Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबूज: नाकर्ते वीज खाते

Khari Kujbuj Political Satire: कामचुकारपणा हा सर्व सरकारी खात्यांचा स्थायीभाव असावा.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कोकणीचा बहराचा काळ

कोकणीत शंकर नावाचे तीन कवी होते? असे प्राध्यापकाला विचारले. तो गडबडला. होते म्हटले तर पुढच्या प्रश्नांना सामना करावा लागेल म्हणून. असो. हे तीन्ही शंकर हाडाचे प्रतिभावान कवी होते. कोकणीच्या बहराचा काळ तो. सध्याचा कसला, माहीत नाही. शंकर भांडारी यांची गीते लयबद्ध, अर्थपूर्ण असत. शंकर रामाणींच्या कविताही खोल असत. शंकर परुळेकरांनी कोकणी कवितेला नवीन वळण दिले. अस्तित्ववादी, एब्सर्डीजम विचारधारांसारखे. सध्याच्या कविता या मुळातच कविता आहेत का, हा प्रथमदर्शनी प्रश्न पडतो. ग्रेस, चित्रे सोडा; परंतु सुरेश भट, मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा या लोकांना अभ्यास हवा. चार अपवाद सोडले तर कोकणीत वाचन हा शब्द ऐकल्यावरच काहींना गरगरल्यासारखे वाटते. उंची- खोलीयुक्त जागतिक साहित्याच्या अभ्यासाचा अभाव हा निर्मितीला, आशयघनतेला मर्यादा घालतो. कोकणीत तेव्हा ल्युमिनरी होते. तसा ऋतू येवो, तिमिर जावो, ही प्रतीक्षा सगळेचजण करत आहेत. ...

नाकर्ते वीज खाते

कामचुकारपणा हा सर्व सरकारी खात्यांचा स्थायीभाव असावा. रविवारी रात्री वीज व ढगांच्या गडगडाटासह प्रचंड पाऊस पडला. हा पाऊस वादळी होता. चुडते, काटक्या ओल्या होऊन वीजतारांवर पडल्याबरोबर वीजप्रवाह खंडित होऊन अंधार झाला. अनेक ठिकाणी रात्रभर वीज नव्हती. प्रश्न आहे तो वीज खात्याचा. एकाच बरोबर कर्मचाऱ्यांचे गट दहा ठिकाणी जाऊ शकत नाहीत; पण कार्यालयात चौकशी विभागात फोन तरी घ्यावा की नाही? फोन बाजूला करून ठेवला की कटकट गेली. ज्यावेळी वाजत होता, तेव्हा कुणीही घेत नव्हता. अमुक क्षेत्रात वीज बंद पडली आहे, हे सांगायला फोन केला, तो घेत नसलेली ही निष्क्रिय यंत्रणा. मान्सूनचे आगमन व्हायचेच आहे. वीज खात्याला प्रशासनाने विशेष सूचना, इशारा देणे संयुक्तिक ठरेल. कारण अंधारामुळे किती दुर्दैवी घटना घडतात, हे लोक पाहत आहेत....

पालिकेतील हे नारद कोण?

आम्हा सर्वांना पुराणकाळातील नारदमुनी परिचित आहेत. 'कळलाव्या' असा त्यांचा उल्लेख होत असला तरी त्यामागील त्यांचा हेतू मात्र नेहमी चांगलाच राहत होता. आता हे नारदपुराण सांगायचे कारण म्हणजे मडगाव पालिकेतही दोन आधुनिक नारद आहेत, अशी चर्चा आहे. नगरसेवक महेश आमोणकर यांनी सोमवारी या नारदांच्या 'कळी' सांगितल्या. पालिकेतील घडामोडी बाहेर उघड करण्याचे काम ही जोडी करीत आहे. आता नारद कोण, हे मात्र महेशराव सांगायला तयार नाहीत. वेळ आल्यावर तोंड उघडू, असे ते सांगतात. कदाचित कुणाची तरी ऑर्डर आल्यानंतर ते या नारदांची नावे उघड करणार, असे वाटते.

मनोज नरमले

सोशल मीडिया आणि रविवारच्या पत्रकार परिषदेद्वारे आमदार वीरेश बोरकर आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींविरोधात आरोपांच्या फैरी झाडणारे 'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब सोमवारच्या पत्रकार परिषदेत मात्र शांतपणे बोलले. कुणावरही टीका न करता त्यांनी आमदार बोरकर यांनीच वेळ द्यावा आणि केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन केले. एकंदरीत मनोज सोमवारी ज्या पद्धतीने बोलत होते, ते पाहून ते नरमल्याची चर्चा 'आरजी'त सुरू आहे. परंतु ते खरेच नरमलेले आहेत की राजकीय शहाणपणातून ते नवी रणनीती आखताहेत, हे लवकरच उघड होणार आहे. शेवटी ते आहेत मनोज परब, त्यांचा 'इगो' थोडाच काबूत राहातो!...

