Sadetod Nayak on Panaji Smart City: विभागांमधील समन्वयाचा अभाव, स्थानिक प्रशासकीय मंडळाचा सहभाग नसल्यामुळे पणजीतील ‘स्मार्ट सिटी’च्या कामात अनागोंदी दिसत आहे.
परिणामी पणजीवासीय अदृष्य ‘टाईमबॉम्ब’वर बसले आहेत, असे मत ‘सडेतोड नायक’ मध्ये ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी ‘स्मार्ट सिटी’ कामांतर्गत पणजीत अराजकसदृष्य स्थिती आहे का, या मुद्द्यावरील चर्चेत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
माजी उपमहापौर विभव आगशीकर यांनी सांगितले की, पणजीतील स्मार्ट सिटीचे काम प्रत्यक्षात 2016 मध्ये सुरू झाले होते. तेव्हापासून शहरात किरकोळ कामे सुरू झाली.
पणजीमध्ये सध्या 132 कोटींच्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. पूर्वीच्या जीर्ण मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याचे काम चालू आहे, पण मलनिस्सारण ‘नेटवर्क’चे कोणतेही आरेखन उपलब्ध नाही.
त्यामुळे लाईन तुटणे आदी समस्या उद्भवतात. शिवाय शहरात पदपथ प्रकल्प, ज्यात नवीन पथदीप असतील आणि वृद्ध लोकांसाठी तसेच दिव्यांगांनाही प्रवेश मिळेल, अशी कामे चालू आहेत.
ते पुढे म्हणाले की, मळ्यामध्ये पूर व्यवस्थापन उपाययोजना तसेच पाटो येथील मनोरंजन केंद्र आदी कामे सुरू आहेत. पण इथेही आंतरविभागीय समन्वयाची अडचण आहे.
फुर्तादो म्हणाले की, मी महापौर झाल्यावर ‘जेएनएनआरएम’ योजना अंमलात आली त्यात 80 टक्के निधी केंद्र सरकार, 10 टक्के राज्य सरकार आणि 10 टक्के निधी स्थानिक प्रशासकीय मंडळाकडून देण्यात आला.
परंतु 10 टक्के रक्कम पणजी महापालिकेकडे उपलब्ध नसताना दिगंबर कामत यांनी शपथपत्रात 20 टक्के रक्कम राज्य सरकार भरणार असल्याचे नमूद केले.
तसेच ते म्हणाले,‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या कामांसाठी 30 नगरसेवकांपैकी 28 नगरसेवकांना विश्वासात घेतले गेले नाही. महापालिकेत यासंदर्भात एकही बैठक झाली नाही.
आगाशीकर म्हणाले की, एकमेकांवर आरोप करून फायदा होणार नाही. स्मार्ट सिटीच्या कामांवर खर्च करण्यासाठी 1300 कोटी मिळाले असून कामे सुरू आहेत.
हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी एक आंतरविभागीय समन्वय आणि नेतृत्व असणे आवश्यक आहे.
एका कुटुंबासाठी ‘स्मार्ट’ प्रकल्प!
व्यापारी दत्तप्रसाद नाईक म्हणाले,की पणजी महानगरपालिकेत अकार्यक्षम महापौर असून पणजीतील जनतेने एक अकार्यक्षम आमदार निवडून दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट’ प्रकल्प देशभर होत आहे, पण पणजीत तो केवळ एका कुटुंबाच्या स्वार्थासाठी राबवला गेला आहे. पणजीच्या दुरावस्थेला मुख्यमंत्री आणि भाजप सरकारला जबाबदार धरले पाहिजे. मलनिस्सारण प्रकल्पही घाईघाईत मंजूर करण्यात आला.
पणजीवासीय कुणाला घाबरतात ?
पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो म्हणाले, की पणजी शहरात सुशिक्षित उच्च विद्याविभुषित असे आणि चांगले काम करणारे लोक राहतात, असे असूनही येथील लोक गप्प आहेत.
खेड्यातील लोक गावात मोबाईल टॉवर किंवा आणखी काही प्रकल्प आला तरी विरोधासाठी रस्त्यावर उतरतात. पणजीतील सुशिक्षित म्हणवणारे लोक कोणाला घाबरतात, हेच आपल्याला समजत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.