Goa Politics: खरी कुजबुज; स्वतःला जेम्स बाँड समजणारा पोलिस अधिकारी

Khari Kujbuj Political Satire: समाजमाध्यमांतून पणजीतील ‘स्पा’च्या वाढलेल्या संख्येवरून टीका होऊ लागल्यानंतर महानगरपालिकेने नव्याने परवानग्या न देण्याचा निर्णय घेतला.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

स्वतःला जेम्स बाँड समजणारा पोलिस अधिकारी!

म्हापसा शहरात डॉ. घाणेकरांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडतो अन् दरोडेखोर हे सहिसलामत गोव्याबाहेर नव्हे तर देशाबाहेर सुखरूप निसटतात. या दरोडेखोरांमधील काहींचा दोनापावला दरोड्यातही सहभाग होता. मात्र, पणजी पोलिसांनी संबंधित दरोड्याचा तपास व्यवस्थित केला नाही, असे दिसते. कारण तेव्हाच काही हालचाल केली असती, तर कदाचित या चोरट्यांना आधीच पकडता आले असते! दोनापावला तपासातील आवश्यक ‘डीटेल्स’ पणजी पोलिसांच्या ‘त्या’ अधिकाऱ्यांनी म्हापसा पोलिसांशी वेळेत शेअर केले असते, तर कदाचित म्हापसा दरोड्यातील चोरांना पकडण्यात खूप मदत झाली असती, अशी चर्चा म्हापसा दरोडा शोधमोहिमेवेळी प्रामुख्याने झाली. आता पणजीतील या कथित अतिहुशार अधिकाऱ्यांच्या बेजबाबदरपणाला नक्की काय म्हणायचं? कारण, हा अधिकारी स्वतःला ‘जेम्स बाँड’ समजतो, पण प्रत्यक्षात कृती शून्यच! तसेच राजकीय वरदहस्त घेऊन आपली पोस्टिंग सांभाळत आहे, अशीही चर्चा म्हापसा पोलिस विभागात आहे! ∙∙∙

उशिरा सूचलेले शहाणपण!

समाजमाध्यमांतून पणजीतील ‘स्पा’च्या वाढलेल्या संख्येवरून टीका होऊ लागल्यानंतर महानगरपालिकेने नव्याने परवानग्या न देण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेच्या आजच्या स्थायी समितीने हा निर्णय घेतला, त्याला उशिरा सूचलेले शहाणपणच म्हणावे लागेल. पणजी शहराचा विस्तार किंवा मर्यादा पाहिल्यातर प्रत्येक रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी ‘स्पा’ला परवानगी दिली गेली आहे. यारून पणजीही थायलंडच्या मार्गाने जातेय काय, असा सवाल निर्माण होत होता. आता परवानग्या दिल्यातर लोकच रस्त्यावर उतरतील, अशी स्थिती निर्माण झाली होती. सोसायट्या, नागरी वस्तीजवळ ‘स्पा’ झाल्याने आणि त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत पर्यटकांच्या ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे त्या भागातील शांतता भंग झाल्याचाही आरोप होऊ लागला आहे. असो उशिरा का होईना, पण महानगरपालिकेने चांगला निर्णय घेतला, असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

‘व्होट चोरी’ म्हणजे काय रे भाऊ?

राष्ट्रीय पातळीवर राहूल गांधीनी सुरू केलेली ‘व्होट चोरी’ बाबतची मोहीम गोव्यातही सध्या सुरू आहे. कॉंग्रेसचा सध्या तो राष्ट्रीय कार्यक्रम ठरलेला आहे. त्याचा आगामी निवडणुकांत त्या पक्षाला किती फायदा होईल ते आगामी काळच दाखवून देणार आहे. पण गोव्यात तरी या मोहिमेला तसा प्रतिसाद मिळत असलेला दिसत नाही. कारण त्याबाबत लोकांमध्ये जागृतीच दिसून येत नाही. लोकांमध्ये सोडाच पण खुद्द कॉंग्रेसवालेही त्या बाबत अंधारात असल्याचे दिसते. कारण सत्ताधाऱ्यांवर दुगाण्या झाडण्याखेरीज या मोहिमेत ‘व्होट चोरी’ म्हणजे काय त्याची माहिती म्हणे लोकांना दिली जात नाही. खरे तर ज्या महाराष्ट्रांतील निवडणुकीत हे प्रकरण घडल्याचा आरोप आहे, त्याचा तपशील लोकांसमोर मांडण्याची गरज होती. पण प्रत्यक्षात ते न करता केवळ सरकारवर टीका केली जाते. त्यामुळे त्या मोहिमेनंतर घरी परतणारे दुसऱ्याकडे ही ‘व्होट चोरी’ म्हणजे काय रे भाऊ, अशी विचारणा म्हणे करतात. आता बोला!. ∙∙∙

