Goa Politics: खरी कुजबुज; नेमके चाललेय तरी काय?

Khari Kujbuj Political Satire: भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले बाबू आजगावकर यांचा आंदोलकांना पाठिंबा होता. त्याला आता २० वर्षे होऊन गेली तरी दामू तो प्रसंग अद्याप विसरलेले नाहीत.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

नेमके चाललेय तरी काय?

गोव्यात बेरोजगारीची समस्या गंभीर बनत चालली आहे, दुसरीकडे राजकीय नेते स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून आग्रह धरताना दिसतात, तर तिसरीकडे काही उद्योग नेमके स्थानिकांना वगळून परप्रांतीयांची भरती करत असल्याचे आरोप करून नोकरीवरून कमी केलेले कर्मचारी आंदोलन करू लागले आहेत. त्यामुळे स्थानिकांचा कोणीच वाली नाही का? अशी विचारणा होऊ लागली आहे. मागे काही फार्मा कंपन्यांनी गोव्यातील नोकरभरतीसाठी राष्ट्रीय वृत्तपत्रांत जाहिरात देऊन परराज्यांत मुलाखतीसाठी बोलावल्याचा प्रकार उघड झाल्यावर सरकारला त्यात हस्तक्षेप करणे भाग पडले होते. त्यानंतर विधानसभेत एनआयटीमध्ये चतुर्थश्रेणी पदांसाठीही स्थानिकांना डावलून परप्रांतीयांचा भरणा होत असल्याचा आरोप झाला, तर भुईपालमधील एका कंपनीत असेच घडले आहे. हे सगळे पाहिले, तर गोव्यात हे नेमके काय चाललेय अशी विचारणा केवळ स्थानिकच नव्हे, तर आजवर सरकारची बाजू घेणारेही करू लागले आहेत. ∙∙∙

बाबू यांना ठरणार अडचणीचे

आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पूर्वी मडगावच्या गृहनिर्माण मंडळ वसाहतीतील बेकायदा बांधकामे मोडायला लावली होती. त्यावेळी दामू यांच्या घरावर, कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती. नंतर भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले बाबू आजगावकर यांचा आंदोलकांना पाठिंबा होता. त्याला आता २० वर्षे होऊन गेली तरी दामू तो प्रसंग अद्याप विसरलेले नाहीत. बाबू यांच्या त्या भूमिकेची सल त्यांना आजही वाटत आहे. त्यामुळे बाबू हे आज भाजपमध्ये असले तरी त्यांच्या त्या कृत्याची प्रदेशाध्यक्षांना आठवण असणे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अडचणीचे ठरू शकते अशी चर्चा ऐकू येत आहे. ∙∙∙

दिगंबरांची तत्परता

मडगावात शनिवारी गोवा खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात शिस्त नसल्याचे जाणवले. एरव्ही मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आमदार आंतोनियो वाझ यांनी सर्वांचे स्वागत करायला हवे होते, पण सूत्रसंचालकांनी सुरवातीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानंतर आणखी एका व्यक्तीला बोलण्यास बोलावले. तो तिसऱ्या कोणाला तरी बोलावणार होता, पण तेव्हाच व्यासपीठावर मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित दिंगबरबाबाच्या हा गोंधळ लक्षात आला व त्यांनी त्वरित सूत्रसंचालकांना, मंडळाच्या अध्यक्षाला स्वागत करण्यास बोलावण्यास सांगितले. दिगंबर बाबांनी तत्परता दाखवली म्हणून नाही, तर हा कार्यक्रम आणखी लांबला असता. ∙∙∙

