पेडणे: तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हंगाम वगळता तब्बल आठ महिने या तालुक्यातील काही भागात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पाणी टंचाईवर मात करायची असेल तर प्रत्येक घराने व सरकारी बिगर सरकारी आस्थापनांनी केंद्र सरकारच्या ‘जल शक्ती अभियान’ अंतर्गत ‘भूजल संवर्धन प्रकल्प’ साकारावा, असे आवाहन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.
जागतिक वसुंधरादिनाचे औचित्य साधून तोरसे सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना तुकडीने (1 गोवा बटालीयन एनसीसी पणजी) व धवरुख संस्थेच्या मदतीने शाळेच्या आवारात भूजल संवर्धन प्रकल्प साकारला. प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार आर्लेकर बोलत होते.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सीमा खडपे, तोर्से सरपंच उत्तम वीर, उगवेचे सरपंच श्रीमती सरस्वती नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, प्रार्थना मोटे, पंच सदस्य सूर्यकांत तोरस्कर, मनोहर नाईक, जॉन ब्रीट डिसोझा, अशोक सावळ, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय महाले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जया सावळ, निता तोरसकर, नवचेतना संस्थेचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, निसर्गप्रेमी विक्रमादित्य पणशीकर, मुख्याध्यापिका राजेश्री रेडकर उपस्थित होते.
सरकारी माध्यमिक विद्यालय तोरसे येथे राष्ट्रीय छात्र सेना तुकडीने मांद्रे येथील ‘धवरुख’ संस्थेच्या मदतीने साकारलेल्या भूजल संवर्धन प्रकल्पाद्वारे 50 हजार लिटर पेक्षा जास्त पाणी जमिनींमध्ये जिरवले जाईल. जेणेकरून आजूबाजूंच्या विहिरीतील पाण्याचा स्तर उंचवण्यात नक्कीच मदत होऊन भूजल पातळीत वाढ होईल.
एनसीसी अधिकारी साहिल कळंगुटकर यांनी आपल्या आवाहनात ‘हर घर भूजल’ प्रकल्प प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर राबवावा व त्यासाठी लागणारे सहकार्य देण्याची जी ग्वाही दिली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. भविष्यातील जल संकटावर मात करायची असल्यास हा प्रकल्प राबविल्याशिवाय पर्याय नाही, असे मुख्याध्यापिका रेडकर यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी अधिकारी साहिल कळंगुटकर, शिक्षक समीर शेट मांद्रेकर, गौरव नाईक, साईश आरोलकर, छात्रसैनिक चारुदत्त म्हामल, मनोहर महाले, वासू नाईक, स्वरूप झांट्ये, कृष्णा काटकर, पार्थ सावंत यांनी साकारला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.