कोमुनिदादची पळवाट!

थिवी येथील कोमुनिदादने ‘एमआयटी’ला दिलेली जमीन आता शैक्षणिक कारणास्तव वापरता येणार आहे. साडेबारा रुपये चौरस मीटर जमीन दिल्याने याकडे अनेकांच्या नजरा होत्या. सरकारने ठरवलेल्या दराचे पालन न केल्याचा मुद्दा न्यायालयात पोचला होता. मात्र कोमुनिदादला हे दर लागू होत नाहीत असा युक्तिवाद कोमुनिदादच्या वकिलांनी केला आणि तो मान्य झाला आहे. त्यामुळे आता कोमुनिदाद जमिनीवरील घरे नियमित करताना सरकारी दराचा आधार घेण्याची केलेली कायदा दुरुस्ती या नव्या निवाड्याच्या कसोटीवर टिकणार का, अशी चर्चा कायदे वर्तुळात सुरु झाली आहे. ∙∙∙

मुख्यमंत्री बिहार दौऱ्यावर

मुख्यमंत्री काल दिल्लीमार्गे बिहारला रवाना झाले. निवडणुकांवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे भाजप मोठी जबाबदारी सोपवत असतो. आताही बिहारमधील उमेदवारी अर्ज सादर करताना ‘रोड शो’ करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे हिंदीत भाषण करण्याचा त्यांचा सराव होतो, हेही नसे थोडके. मुख्यमंत्री मागील काही निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर चमकले होते. त्यांच्या विधानांनी राजकीय धुरळा उडवला होता. त्यामुळे ते बिहारमध्ये काय बोलतील, याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Who After Ravi Naik: रवींनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

वाढत्या गुन्ह्यांवर ‘पोलिसांचे मौन’ का?

राज्यात सध्या गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. एका बाजूला मोठमोठ्या चोऱ्या, दरोड्यांचे सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे लहान मुलांना पळवून नेणे आणि त्यांच्यावर हल्ले होण्याच्या गंभीर घटना थांबायला तयार नाहीत. अशा स्थितीत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिस खात्याने कायदेशीररित्या अधिक सक्रिय आणि पारदर्शक असणे अपेक्षित आहे. परंतु, सध्या पोलिसांची कार्यपद्धती अगदी ‘गुप्त’स्वरुपाची झाली आहे. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक प्रश्नांवर पोलिस दल जाणीवपूर्वक मौन पाळत आहे की काय, असा संशय आता सामान्यांना येऊ लागला आहे. पोलीस ठोस कारवाई करत आहेत का? हा प्रश्न सध्या गल्लीबोळात विचारला जात आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

भाजप नेमके काय करणार?

कृषीमंत्री रवी नाईक यांच्‍या निधनामुळे रिक्त झालेल्‍या राज्‍य मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून आहे. अशा स्‍थितीत गेल्‍या मंत्रिमंडळ फेरबदलावेळी हुकलेले मंत्रिपद आता तरी आपल्‍या पदरात पडेल, अशी आशा आमदार संकल्‍प आमोणकर आणि मायकल लोबो यांना आहे. परंतु, मगोचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनी रितेश नाईक यांच्‍याबाबत केलेले आवाहन आणि भंडारी समाजाची रितेशना तत्‍काळ मंत्रिपद देण्‍याची मागणी यामुळे भाजप आणि मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नेमका काय निर्णय घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे. भंडारी समाजाच्‍या दबावामुळे भाजप रितेशना संधी देणार? की संकल्‍प आणि मायकल यापैकी एकाचे समाधान करणार, हे लवकरच कळेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com