Khari Kujbuj Political Satire  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; दिवसभर गायब; पहाटे रेतीचे ढीग!

Khari Kujbuj Political Satire: अलिकडे कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे वा चाव्यामुळे त्रस्त झालेल्यांच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. पणजी-ताळगाव रस्त्यावरील तांबडी माती, मधुबन सर्कल परिसरात कुत्र्यांचे कळप बसलेले असतात.

Sameer Panditrao

दिवसभर गायब; पहाटे रेतीचे ढीग!

फोंडा तसेच इतर लगतच्या भागात रेती, चिरे विकणाऱ्या आस्थापनात पहाटे रेती आणि चिऱ्यांचे ढीग तयार झालेले दिसतात. दिवसभर विशेषतः रेतीचा मागमूस नसतो. असलेली रेती अशा आस्थापनांकडून विकली जाते, आणि मग पुन्हा पहाटे रेतीचे ढिगारे तयार झालेले दिसतात. रात्रीच्या वेळेला रेती आणि चिऱ्यांची बिनधास्त वाहतूक सुरू असते, भर पावसातही रेतीचे उत्खनन केले जात असून अव्वाच्या सव्वा दराला रेती विकली जाते. सरकार मात्र रेती उत्खनन कायदेशीर करण्याच्या बाता करते, पण सध्या रेती आणि चिरे माफिया मात्र बक्कळ कमाई करीत आहेत, आणि गरीब बिचारा गरजवंत मिळेल त्या दामाला रेती आणि चिरे विकत घेतो. ∙∙∙

कुत्र्यांची दहशत

अलिकडे कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे वा चाव्यामुळे त्रस्त झालेल्यांच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. पणजी-ताळगाव रस्त्यावरील तांबडी माती, मधुबन सर्कल परिसरात कुत्र्यांचे कळप बसलेले असतात. तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिवसा सहसा त्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव जाणवत नाही, मात्र रात्र होते, तशी कुत्र्यांचे कळप जमू लागतात. तिथे कुत्र्यांनी कुणाचा चावा घेतल्याची घटना जरी घडली नसली तरी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे वा वाहनांच्या मागे लागल्यामुळे अनेकांना दवाखान्याचे तोंड बघावे लागले आहे. ही दहशत इतकी वाढलीय की काहीजणांनी आपला रस्ताच बदलला आहे. इतकेच काय त्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पंचायतीकडे किंवा मनपाकडेही साकडे घातलेय, पण त्यांनीही या कुत्र्यांच्या दहशतीमुळे तिकडे फिरकणे बंद केलेय की काय, अशी विचारणा होतेय! ∙∙∙

भाई कुठे आहेत ‘त्या’ नोकऱ्या?

‘तेल ही गेले तूप ही गेले हाती राहिले धुपाटणे’ असे म्हणण्याची पाळी आता कुंकळ्ळीकरांवर आली आहे. भाजपाचे सरकार व भाजपचे आमदार राजन नाईक असताना लोकविरोध न जुमानता कुंकळ्ळीत सुमार साडेचार लाख. चौ.मी.जागेवर ‘एनआयटी’ उभी राहिली. ‘एनआयटी’ आल्यास कुंकळ्ळीचे नाव जागतिक नकाशावर येणार. कुंकळ्ळीकराना नोकऱ्या मिळणार. स्थानिक विद्यार्थ्यांना ‘एनआयटी’ त जागा उपलब्ध होणार. स्थानिक शिक्षण संस्थांना मार्गदर्शन लाभणार, अशी शंभर आश्वासने भाजप सरकार व भाजप कार्यकर्ते देत होते.आता ‘एनआयटी’ उभी राहिली, स्थानिकांना मोठ्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडा, झाडू मारण्याचीही नोकरी मिळत नाही. जे भाजप कार्यकर्ते ‘एनआयटी’ झालीच पाहिजे म्हणत होते. तेच आता डोक्यावर हात मारून घेत आहेत. ‘एनआयटी’त नोकरी मिळण्यासाठी मलिदा चारावा लागतो, असा गंभीर आरोप आता केला जात आहे. पण उत्तर कुणीच द्यायला तयार नाही, यालाच म्हणतात ‘काम सरो आणि वैद्य मरो’. नाही का? ∙∙∙

दिगंबर यांना ध्वजवंदनाचा मान

स्वातंत्र्यदिनी जिल्हास्तरीय ध्वजवंदन करण्याचा मान एखाद्या मंत्र्याचा असतो. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलातही मंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जात असे. सासष्टीतील एकमेव मंत्री आलेक्स सिक्वेरा हे आजारी असल्याने यंदा या प्रथेला फाटा देण्यात आला असून सरकारने सासष्टीतील ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांना ध्वजवंदनाचा मान दिला आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यादिवशी सरकारच्या योजनांची, उपक्रमांची माहिती दिली जाते. पण काही मंत्री आपल्याच खात्याची माहिती देतात. यंदा दिगंबरबाब सरकारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांना सरकारच्या पूर्ण योजना व उपक्रमांची माहिती द्यावी लागेल. दिगंबरबाब दरवर्षी झेंडावंदन आपल्या घरी सुद्धा करतात. यंदा त्यांनी कार्यकर्त्यांना घरी व नंतर जिल्हाधिकारी संकुलातील सरकारी झेंडावंदनाला आमंत्रण दिले आहे. ∙∙∙

‘प्लॅनेट मराठी’ गेले कुठे?

