांनी एका अज्ञात व्यक्तीला वेंस यांच्या घराच्या आवारातून पळून जाताना पाहिले. त्या व्यक्तीने घराच्या दिशेने दगड भिरकावले होते, ज्यामध्ये घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचे प्राथमिक फुटेजमध्ये दिसत आहे. सुदैवाने, ज्या वेळी हा हल्ला झाला, त्यावेळी उपराष्ट्राध्यक्ष जेडी हे आपल्या निवासस्थानी उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणताही मोठा अनर्थ टळला. मात्र, उपराष्ट्राध्यक्षांसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीच्या घरावर अशा प्रकारे हल्ला होणे, ही अमेरिकन सुरक्षेतील मोठी त्रुटी मानली जात आहे.
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना नुकतीच एका नाट्यमय घडामोडीत अटक करण्यात आली. अमेरिकेने व्हेनेझुएला लष्करी कारवाई करुन मादुरो यांच्या मुसक्या आवळल्या. अमेरिकच्या या कारवाईमुळेच मादुरो यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळेच जेडी वेंस यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आला. सीक्रेट सर्व्हिसेच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले की, "आम्ही या घटनेची सर्व बाजूंनी माहिती गोळा करत आहोत. हा केवळ एक गुन्हेगारी स्वरुपाचा हल्ला आहे की याचा संबंध व्हेनेझुएलातील घडामोडींशी आहे, याचा तपास सध्या सुरु आहे. तूर्तास एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे."
या घटनेनंतर वॉशिंग्टन डीसीमधील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VIP) निवासस्थानांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. व्हाईट हाऊस आणि कॅपिटल हिल परिसरातील गस्त वाढवण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये घराचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत असून सीक्रेट सर्व्हिस आणि एफबीआय (FBI) या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत. अमेरिकन सरकार सध्या निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर लॅटिन अमेरिकेत निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र, आता अमेरिकेच्याच भूमीवर उपराष्ट्राध्यक्षांच्या घराला लक्ष्य केल्यामुळे ट्रम्प-वेंस प्रशासन अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.