मिर्ची लगी तो !

निवडणूक तोंडावर आली की वेगवेगळे सर्व्हे प्रसिद्ध होणे त्यात काही नवल नाही. अशी सर्वेक्षणे करण्यामध्ये व्यावसायिक संस्थांबरोबरच काही स्थानिक पातळीवरील लोकही पुढे येतात. सावर्डे मतदारसंघात अशाच एका स्थानिक चॅनलकडून संभावित उमेदवारांबद्दल एक सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यात एका युवा इच्छुक उमेदवाराला सर्वांत जास्त लोकांची पसंती आहे, असा निष्कर्ष जाहीर करण्यात आला. आता हे सर्वेक्षण कोणत्या आधारे केले गेले आणि त्याची अचूकता काय? याबाबतीत जरी संभ्रम असला तरी या सर्वेक्षणामुळे एका प्रस्थापित राजकारण्याला मात्र बरीच मिरची झोंबल्याचे दिसून येते. या राजकारण्याने ज्या कुणी हा सर्व्हे केला त्याला बोलावून बरेच झापले आणि सर्वेक्षणाचे नमुने मतदारसंघातील बाहेरच्या लोकांकडून घेतले आहेत, अशा आशयाच त्याच्याकडून पुन्हा एकदा पोस्ट समाजमाध्यमांवर टाकण्यास सांगितला. सध्या हे सर्वेक्षण सावर्डे मतदारसंघात एक चर्चेचा विषय बनले असून त्या युवा इच्छुक उमेदवाराचे समर्थक सध्या त्या प्रस्थापित राजकारण्याला उद्देशून, 'तुझे मिर्ची लगी तो मै क्या करू, असे विचारू लागले आहेत. ....

म्हापशात डांबराचा पूर !

म्हापशाची जनता खरीच खूप नशीबवान ! अख्खी साडेचार वर्षे रस्त्यावरील खड्डे आणि धुळीचा त्रास सहन केला. कमरेची हाडे खिळखिळी करून घेतली. आता कुठे निवडणूक जवळ आल्यावर रस्त्यांना मखमली डांबर पाहायला मिळते. निवडणूक जवळ आली की म्हापशात डांबराचा पूर येतो,

आता ठरलेले आहे. दुसरीकडे, शेजारच्या शिवोलीकरांचे बघा ना, किती भोळी लोकं ती! २०२२ मधील निवडणुकीनंतर लगेच हळूहळू रस्ते सुधारायला लागले. काय तो त्यांचा संथ कारभार! पण त्यांना काय माहीत, विकास असा वर्षानुवर्षे करायचा नसतो. विकास तर

म्हापशासारखा मतदानाच्या फक्त आठ-नऊ महिने आधी अचानक धमाका करून दाखवायचा असतो! जेणेकरून मतदानाच्या बटनापर्यंत डांबराचा वास ताजा राहील. आता पाच वर्षे खड्डे मोजणारे मतदारही हुशार झालेत. ते म्हणतात, रस्ते गुळगुळीत झाले ते ठीक आहे; पण ही निवडणुकीची ऐनवेळची मलमपट्टी आहे, हे आम्हाला चांगलेच कळते. असो, शेवटी उशिरा का होईना; पण डांबराचे दर्शन तरी झाले! आता फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना करायची की, हे नवीन रस्ते पुढील निवडणुकीपर्यंत टिकू देत, नाहीतर पुढच्या डांबरासाठी पुन्हा पाच वर्षे खड्डे मोजत बसावे लागेल! ...

विनय समर्थक पॅनलची सरशी

दूधसागर जीप संघटनेची नुकतीच निवडणूक होऊन त्यात नीलेश वेळीपसह ९ जणांची निवड झाली.निवडून आलेले हे सर्व पदाधिकारी माजी मंत्री आणि माजी खासदार विनय तेंडुलकर यांचे समर्थक असून,त्यांच्या या विजयामुळे विनय तेंडुलकर यांची सरशी झाली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दूधसागरवर ट्रीप्स आयोजित करण्याच्या बुकिंगवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी त्या जीप संघटनेच्या आधाराला विनय तेंडुलकर धावून आले होते. त्यांनीच यशस्वी मध्यस्थी केल्याने या जीपचालकांना दिलासा मिळाला होता. आताच्या निवडणुकीत जो निकाल लागला आहे, त्यावरही या समझोत्याचे प्रतिबिंब उमटले आहे, असे म्हटल्यास त्यात काही अतिशयोक्ती होणार नाही. विनय तेंडुलकर हळूहळू सावर्डे मतदारसंघावर आपला ठामपणे शिक्का उमटवू लागले आहेत, हेच त्यातून दिसून येत नाही का?

