Pooja Naik  Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: 'ढवळीकरांच्या सांगण्यावरून देसाई, पार्सेकरांना पैसे दिले'! पूजा नाईकचा गौप्यस्फोट, पालेकरांनी केली निलंबनाची मागणी

Sudin Dhavalikar Cash For Job: ‘आप’चे गोवा निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांनी आज या प्रकरणात सक्रिय सहभाग दर्शविला. तेच पूजा हिला माध्यमांसमोर घेऊन आले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने , शुक्रवारी वर्षभरानंतर प्रथमच सर्व प्रसारमाध्यमांसमोर तोंड उघडले. या प्रकरणात झालेला आर्थिक व्यवहार हा मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आला. त्यांनी सांगितल्यानुसार मी निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर यांना १७ कोटी रुपये दिले, असा गौप्यस्फोट तिने केला.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांनी या प्रकरणातील तिन्ही संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांना निलंबित करा, अशी जोरदार मागणी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी (गुरुवारी) ‘कॅश फॉर जॉब'' प्रकरणात मंत्री सुदिन ढवळीकर, आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्या नावांची चर्चा असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर ‘आप’चे गोवा निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांनी या प्रकरणात सक्रिय सहभाग दर्शविला. तेच पूजा हिला माध्यमांसमोर घेऊन आले. ते म्हणाले, की ‘‘सकाळी एका अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला, बोलणाऱ्याने पूजा बोलण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.

तिच्याशी बोलल्यानंतर, तिच्यासमोर जीव देणे किंवा सत्य कथन करणे, असे दोन पर्याय दिसले. म्हणून तिला माध्यमांसमोर सत्य कथन कर, असे सांगून आता ती सर्वांसमोर आली आहे.’’ यावेळी पूजा नाईक म्हणाली, की मी मगोपच्या कार्यालयात कामाला होते आणि तेथे ढवळीकरांच्या सांगण्यावरूनच नोकरीसाठी पैसे घेत होते.

अनेकांना पैशांच्या बदल्यात नोकरीही मिळवून दिली आहे. मंत्री ढवळीकर यांच्या सांगण्यावरूनच निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर यांना पैसे दिल्याची माहिती तिने प्रसिद्धी माध्यमांना दिली.

पूजा नाईकने सांगितले, की मी मगोपच्या कार्यालयात काम करत होते आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार हाताळत होते. २०१९ साली मेगा नोकर भरती आली होती, तेव्हा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मला आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि ‘साबांखा’चे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्याशी समन्वय साधण्यास सूचित केले होते. त्यावेळी ६१३ अर्ज आले होते आणि १७ कोटी रुपये मी देसाई आणि पार्सेकर यांना दिले. ‘कॅश फॉर जॉब'' प्रकरणातील शेवटचा व्यवहार २०२२ मध्ये झाल्याचे तिने स्पष्ट केले.

हळर्णकरांनी केला जबाबात फेरफार

पूजाच्या म्हणण्यानुसार, तिने भरती प्रक्रियेसंदर्भात देसाई-पार्सेकरांना सुमारे १७ कोटी रुपये दिले. या प्रकरणात नऊजणांचा समावेश होता. त्यातील काहींना आधीच अटक केली होती. मी इतरांना या प्रकरणाबद्दल पुढे येऊन बोलण्यास सांगितले; परंतु त्यांनी नकार दिल्याचे पूजा म्हणाली. मी म्हापशात जी माहिती चॅनलवाल्यांना दिली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याप्रकरणी पोलिसांना तपास करण्यास सांगितले. परंतु गुन्हे शाखेत मला जबाबासाठी नेले. तेथे उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांनी चौकशीदरम्यान माझ्या जबाबात फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला.

जनतेच्या भावनांशी खेळ; पालेकर

पालेकर यांनी भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीका केली. ते म्हणाले की, लोकांनी सरकारी नोकरीसाठी पैसे दिले; कारण त्यांना कळून चुकले होते, की गुणवारीनुसार सरकार नोकरी देणार नाही. काहींनी जमिनी विकल्या असतील, दागिने गहाण ठेवले असतील किंवा कर्ज घेऊन नोकरीसाठी पैसे द्यावे लागले असतील. कारण त्यांना कळाले असेल, की आता सरकारी नोकरी मिळवण्याचा हाच शेवटचा मार्ग असावा. भाजप सरकारने राज्यातील तरुणांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांशी खेळ केला आहे आणि जनतेने कष्टाने कमावलेले पैसे लुटले गेले आहेत.

पूजा ‘मगोप’ कार्यालयात कामाला नव्हती

१. मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले, की पूजा मगोपच्या कार्यालयात कधीच कामाला नव्हती. तिला कोणीतरी शिकवत आहे आणि ती गोंधळली आहे. पूजाने उल्लेख केलेल्या गोष्टी अन्य कुठे तरी घडल्या असू शकतात. आमच्या पक्षाला आणि नेत्याला कोणी लक्ष्य करायला लावले की काय, हे सत्य तपासाअंती बाहेर येईल. कार्यालयात मजूर आयोगाचे माजी कमिशनर कामाला आहेत आणि ते म्हार्दोळचे आहेत.

२. २००९ पासून आतापर्यंत त्या नावाची व्यक्ती कामालाच नाही. २०१९ ते २०२२ पर्यंत आम्ही सरकारमध्ये नव्हतो. कार्यालयात कसल्याच प्रकारचे व्यवहार होत नाहीत, केवळ बैठकींसाठी ते वापरले जाते.

तपास होऊ द्या, मग बोलेन; सुदिन

या विषयावर मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, की पोलिसांचा १४ दिवसांचा तपास होऊ द्या, त्यातून सत्य बाहेर आल्यानंतर मी बोलेन. माझ्यावर आतापर्यंत कोणीही आरोप केलेले नाहीत. माझ्या वडिलांना आणि मला गोव्यातील जनता ओळखते. माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत. आमच्या कार्यालयात जे काम करतात, त्यांना अर्थ खात्यातून त्यांच्या अकाऊंटवर पैसे जातात, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Partgali Math Goa: PM मोदींच्या आगमनाची तयारी! पर्तगाळी मठाचा 550 वा वर्धापनदिन, CM सावंतांनी घेतला तयारीचा आढावा

Srinagar Blast: श्रीनगरमध्ये स्फोटाबाबत मोठा खुलासा! 9 ठार, 32 हून अधिक जखमी; दहशतवाद्यांच्या मॉड्यूलशी थेट संबंध

Goa ZP Election: ‘मये’त जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे जोरात! फॉरवर्ड, काँग्रेसचे उमेदवार निश्चित; दक्षिण गोव्यात भाजपची चाचपणी

Goa Live News: भीषण अपघात! काणकोण येथे दुचाकीस्वाराला धडक

Sunil Gudlar Case: सुनील गुडलरला कोर्टाचा दणका! CCTV फुटेज देण्याची मागणी फेटाळली; आरोपपत्र दाखल होईपर्यंत वाट पहावी लागणार

SCROLL FOR NEXT