मंत्रिमंडळ विस्ताराचे गूढ

गेले वर्षभर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे घोडे पुढे केले जात आहे. आज होणार, उद्या होणार म्हणून इच्छुक वाट पाहात आहेत. मध्यंतरी मंत्री गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर अजून त्यांच्या जागी दुसऱ्याला मंत्रिपद देण्यात आलेले नाही. गोव्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपण्यास तीन दिवस बाकी असताना काही वर्तमानपत्रांमध्ये बातमी झळकली. ‘उद्या तवडकर सभापतिपदाचा राजीनामा देणार. त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार. सभापतिपदी दिगंबरबाब किंवा दाजीबाब यांची निवड होणार’. अधिवेशन संपले, पण सभापतींनी राजीनामा दिला नाही किंवा दिगंबरबाब किंवा दाजीबाब सभापती झाले नाहीत. मात्र, विरोधी पक्षनेते आभारप्रदर्शनाच्या वेळी सभापतींना उद्देशून एवढेच म्हणाले, ‘सोमारा बोरें जांव दी’ याचा नक्की अर्थ काय. आता सोमवारपर्यंतची वाट पाहावी का? ∙∙∙

दिलायला यांचे राखीचे बंधन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन राज्यातील अनेक भगिनींनी त्यांना राख्या बांधल्या, परंतु आज सर्वाधिक लक्ष वेधले ते शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी. गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्‍घाटनाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आले असता उद्‍घाटनानंतर आयनॉक्सच्या आवारातच दिलायला लोबो यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. राखी बांधताना भाऊराया मुख्यमंत्री सावंतांना भगिनी लोबो म्हणाल्या, ‘आपल्याला मुख्यमंत्री म्हणून गोवेकरांची सेवा करण्यासाठी अनेक वर्षे संधी मिळो अशी ईश्‍वराकडे प्रार्थना करते...’ मुख्यमंत्र्यांना यावेळी त्यांनी मिठाई भरविली, त्यांचे तोंडही गोड केले. परंतु आता या रक्षाबंधनाची ओवाळणी लोबोंना कशा स्वरूपात मिळते याकडे शिवोली मतदारसंघाचे तसेच बार्देशचे लक्ष लागले आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; मर्दनगडाचे संवर्धन करणार कसे?

...तर एक लाख जण जमवणार

कोमुनिदाद व सरकारी जमिनीवरील घरे नियमित करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात कोणी आवाज काढला तर त्याला त्याच प्रकारे उत्तर देण्याची तयारी करण्यात येत आहे. सरकारविरोधी आवाजांना प्रत्युत्तर देण्यासाठी किमान लाखभर जण रस्त्यावर उतरतील असे सत्ताधारी गोटातील काही जणांना वाटते. कोणा कोणाच्‍या घरावर मोर्चे काढता येतील व काढले जावेत याचे नियोजन तयार करण्यात येत आहे. प्रादेशिक आराखड्यावेळी झालेल्या आंदोलनासारखे मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी आत्तापासूनच होऊ लागली आहे. फरक एवढाच असेल की आराखड्याविरोधातील आंदोलन सरकार विरोधी होते, तर हे आंदोलन सरकारच्या बाजूने असेल. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात विद्यार्थ्यांचा धिंगाणा

सावंत यांची कामगिरी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सत्ताधारी पक्षाचे आता निर्विवाद नेते बनल्याचे एक ठळक चित्र या विधानसभा अधिवेशनात प्रकर्षाने सामोरे आले. ते आता सलग सहा वर्षे मुख्यमंत्रिपदावर आहेत व त्यांचे, पक्षांतर्गत सारे स्पर्धक आपोआप गारद झाले आहेत. वास्तविक पक्षश्रेष्ठींनी कोणालाच ‘बढतीचे’ वचन दिले नव्हते, दिल्लीवाल्यांनी सावंत यांच्या स्पर्धकांना चुचकारत ठेवले-वापरून मात्र घेतले, परंतु कसलाही प्रयत्न न करता सावंत यांच्या मार्गातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. विधानसभेत त्यांचा सर्व खात्यांचा अभ्यास दिसून आला. त्यांनी कधी आश्‍वासन देऊन तर कधी विरोधकांमधील दुफळीचा वापर करून घेऊन वेळ मारून नेली. त्यांनी विरोधकांमधील संघर्ष हाताबाहेर जाऊ दिला नाही. प्रचंड ३३ जणांचे बहुमत असतानाही एक समंजस मुख्यमंत्री म्हणून आपली छबी त्यांनी पुढे आणली. त्यामुळे कट्टर विरोधकांनाही सावंत या पदावर राहिले तर चालतील, असेच वाटत राहिले. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com