राजधानी पणजीत सध्या आयनॉक्स परिसरात खासगी सहभाग आणि सरकारच्या साह्याने चौदावा गोवा मराठी चित्रपट महोत्सव सुरू झालेला आहे. मराठी चित्रपट किंवा नाटकाशी संबंधित कलाकार या महोत्सवाला आवर्जुन उपस्थित राहतात. परंतु मागील गोवा मराठी चित्रपट महोत्सवात यांनी मराठी कलाकारांसाठी अक्षय बदरापूरकर याने निर्माण केलेल्या ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटीच्या माध्यमातून गोव्यातील कलाकारांना संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर एखादा-दुसरा कार्यक्रम या प्लॅटफॉर्मने गोव्यात केला. त्यानंतर या प्लॅटफॉर्मचे कार्यक्रम गोव्यात होणे बंद का झाले, हे संबंधितांना आणि येथील आयोजकांनाच माहीत. परंतु या प्लॅनेट मराठीच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर धक्कादायक माहिती दिसून आली. ओटीटी विषयी माहिती जाणून घेतल्यानंतर संकेतस्थळावर ‘We’re Coming Back On 20th April, 2025!‘ एवढे दिसून येते, यातूनच सर्व काही स्पष्ट होते. ∙∙∙

दामू हॅप्पी...

शनिवारी मडगाव पालिकेत सत्यनारायण महापूजा झाली. यजमानपद अर्थातच नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांनी भूषविले. या पूजेला ‘पोलिटीकल ग्लॅमर’ लाभले. सभापती रमेश तवडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार दिगंबर कामत विजय सरदेसाई, उल्हास तुयेकर या दिग्गज राजकारण्यांसह अन्य काहीजणांनी पूजेला उपस्थिती लावली. पूजा आयोजित करण्यापूर्वी दामूने जांबावली येथे जाऊन मडगावकारांचे आराध्य दैवत श्री दामोदर देवस्थानात जाऊन प्रसाद घेतला होता. या पूजेचे निमंत्रण दामूने आपल्या प्रभागातील सर्व मतदारांनाही अगत्याने दिले होते. पूजेला झालेली गर्दी बघून ते ‘हॅप्पी’ झाले. पुढील वर्षी पालिका निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत नगराध्यक्ष पदाच्या आपल्या खुर्चीला धोका नाही, असा त्यांना ठाम विश्वास वाटू लागला आहे. ∙∙∙

‘झेडपी’ निवडणुकीचा धमाका?

डिसेंबरमध्ये ‘झेडपी’ निवडणूक होणार असल्यामुळे चतुर्थीनंतर या निवडणुकीचा धमाका सुरू होणार हे निश्चित आहे. पण काही इच्छुकांनी चतुर्थीलाच प्रचाराचा नारळ फोडण्याची तयारी सुरू केली आहे. गणपती हा भक्तांच्या हाकेला धावणारा देव म्हणून ओळखला जात असल्यामुळे तो आपल्याला नक्कीच पावेल, असे या इच्छुकांना वाटते. पण गणपती बाप्पा तरी किती जणांना पावणार हो? पण प्रत्येकाला आपण गणपतीचा परमभक्त असल्यामुळे बाप्पा आपल्यालाच पावेल, असे वाटते आहे. आता बाप्पा कोणाला पावला हे कळायला डिसेंबरची वाट पाहावी लागेल. पण सध्या या इच्छुकांनी गणपती बाप्पाची आरती म्हणताना हे प्रख्यात गाणे म्हणण्याची तयारी सुरू केलीय म्हणे... ‘देवा हो देवा गणपती देवा, तुमसे बढकर कौन; और तुम्हारे भक्तगणोमे हमसे बढकर कौन.. याचा अर्थ यंदाच्या चतुर्थीला ‘झेडपी’ मतदार संघात धमाल उडणार असे दिसू लागलेय. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'आनंदाचा क्षण दुःखात बदलला'! विराट कोहलीची X पोस्ट; दुर्दैवी घटनेबद्दल केला शोक व्यक्त

Panaji: चारवेळा ओके म्हणाला, पाचव्यांदा नाही मिळाला रिस्पॉन्स; कॅसिनो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या डायव्हरचा मृत्यू

Vasco: रस्त्यांवर जुनी वाहने, विक्रेते; 'वास्को'तील अतिक्रमणे हटणार कधी? नागरिकांचा संतप्त सवाल

Rivona: 2 भावांचा दुर्दैवी मृत्यू! 'ते' कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडू नये याची काळजी घ्या; आमदार सिल्वांची मागणी

Goa Live Updates: दुहेरी ट्रॅकिंगच्या मुद्द्यावर ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला काँग्रेसचा निषेध

SCROLL FOR NEXT