म्हापशात बदलाचे वारे

म्हापशात सध्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत.पालिका ते विधानसभा या पातळीवर अनेकांना बदल हवा, असे दिसते. त्यातच अनेकांनी आपली निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणे सुरू केले आहे. म्हापशातील राजकारणाने कूस बदलावी यासाठी राज्य पातळीवरील काही शक्ती प्रयत्नशील असल्याचे दिसते. अद्याप निवडणूक दूर असली तरी त्याविषयीची चर्चा घडवून आणली जात आहे. यातून कोणाला कोणता संदेश देण्याचा हेतू असल्याचे दडून राहत नाही. यातून निर्माण होणारे 'वारे' खरोखरच बदल घडवेल का? याविषयी चर्चा मात्र जोरात सुरू आहे.....

बेसूर निरागस !

गोव्यात हल्ली ऑर्केस्ट्रा, गायनाचे कार्यक्रम वाढलेले आहेत. गुणवत्तेत सुधार नाही. लग्नसमारंभ सुरू आहेत, बाजूला गायक-गायिका गातात. लोक लांब रांगेतून स्टेजवर जाऊन वधूवरांना आशीर्वाद देतात. या कल्लोळात सूर कुठे हरवला हे समजत नाही. एसीमुळे तबला सुराला हललेला असतो; पण जाकीटधारी तबलजीला पर्वा नसते. सकाळ-संध्याकाळ असे कार्यक्रम केल्यावर या कलाकारांना रियाझ करायला वेळ नाही, ही सबब बाष्कळ पाय मोडलाय; पण फिजिओथेरपीला वेळ नाही, तसली गत ही सूर लागतानाच बेसूर लागला तर धडगत नाही. वृद्धावस्थेत आताच कुठे यमन दिसायला लागला, असे महान गायक सांगून गेले. गोव्यातील नवशिक्यांना गाणे गायले म्हणजे झाले शिकून असे वाटते. स्वरांचे अनंत अवकाश विद्यार्थ्याला सावकाश समजते. बिनरियाझी गायक फुलत नाहीत. सामान्यांना गाणे समजले नाही तरी तज्ज्ञांना सूर, ताल, लय, ताना यावरील घसरण स्वच्छ दिसते. ....

बदलीसाठी पोलिसांच्या येरझाऱ्या सुरू!

सध्या अनेक पोलिस बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने त्यांची बदलीसाठी धावपळ सुरू आहे. अनेक पोलिसांच्या मुलांनी गावात नव्या ठिकाणी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे नजीकच्या ठिकाणी पोलिस ठाण्यात बदली व्हावी, यासाठी अनेक पोलिस प्रयत्नशील आहेत. आता बदली म्हणजे राजकीय वशिला हा पाहिजेच. पोलिस आता आपल्या राजकीय गॉडफादरचे उंबरठे झिजवू लागले आहेत. थोडी कळ काढा तुमचे काम करू, असे हे गॉडफादर सांगून त्यांना दिलासा देत असल्याची चर्चा सुरू आहे....

इंधनाची काटकसर

युध्दजन्य स्थिती व अनिश्चितता लक्षात घेऊन पंतप्रधानांनी इंधन बचत करा, असे आवाहन केले आहे. त्यावर कितीजण विचार करतात? कधी एकदाचा शनिवार येतो आणि आपण दोन दिवस

गोव्याबाहेर फिरायला जातो, असे प्रत्येकाला होते. इंग्रजीत या हिंडण्याला 'लॉलिगॅगिंग' असे संबोधले जाते. 'नाईट कल्चर' हा प्रकार विदेशातून आमच्या देशात आला. सध्याच्या स्थितीत इंधनाची वा लागू नये म्हणून या सहली बंद झाल्यात का? इंधन टंचाईचा पेच होण्याआधी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपले फिरणे, भटकंती कमी झाली आहे का? विवेकबुध्दीने जर या गोष्टींकडे पाहिले तर लोक समजू शकतील. कोविड लॉकडाऊन काळात लोक वर्षभर घरीच होते. मौजमजेचे दौरे नव्हते. तारतम्य हवे. पेट्रोल, डिझेलबाबतीत आमचा देश आत्मनिर्भर नाही. म्हणून सबुरीने घ्यायला हवे....

'आरजी'तील वाद अन मंगेश चिवटे गोव्यात!

गेल्या काही दिवसांपासून रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजी) अंतर्गत धुसमत असलेला वाद आता टोकाला पोहोचला आहे. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर असे दोन गट पक्षात पडल्याचे स्पष्ट झालेले आहे. गेल्या दोन दिवसांत मनोज आणि वीरेशकडून एकमेकांवर टीकास्र सोडले जात असतानाच, २०२२च्या विधानसभा निवडणुकीत वारंवार मनोज परब यांच्यासमवेत झळकलेले, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत परब यांची बैठक घडवून आणणारे आणि या कारणांमुळे राज्यात चर्चेचा विषय ठरलेले एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे नेमके सोमवारीच गोव्यात आले होते. 'मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गोव्यात आलो होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'गोमन्तक'च्या प्रतिनिधीला दिली. परंतु, 'आरजी'तील वादाच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळातून तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत......

