पणजी: कदंब बसस्थानकाजवळ कार्पोरेट कार्यालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पाटो परिसरातील समस्या नक्की कधी सोडवणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. रस्त्याच्या, पदपथाच्या आणि पावसाळ्यात निर्माण होणारी गटाराची समस्या सोडवण्याचे काम होणे महत्त्वाचे आहे. या परिसरातील समस्या सोडवण्यापेक्षा पार्किंगवर महानगरपालिकेचा डोळा असावा, असेच दिसते.
आर्थिक विकास महामंडळाने (ईडीसी) महानगरपालिकेच्या ताब्यात हा भाग दिल्यानंतर महानगरपालिकेने त्या भागातील पार्किंग शुल्क आकारणी सुरू केली. मात्र, या भागातील वीज, रस्ता, त्याचबरोबर पदपथ, पावसाळ्यात पाणी साचण्याचा आणि चेंबर तुंबण्याचे प्रकार अद्याप कायम घडत आहेत. या समस्यांपासून त्या परिसराची सुटका कधी होणार, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे.
कार्पोरेट कार्यालयांचा हा कदंब बसस्थानकाजवळील परिसर आहे. या ठिकाणी तारांकित हॉटेल आहेत. त्यामुळे अनेक राज्यातील व्यावसायिक, पर्यटकांचा या ठिकाणी राबता असतो.
त्यांच्यासमोर अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या या परिसराचे दर्शन घडविले जाते. ईडीसीने जेव्हापासून हा परिसर महानगरपालिकेच्या ताब्यात देखभालीसाठी दिला आहे, तेव्हापासून त्याकडे महानगरपालिका फार गंभीरतेने पाहत नसल्याचेच दिसते. अगोदरच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येचा फुगा फुगलेला आहे आणि त्यांच्या वेतनासाठी महानगरपालिकेच्या लेखा शाखेची कसरत दर महिन्याला होत असते. त्यातून महानगरपालिकेकडे विकास निधी कशावर खर्च करावा, असे अनेक प्रश्न उभे ठाकतात. पाटो परिसराचा पूर्णपणे कायापालट कधी होणार हे दिवास्वप्नच आहे.
महापौरांनी या परिसरात फूड कोर्ट करण्याची घोषणाही केली आहे, पण अगोदर या परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.