दिल्लीतील शक्तिप्रदर्शन

दिल्लीत होणाऱ्या 'जनजाती सांस्कृतिक संमेलन २०२६'साठी गोव्यातून तब्बल १४०० हून अधिक प्रतिनिधी रवाना होणार असल्याची घोषणा होताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित या भव्य मेळाव्यात गोव्याचा आवाजही घुमणार, अशी आयोजकांची भूमिका असली तरी गोव्यातील प्रश्न सोडवायला वेळ नाही; पण दिल्ली गाठायला हजारोंची फौज तयार!' अशी मिश्कील प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटू लागली आहे. सांस्कृतिक एकात्मतेच्या नावाखाली दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ गोव्याची उपस्थिती नोंदवली जाणार असली, तरी दिल्लीत नेमके संस्कृतीचे प्रदर्शन होणार की शक्तिप्रदर्शन, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ....

केपे मतदारसंघ 'एसटी' राखीव होणार?

'एकच असत्य गोष्ट शंभरवेळा सांगितली की लोकांना ती गोष्ट सत्य वाटायला लागते! अफवा अशाच असतात. निवडणूक जवळ आली की, अफवांचे पीक यायला लागते. पुढील विधानसभा निवडणुकीत पे मतदारसंघात भाजपसमोर बाबूंशिवाय पर्याय नाही आणि काँग्रेसपुढे एल्टन हाच पर्याय आहे. आता याचा अर्थ पुढील निवडणुकीत केपे मतदारसंघात एल्टन विरुद्ध बाबू असा सामना होणार, असा होत नाही. केपे मतदारसंघात अनुसूचित जमातीचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. ख्रिस्ती व हिंदू एसटी मतदार मोठ्या संख्येने असल्यामुळे केपे मतदारसंघ 'एसटी'साठी राखीव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपजवळ 'एसटी' समाजाचे अनेक नेते आहेत. माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी झेडपी खुशाली वेळीप, प्रभाकर गावकर, अर्जुन वेळीप यांना उमेदवारी दिल्यास केपे मतदारसंघ भाजपकडे येण्याची शक्यता असल्यामुळे केपे मतदारसंघ 'एसटी' आरक्षित करण्यात येणार, अशी चर्चा गावात सुरू झाली आहे...

'डीडीएसवाय ' केंद्राचे स्वास्थ्य बिघडले?

सरकारी सेवा देणाऱ्यांनी जनतेशी कसे वागावे व कसे बोलावे याचे प्रशिक्षण प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला देणे गरजेचे आहे. काही सरकारी कर्मचारी जे जनतेचे सेवक असतात ते स्वतःला जनतेचे बाँस समजतात. सरकारने दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजने (डीडीएसवाय) चे नवीन कार्ड करण्यासाठी व असलेल्या कार्डचे नूतनीकरण करण्यासाठी खास सेवा केंद्रे निर्माण केली आहेत. ही सेवा ऑनलाईनही उपलब्ध असली तरी ग्रामीण भागातील व शहरी भागातील गरीब व अर्धशिक्षित लोक या केंद्रात जाऊन चौकशी करतात. मात्र, त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. खरे म्हणजे प्रत्येक पालिका क्षेत्रात व प्रत्येक जिल्हा पंचायत क्षेत्रात अशाप्रकारच्या एका तरी केंद्रात नवीन कार्ड करण्याची सुविधा असायला हवी. मात्र, नवीन कार्ड करण्याची सुविधा अभावानेच मिळते. नवीन कार्ड योजना सुविधा आपल्या केंद्रात उपलब्ध आहे की नाही, हे सांगायला कर्मचारी जनतेला पंधरा ते वीस मिनिटे बसवून ठेवत असल्याच्या तक्रारी आहेत....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: तुम्हीच वेळ ठरवून बैठकीला हजर रहा! परब यांचे नमते, वीरेशना संयत आवाहन

Goa Monsoon Preparedness: 9 मिनिटांत आपत्काल मदत! मुख्यमंत्र्यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, 172 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Viral News: चहा-कॉफी नाही, ही तरुणी रोज सकाळी उठून पिते 'पेट्रोल'; कारण ऐकून डॉक्टरही चक्रावले!

Goa Politics: 'आप'चे गोवा सहप्रभारी सिंगला 'ईडी'कडून अटक; मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीसह गोव्यात झडती, अनेक आरोप

Goa Drowning Death: मासेमारीसाठी नदीत उतरले अन् घात झाला; थिवी नदीत बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT